तारापुर

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : 0

श्रेणी : सोपी

ठाणे जिल्ह्यातुन विभक्त झालेल्या पालघर जिल्ह्यात समुद्राकाठी वसई, अर्नाळा, शिरगाव यासारखे लहानमोठे अनेक किल्ले आहेत. याच मालीकेतील एक महत्वाचा किल्ला म्हणजे किल्ले तारापुर. बोईसर रेल्वे स्थानकापासुन ११ कि.मी. अंतरावर समुद्राकाठी असलेले तारापूर हे प्राचीन काळापासून महत्त्वाचे गाव आहे. याच गावात समुद्राकाठी आपल्याला पोर्तुगीजकालीन तारापूर किल्ला पहायला मिळतो. बोईसर रेल्वे स्थानकातुन तारापुरला जाण्यासाठी बस तसेच रिक्षाची चांगली सोय आहे. तेराव्या शतकाच्या अखेरीस माहीमचा बिंबराजा भीम याने नाईकांकडून तारापूर गाव जिंकून घेतले. इ.स. १५३३ मध्ये पोर्तुगीजांनी या गावास आग लावून ते जाळले. नंतर इ.स. १५५६ मध्ये पोर्तुगीजांचा या भागात प्रभाव वाढला आणि ते पोर्तुगीजांच्या दमण राज्यातील एक प्रमुख शहर गणले जाऊ लागले. इ.स. १५५९ मध्ये हबशांनी तारापुरवर केलेला हल्ला यशस्वीपणे परतवून लावण्यात आला. ... इ.स. १५८२ आणि त्यानंतर पुन्हा १६१२ मध्ये मुघलांनी केलेले हल्लेसुद्धा पोर्तुगीजांनी परतवून लावले. १६ व्या शतकाच्या आरंभी तारापुर गाव व्यापारीदृष्टया भरभराटीचे होते. कारण येथून लाकडाचा, तांदळाचा व्यापार गलबताने मोठ्या प्रमाणावर चालत असे. या दरम्यान भारताचा व्हाईसरॉय असलेला मातींस दे अल्बुर्कक़ (कारकीर्द १५९१-१५९५) याने इ.स.१५९३ साली तारापुर येथे भक्कम किल्ला बांधण्यात यावा असा आदेश दिला. त्यानुसार १५९३ साली किल्ल्याचे बांधकाम सुरु झाले आणि संपुर्ण किल्ला १५९५ साली बांधूंन पूर्ण झाला. पोर्तुगीज अमलाखाली असलेल्या तारापुर किल्ल्याचा पहिला किल्लेदार होता दिओगो दे कॉउतो. १५ एप्रिल १६८३ रोजी संभाजी महाराजांनी स्वतः १००० घोडदळ आणि २००० पायदळ घेऊन तारापूरवर हल्ला केला आणि किल्ल्याबाहेरील शहर जाळले. मराठ्यांच्या इतर तुकड्यांनी दमण पासून वसई पर्यंत काही छोट्या बंदरावर हल्ले केले आणि २ पोर्तुगीज पाद्री देखील कैद केले होते. तारापूरच्या पोर्तुगीज वखारीचा अधिकारी मॅन्युअल अल्वारेस याने मराठ्यांना प्रतिकार केला आणि गोव्यालाही वृत्त पाठवले. गोवेकरांनी मराठ्यांचा गोव्यातील वकील येसाजी गंभीरराव याला अटक केली. त्यामुळे पुढे मराठ्यांनी पोर्तुगीजाना येणारे धान्य अडवले आणि रसद मारली ज्यामुळे त्यांनी माघार घेऊन येसाजीला सोडून दिले. पुढे हे संबंध वाईट होत गेले आणि १६८४ दरम्यान संभाजी राजांची मोहीम दक्षिण फिरंगाणात झाली. परंतु या मोहिमेत तारापूर काही मराठ्यांच्या ताब्यात आला नाही असे दिसते कारण मोहीम गोव्याच्या दिशेने फिरली आणि पुढे मुअज्जमच कोकणात उतरला. १६७० ते १७२८ पर्यंत तारापूर किल्ला आणि प्रदेश पोर्तुगेज अंमलाखाली होता हे निश्चित नोंदींवरून समजते. पोर्तुगीजांनी या भागात आपल्या वर्चस्वाचा फायदा धर्मप्रसारासाठी केला. बऱ्याच भुमिपुत्रांना बाटवण्यात आले हिंदूंची देवालये पाडली गेली, बऱ्याच जणांना मृत्युदंड देखील ठोठावण्यात आला. अशा या धुमश्चक्रीत भिवंडीच्या गंगाजी नाईक यांनी आपल्या कुटुंबासहित थोडेसे सैन्य घेऊन पोर्तुगीजांशी सतत २० वर्षे लढ़ा दिला. स्थानिक हिंदुं रयतेवर होत असलेले अत्याचार त्यांनी पेशव्यांना कळवले आणि अखेर इ.स.१७३८च्या अखेरीस चिमाजी आप्पा उत्तर कोकणात ससैन्य दाखल झाले. पालघर जवळील अनुक्रमे माहिम, केळवे, शिरगाव व् अशेरी हे किल्ले हस्तगत केल्या नंतर चिमाजीआप्पा १६ जानेवारी १७३९ रोजी फ़ौज घेऊन तारापुर येथे आले व किल्ल्याला वेढा दिला. या स्वारीमधे बाजी भीमराव, रामचन्द्र हरी, बाळोजी चन्द्रराव, राणोजी भोसले, गणोजी शिंदे, मल्हारराव होळकर अशी दिग्गज मंडळी होती. किल्ल्ला तसा बराच भक्कम त्याच्या उत्तरेकडे तारापुरची खाड़ी ,पूर्वेस किल्ल्याचे मुख्यद्वार, पश्चिमेस समुद्र अणि दक्षिणेला भक्कम तटबंदि होती. पश्चिमेच्या तटबंदीवरून अरबी सागराकडे लक्ष ठेवता येत होते. किल्ल्याच्या तटात गोलाकार बुरूज असुन किल्ल्यात शिबंदीसाठी घरे, एक चर्च, ख्रिश्चन मिशनरी मठ आणि एक दवाखाना होता. इ.स. १६३४ च्या सुमारास शिबंदीत एक कप्तान, एक नाईक व त्यांना दहा सेवक आणि एक गोलंदाज, एक पोलीस निरीक्षक आणि त्यास चार सेवक, एक दुभाषा, एक लेखनिक, एक मशालजी आणि एक छत्रधारक मुलगा यांचा समावेश होता. शिबंदीशिवाय किल्ल्यात एक धर्मोपदेशक, ५० पोर्तुगीज, २०० स्थानिक ख्रिश्चन आणि सुमारे १०० गुलाम, उत्तम लढवय्ये, उत्कृष्ट तलवारी, दुर्बिणी आणि तोफाही होत्या. इ.स. १७२८ मध्ये त्याला फारशी कुमक नव्हती व फक्त साठ सैनिकांचीच शिबंदी होती. किल्ल्याला वेढा दिल्यानंतर मराठ्यांनी चबूतरे बनवून त्यावर तोफा चढवल्या आणि तोफांचा जबरदस्त मारा सुरु केला. या वेळी लुइस वेलेजो नावाचा पोर्तुगीज किल्लेदार होता तो तुटलेले बुरुज रातोरात बांधून काढत असे. तोफेने काम होत नाहीं, हे पाहून २३ जाने १७३९ रोजी किल्ल्याच्या उत्तरेकडील तटाला चार सुरुंग लावण्यात आले. दुसऱ्या दिवशी पहाटे दि. २४ जाने. १७३९ रोजी पहाटेस सुरुंगाना बार देण्यात आले. चार पैकी २ सुरुंग फुकट गेले व दोन चांगलेच उड़ाले. त्या दोन सुरुंगमुळे तटाला मोठे खिंडार पडले. यातुनच बाजी भीमराव, रामचंद्र हरी, यशवंतराव पवार यांसारखे बडे सरदार अपापले सैन्य घेऊन किल्ल्याकडे धावले आणि लढाईला सुरुवात झाली. मराठा सैन्य त्वेषाने पुढे सरकले आणि फिरंगी प्रतिकार मोडून किल्ला सर केला. यावेळी बरेच मराठा सैन्य कामी आले, पोर्तुगीजांचे चार हजार लोक मराठ्यांच्या हाती लागले. त्यात डॉन फ्रांसिस डी अरूर नावाचा किलेदार देखील होता. या लढाईत सरदार भीमराव रेठरेकर तोंडाला गोळी लागून मरण पावले. बाजीराव पेशव्यांना लिहिलेल्या पत्रात चिमाजी अप्पा म्हणतात पोर्तुगीजांचा जरी पराभव झाला तरी ते अतिशय धीराने व निकराने शेवटपर्यंत लढले. पहिले बाजीराव पेशवे बाजीच्या आईच्या सांत्वनासाठी पत्रात लिहितात, बाजी भिवराव तोंडात गोळा लागून कैलासवासी जाहले. ईश्वर मोठे अनुचित केले. तुम्हास मोठा शोक प्राप्त जाहला. आमचा तर भाऊ गेला.. बाजू गेली, उपाय नाही.’ या युद्धाच्या वेळी खंडोजी माणकर या मराठा हेराने बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यास चिमाजीअप्पांनी खारोली हे गाव इनाम दिले. अशा रितीने तारापूरचा किल्ला २४ जानेवारी १७३९ रोजी मराठ्यांनी जिंकला. माहीमच्या वेढय़ापेक्षाही या वेढय़ात मराठय़ांची जास्त प्राणहानी झाली. किल्ला जिंकल्यानंतर किल्ल्यातील एकूण एक शत्रूच्या लोकांना कैद करण्याचा हुकूम चिमाजी आप्पाने दिला. एकूण ४,००० लोकांना कैद करण्यात आले व ५०० घोडे पागेस लागले. या घनघोर लढाईत तारापूरचा किल्लेदार लुईस व्हेलेझो हा कामी आला. बाकीचे सर्व अधिकारी व त्यांचे कुटुंबीय मराठय़ांच्या हाती लागले. चिमाजीअप्पाने त्या सर्वाना त्यांच्या इतमामाप्रमाणे व दर्जाप्रमाणे वागवून त्यांचा उपमर्द न होऊ देता अंत्यविधी पार पाडू दिले. किल्लेदाराच्या बायकोने आपल्या नव-याचे प्रेत त्याच्या इतमामाप्रमाणे पुरण्यास परवानगी मिळावी अशी चिमाजी आप्पाकडे विनंती केली. चिमाजी आप्पाने उदारपणे ही विनंती मान्य केली. त्याच्या या दिलदार वृत्तीबद्दल पोर्तुगीज इतिहासकारांनी चिमाजी आप्पाची मुक्तकंठाने स्तुती करून त्यास धन्यवाद दिले. अशा रीतीने तारापुर किल्ला २४ जानेवारी १७३९ रोजी जिंकला गेला पाठोपाठ सर्व वसई प्रांत आणि साष्टि प्रांत मराठ्यांचे ताब्यात आला. दि. २७ मे १७३९ रोजी किल्ल्याची हवालदारी मोरो नारोसिंह यांस तर फडनीशि महादजी दत्ताजी यांस सोपवण्यात आली. इ.स. १७५० मध्ये मराठय़ांनी किल्ल्याच्या समुद्राकडील बाजूची युरोपियन पद्धतीने दुरुस्ती केली. इ.स. १७६० मध्ये हा किल्ला सुस्थितीत होता व चार तोफांनी संरक्षित होता. इ.स. १७७६ मध्ये रघुनाथराव पेशव्याने या किल्ल्यात आश्रय घेतला होता. इ.स. १८०३ मध्ये कसलाही प्रतिकार न होता तो ब्रिटिशांच्या ताब्यात आला. इ.स. १८१८ मध्ये कॅप्टन डिकिन्सन वर्णन करतो की, हा किल्ला मोठय़ा किल्ल्यांमधील एक, सुस्थितीतील आणि उत्तर कोकणाच्या सागरी किल्ल्यांच्या अगदी मध्यभागी असलेला किल्ला आहे. मोठाल्या ताशीव दगडी चिरांमध्ये बांधलेल्या या चौरसाकृती किल्ल्याची लांबी-रुंदी प्रत्येकी १५० मी. आहे. तटभिंतीची उंची ९ मी. व रुंदी तीन मीटर आहे. किल्ल्याची उत्तर बाजू भरतीच्या वेळच्या समुद्राच्या लाटांच्या तडाख्यांनी वाहून गेली आहे आणि ब-याच ठिकाणी त्याची पडझड झालेली आहे. वरील संरक्षक भिंती कोसळल्या आहेत. आग्नेयेकडील कोप-यावर मनोरा किंवा बुरूज नाही. उर्वरित तीन बाजूंना कोरडय़ा झालेल्या खंदकाचे अवशेष पाहावयास मिळत. किल्ल्याच्या पूर्वेकडील मध्यभागी प्रमुख प्रवेशद्वार होते. किल्ल्यात मोठाल्या इमारतींचे अवशेष पाहावयास मिळत होते. येथे दोन धान्य कोठारांशिवाय एक पहारेक-याची चौकी काही साध्या इमारती, काही गोड व मुबलक पाण्याच्या विहिरी होत्या. इ.स. १८६२च्या पाहणीत तो पडक्या अवस्थेत आढळला. उत्तरेकडील बाजू पूर्णपणे पडून गेलेली आढळली. हा किल्ला पेशव्यानी विकाजी मेहरजी यास १०० वर्षाच्या करारावर इनाम म्हणून दिला होता. १९व्या शतकाअखेरीस टेलर हा प्रवासी लिहितो की, खाडीच्या दक्षिण किना-याला असलेल्या पोर्तुगीजांनी १५९३ मध्ये बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष पाहावयास मिळाले. तारापूर खाडीच्या दक्षिण तटावर हा किल्ला इतर बहुतेक किल्ल्यांप्रमाणे घडीव दगडांचा वापर करुन हा बांधला आहे. हा फार मोठा नसून त्याचा पसारा साधारण ५० ते ५५ चौरस मीटर इतका आटोपशीर आहे. १० मीटर उंच व तीन मीटर रुंद असलेली ह्याची तटबंदी मात्र भक्कम आहे. सध्या ह्याच्याजवळ समुद्र नसला तरी एके काळी ह्याच्या उत्तरेच्या भिंतीला भरतीचे पाणी भिडत असे. किल्ल्याला तीन बाजूंनी खंदक होता पण आता तो कचऱ्याने व मातीने पूर्ण बुजला आहे. ह्याची उत्तरेकडची तटबंदीही दुरावस्थेत आहे. ह्या किल्ल्यातच एक ख्रिस्ती धर्मगृह, एक रुग्णालय व एक प्रार्थनागृह होते. इथे काही विहीरी व इतर अवशेषही दिसतात. किल्ला खाजगी मालकीत असल्याने पुर्णपणे फिरता येत नाही फक्त एक दोन ठिकाणी तटावर चढून किल्ल्याचे दर्शन घ्यावे लागते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!