तांदुळजा
प्रकार : गढी
जिल्हा : लातुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
मराठवाडयातील लातुर प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने येथील लहानमोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गढी व एखाद-दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली. यामुळेच आपल्याला येथे किल्ल्यायेवजी गढी जास्त प्रमाणात पहायला मिळतात. लातुर जिल्ह्यातील किल्ल्यांची भटकंती करताना तांदुळजा येथे जगजीवनराव नाईक बावणे यांची ३०० वर्ष जुनी गढी पहायला मिळते. लातुर रेल्वे स्थानक ते तांदुळजा हे अंतर ३३ कि.मी.असुन लातुर-कळंब महामार्गावरून तांदुळजा गावात प्रवेश केल्यावर दुरूनच गढीची तटबंदी व बुरुज दिसुन येतात. या भागातील वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. तांदुळजा गढीची रचना हि एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणे आहे. मुख्य गढी हि चौबुर्जी असुन कधीकाळी या संपुर्ण गढीला परकोट होता. आज या परकोटाच्या भिंती पुर्णपणे नष्ट झाल्या असुन त्यातील केवळ एक दरवाजा शिल्लक आहे. संपुर्ण कोटाचा परीसर दीड एकर तर आतील मुख्य गढीचा परीसर साधारण १२ गुंठे आहे.
...
परकोटाचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन घडीव दगडात बांधलेला आहे. गढीचे खालील पाच फुटापर्यंत बांधकाम हे दगड व चुन्यात केलेले असुन त्यावरील बांधकाम विटांनी केलेले आहे. तटाची उंची साधारण ३५ फुट असुन तटावर तसेच बुरुजावर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. मुख्य गढीच्या तटबंदीत एकुण पाच बुरुज असुन चार टोकाला चार व दरवाजाच्या अलीकडे एक अशी त्यांची रचना आहे. दरवाजाच्या अलीकडील बुरुज चौकोनी आकाराचा असुन उर्वरीत बुरुज गोलाकार आहेत.गढीचा दरवाजा परकोटाच्या दरवाजाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे उत्तरेला आहे. त्यामुळे परकोटात प्रवेश केला तरी गढीचा दरवाजा दिसुन येत नाही. गढीच्या पश्चिम दिशेला तटाजवळ गोलाकार आकाराची मोठी विहीर असुन या विहिरीत उतरण्यासाठी कमानीयुक्त दरवाजा व पायऱ्या बांधलेल्या आहेत. वापरात नसल्याने या विहिरीचे पाणी खराब झालेले आहे. या शिवाय परकोटात बावणे घराण्यातील मुळपुरुष जानोजीराव यांची समाधी आहे. गढीला वळसा मारून आपण मुख्य गढीच्या दरवाजात पोहोचतो. या दरवाजाने आत शिरल्यावर आपण गढीची आतील तटबंदी व बाहेरची तटबंदी यामधील चिलखतात येतो. आतील तटबंदीत वरील बाजुस गढीत जाण्याचा दुसरा दरवाजा असुन या दरवाजापर्यंत जाण्यासाठी २०-२२ पायऱ्या चढाव्या लागतात. हा पायरीमार्ग आतील व बाहेरील तटावरून बंदुकीच्या माराच्या टप्प्यात आहे. उजवीकडील दरवाजाने आत शिरल्यावर आपला गढीत प्रवेश होतो. गढीत मोठ्या प्रमाणात घरे बांधलेली असुन त्यात गढीचे मुळ अवशेष लपले गेले आहेत. या घरांच्या गर्दीतुन वाट काढताना आपल्याला कधीकाळी गढीवर असलेल्या चौसोपी वाड्याचे दोन सोपे पहायला मिळतात. गढीची तटावरील फांजी बांधण्यासाठी पांढरी चिकट माती वापरलेली आहे. गढीचे केवळ तीन बुरुज सुस्थितीत असुन मध्यभागी गढीला पाणी पुरवठा करण्यासाठी विटांनी च्या बांधलेली लहानशी विहीर आहे. या विहिरीचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी व संकटकाळी केला जात असावा. उर्वरीत कामासाठी परकोटातील विहिरीचे पाणी वापरले जात असावे. गढीच्या बुरुजांवरून दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गढी व परकोट पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. नाईक बावणे हे क्षत्रिय मराठे कुळापैकी एक कुळ असुन मालोजीराव हे त्यांचे मुळपुरुष आहेत. शाहजहानच्या काळात मालोजीराव यांनी ५२ दिवसात ५२ किल्ले जिंकल्याने त्यांना बावणे हे नामाभिमान प्राप्त झाल्याचे सांगीतले जाते. औरंजेबाच्या काळात मोगलांकडून पांगरी, पीर पिंपळगाव, मांग देऊळगाव, देवडी देऊळगाव व भाईखेड ही जालना परगण्यातील गावे त्यांना वतनात मिळाली. मालोजीराव यांचा मुक्काम पांगरी गावात असल्याने पांगरी गाव 'बावणे पांगरी' या नावाने आजही ओळखले जाते. या गावात बावणे परिवारांच्या समाधी आहेत. औरंगजेबाच्या मृत्युनंतर इ.स.१७०७ मध्ये शाहूमहाराज महाराष्ट्रात परतल्यावर बावणे सरदार त्यांच्या पक्षात गेले. इ.स.१७४३ साली शाहु महाराजांनी तांदुळजा व गिरवली हि दोन गावे जानोजीराव नाईक बावणे यांना वतनात दिली. जानोजीराव यांच्याकडे ५००० स्वारांचे घोडदळ होते. जानोजीराव यांनीच तांदुळजा व गिरवली या दोन गढ्यांचे बांधकाम करून घेतले व तेथून ते आपल्या देशमुखीचा कारभार पाहू लागले. मराठ्यांनी उदगीरच्या लढाईत निजामाचा पराभव केल्यावर झालेला तह तांदुळजाच्या गढीत पार पडला. तांदुळजा गढीत झालेल्या तहात निजामाने ६० लक्ष उत्पन्नाचा मुलूख मराठ्यांना देण्याचे कबूल केल्याने लढाई थांबली पण निजामाने हा तह पाळला नाही. राक्षसभुवन आणि खर्डा येथे झालेल्या लढाईमध्ये व्यंकटराव नाईक बावणें यांचे अश्वदल सामील होते. इ.स १७९५ मध्ये खर्डाच्या लढाईत व्यंकटराव बावणे आणि निझामाचा वजीर मशीर उल्मुल्क यांचा सामना झाला त्यावेळचे लढाईचे वर्णन शाहु महाराजांच्या पदरी असलेल्या गंगाराम कवीने केले आहे. या लढाईत ११ मार्च १७९५ रोजी निझामाचा पराभव झाला. या तहात निझामाने परांडा किल्ला ते दौलताबाद किल्ला असा तापी नदीपर्यंतचा मुलूख मराठ्यांना दिला. इ.स. १७४९ मध्ये छत्रपती शाहूंच्या मृत्यूनंतर नाईक बावणे अक्कलकोटकर भोसलेंसोबत राहू लागले. फत्तेसिंह भोसलेंच्या टीपूवरील स्वारीत नाईक बावणेंचे अश्वदळ होते. जानोजी नाईक बावने यांचे भगवंतराव, व्यंकटराव व जगजीवनराव हे तीनही पुत्र मराठ्यांच्या घोडदळाचे सरदार होते. इ. स. १९४८ स्वातंत्र्यसंग्रामात तांदुळजा, सारसा व देवळा या गावच्या लोकांवर रझाकारांनी अत्याचार सुरु केला. तेव्हा तांदुळजाच्या सरदार नाईक बावणे यांच्या गढीतून लोकांनी रझाकारांशी अनेक वेळा मुकाबला दिला. याच लोकांनी, बन्सीलाल मारवाडी व त्याच्या मुलाचा खून करुन त्यांच्या घरातील सोने नाणे घेऊन जाणाऱ्या ४० रजाकारी पठाणांना तांदुळजा, नायगांव, सारसा व देवळा येथील गावकऱ्यांनी योजनापुर्वक मांजरा नदीत जलसमाधी दिली.
© Suresh Nimbalkar