तांदुळवाडी

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : १४७० फुट

श्रेणी : मध्यम

मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते उंबरगाव हा पट्टा उत्तर कोकण म्हणुन तर अलीबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणुन ओळखला जातो. निसर्गसौंदर्याच्या बाबतीत दक्षिण कोकण इतके वरदान लाभुन व मुंबईच्या अगदी जवळ असुनही या भागाचा पर्यटनासाठी म्हणावा तितका विकास झाला नाही. उत्तर कोकणातील पुर्वीच्या ठाणे जिल्ह्यात व आता नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्यात गर्द झाडीने वेढलेला वैतरणा नदीचा पहारेकरी म्हणुन तांदुळवाडी किल्ला उभा आहे. मुंबईहुन एका दिवसात सहजपणे करता येण्यासारखी हि दुर्गभ्रमंती आही. तांदुळवाडी किल्ल्यास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने सफाळे स्थानक गाठावे लागते.तांदुळवाडी हे गडाखालील गाव सफाळे रेल्वे स्थानकापासून ७ कि.मी.अंतरावर तर मुंबई-अहमदाबाद मार्गावर वरई फाट्यापासून १४ कि.मी.अंतरावर आहे. वरई फाट्यावरून जाताना पहिला पारगाव फाटा व वैतरणा नदीवरील पुल ओलांडल्यानंतर तांदुळवाडी फाटा लागतो. ... तांदुळवाडी गावात आल्यावर गावामागे असलेल्या तांदुळवाडी किल्ल्याचे सुंदर दर्शन होते. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडाची उंची समुद्रसपाटी पासून १४२७ फुट आहे. गावात असलेल्या शाळेसमोर एक सिमेंटची वाट गावात जाताना दिसते. या वाटेने गावात शिरल्यावर १०-१२ घरे पार करून आपण गावाच्या मागील बाजुस येतो. येथे एक लहान बंधारा बांधलेला आहे. ह्या बंधाऱ्याची भिंत ओलांडली कि आपण गडाच्या वाटेला लागतो. हि वाट आपल्याला थेट गडाखाली असलेल्या पठारावर नेऊन सोडते. या वाटेवरील पायऱ्या सह्याद्री मित्र परीवार, माकुणसार व किल्ले वसई मोहीम यांनी श्रमदानाने बांधल्या असुन उभा चढ असलेली हि वाट बऱ्यापैकी सुसह्य झाली आहे. स्थानिक व त्यांची जनावरे या वाटेने ये जा करत असल्याने काही ठिकाणी या वाटेला फाटे फुटले आहेत पण पायऱ्यांची वाट सोडू नये. या वाटेने एक तासात आपण किल्ल्याखाली असलेल्या हजेरी माळ या पठारावर पोहोचतो. किल्ला नांदता असताना किल्ल्यावर येणाऱ्या व्यक्तीची येथे असलेल्या मेटावर नोंद केली जात असे. त्यामुळे हे ठिकाण हजेरी माळ म्हणुन ओळखले जात असावे. याच्या पुढे असलेले पठार घोडमाळ म्हणुन ओळखले जाते. तांदुळवाडी किल्ल्याचा परीसर दाट जंगलाने वेढलेला असुन या पठारावरून किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा फुटतात. डावीकडुन जाणारी वाट हि किल्ल्याच्या सोडेवरून वर चढत थेट किल्ल्यावर जाते तर उजवीकडील वाट किल्ल्याला वळसा घालत जंगलात शिरते व किल्ल्याच्या दोन डोंगरामधील घळीतून वर जाते. यातील पहिल्या वाटेवर एका ठिकाणी आपल्याला १० फुटाचे सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. या वाटेने गडावर जाण्यास कमी वेळ लागत असला तरी काही प्रमाणात हि वाट नवख्या भटक्यांचा कस पहाणारी आहे. पावसाळ्यात दगडावर शेवाळ जमल्याने हि वाट निसरडी बनते तर उन्हाळ्यात मुरमाड जमीनीची खडी निसटुन पायवाट घसरडी बनते. या वाटेने चढाईचे तीन टप्पे पार करत आपण गडावर पोहोचतो. या वाटेवर आपल्याला पाण्याचे एक टाके तसेच किल्ला व शेजारील टेकडी यांच्या घळीत असलेली तटबंदी व किल्ल्याची या वाटेवर असलेली तटबंदी पहायला मिळते. दुसरी वाट हि किल्ल्याच्या दरवाजात जाणारी मुख्य वाट असुन हि वाट जास्त वेळ खाणारी व थकवणारी असली तरी धोकादायक नाही. मूळ वाट ढासळल्याने मोठमोठे दगडधोंडे पार करत या वाटेने आपण गडावर पोहोचतो. या वाटेने किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून आपला गडावर प्रवेश होतो. किल्ल्याचा दरवाजा आज जरी शिल्लक नसला तरी या दरवाजाबाहेर कड्यावर असलेली २ पाण्याची टाकी व दरवाजाचे काही प्रमाणात शिल्लक असलेले बुरुज पहायला मिळतात. पहिल्या वाटेने जाऊन दुसऱ्या वाटेने खाली उतरल्यास कमी वेळात व कमी श्रमात संपुर्ण किल्ला पाहुन होतो. अन्यथा पहिल्या वाटेवरील टाके व घळीतील तटबंदी वरूनच पहावी लागते. उंचीचे नजरभय असलेल्यांनी पहिल्या वाटेने किल्ला उतरू नये. पहिल्या वाटेने जाताना किल्ल्याच्या चढाईचा दुसरा टप्पा पार केल्यावर तिसरा टप्पा पार करताना डोंगर उतारावर खडकात खोदलेले पाण्याचे टाके दिसते. सध्या हे टाके पुर्णपणे मातीने भरले आहे. हे टाके पार करून डावीकडुन वर जाणाऱ्या वाटेने आपण तिसऱ्या टप्प्यावर पोहोचतो. येथुन समोरच किल्ल्याचे पठार दिसते पण तेथे जाण्यासाठी हा टप्पा उतरून घळ पार करत तटबंदी चढावी लागते. किल्ल्यावर येणाऱ्या या वाटेचा धोका लक्षात घेऊन घळीच्या तोंडाशी तटबंदी बांधलेली असुन समोर किल्ल्याच्या पठारावर देखील तटबंदी बांधलेली पहायला मिळते. सध्या या दोन्ही तटबंदी मोठया प्रमाणात ढासळलेल्या असल्याने आता येथुन सहजपणे किल्ल्यावर जाता येते. किल्ल्यात प्रवेश केल्यावर या पठारावर आपल्याला काही प्रमाणात तटबंदी व एका वास्तुचा चौथरा पहायला मिळतो. या पठारावरून पुढे आल्यावर डोंगर उतारावर खडकात पाण्यासाठी खोदलेल्या ८ टाक्यांचा समुह पहायला मिळतो. या टाक्याच्या पुढील भागात एक साचपाण्याचा तलाव असुन तलावाच्या पुढील भागात वाटेला दोन फाटे फुटतात. सरळ जाणारी वाट बालेकिल्ल्याकडे जाते तर डावीकडील वाट डोंगर उतारावर असलेल्या तटबंदीकडे जाते. या भागात खडकात खोदलेली अजुन २ टाकी व किल्ल्याची ८-१० फुट उंच तटबंदी पहायला मिळते. हि वाट पुढे जाऊन बालेकिल्ल्याला जाणाऱ्या वाटेला मिळते. तांदुळवाडी किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणजे ७-८ फुटांची ओबडधोबड दगडांची रचीव तटबंदी असुन या तटबंदीत चार टोकाला ४ बुरुज आहेत. साधारण चौकोनी आकाराचा हा बालेकिल्ला १५ गुंठे परिसरात पुर्व-पश्चिम पसरलेला असुन आतील वास्तु पुर्णपणे भुईसपाट झालेल्या आहेत. बालेकिल्ल्याच्या आतील भागात एक लहानशी चौकोनी विहीर व एका ठिकाणी शेंदुर फासलेला तांदळा असुन सर्वत्र मोठया प्रमाणात झुडपे वाढली आहेत. बालेकिल्ल्याला असलेला एकमेव पुर्वाभिमख दरवाजा आज पुर्णपणे नष्ट झाला आहे. बालेकिल्ला पार करून आपण किल्ल्याच्या उत्तर टोकावर येतो. उत्तर टोकावर कड्यात अर्धवट खोदलेले टाके असुन गडाच्या मुख्य दरवाजाबाहेर कड्यात खोदलेले २ टाकी पहायला मिळतात. गडावर सध्या एकुण १४ टाकी १ चौकोनी लहान विहीर व १ तलाव पहायला मिळतो. येथुन सुर्या व वैतरणा नदीचा संगम व लांबवरचा परिसर नजरेस पडतो. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. गड उतरण्यासाठी आल्या वाटेने परत फिरावे किंवा येथील दरवाजाच्या वाटेने गड उतरण्यास सुरवात करावी. गडाचा निर्मिती काळ अज्ञात असला तरी गडावर खडकात खोदलेली टाकी पहाता प्राचीन काळापासूनच हा किल्ला अस्तीत्वात असावा असे वाटते. तेराव्या शतकात शूर्पारक म्हणजे आजचे नालासोपारा आणि महिकावती म्हणजे केळवे माहीम या नगरांवर राजा भीमदेव याचे राज्य होते. इ.स. १४५४ मध्ये गुजरातच्या सुलतानाने महिकावती जिंकले. गुजरात सुलतान बहादूरशहाने मलिक अल्लाउद्दीन नावाच्या सरदाराला तांदुळवाडीचा किल्लेदार केले. नंतर या भागावर पोर्तुगीजांचा अंमल आल्यावर तांदूळवाडी गड त्यांच्या ताब्यात गेला. इ.स.१७३७ साली चिमाजीअप्पा यांच्या उत्तर कोकण वसई मोहीमेत २ मे १७३७ रोजी विठ्ठल विश्वनाथ आणि आवजी कवडे या दोन सरदारांच्या पराक्रमामुळे हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यांच्या या विजयाबद्दल त्यांच्या सैनिकांना बक्षीस म्हणुन वाटण्यासाठी चिमाजीअप्पा यांनी ८ मे १७३७ रोजी ५०० रुपये पाठविल्याची नोंद पेशवा रोजकीर्दीत सापडते. मार्च १७३८ मध्ये वसई मोहिमेतील शंकराजी फडके यांनी चिमाजीअप्पा यांना लिहिलेल्या पत्रव्यवहारात तांदुळवाडी किल्ल्यावर पाण्याची ६० टाकी असुन त्यांच्या दुरुस्तीसाठी ५ गवंडी पाठविण्याची मागणी केली आहे. ठाणे गॅझेटिअर्स मधील नोंदीनुसार तांदुळवाडी किल्ला केळवे माहीमच्या आग्नेय दिशेस १६ कि.मी.वर असून हे ठिकाण ५७९ मीटर उंच डोंगरावर आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!