तळागड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : ८८० फुट

श्रेणी : सोपी

कुंडलिका नदी समुद्राला जेथे मिळते त्या मांदाड खाडीवर नजर ठेवण्यासाठी तळागड, घोसाळगड, अवचितगड या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. यातील आकाराने व उंचीने सर्वात लहान किल्ला म्हणजे तळागड. तळागडला जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरचे इंदापूर गाव गाठायचे. येथून तळा गावाकडे जाणारा फाटा लागतो. इंदापूरहुन तळा गावात पोचायला अर्धा पुरेसा होतो. गावामागे दक्षिणोत्तर पसरलेल्या टेकडीवर तळागडाची निर्मिती केली आहे. तीन टप्प्यात विभागलेला हा गड गावातून उंच वाटत असला तरी गावातून गडाच्या अर्ध्या वाटेवर डांबरी रस्ता जातो. येथून एक पायवाट डावीकडे जात सरळ गडाला जाऊन भिडते. ही मळलेली पायवाट १५ मिनिटात गडाच्या माचीसदृश पहिल्या टप्प्यावर घेऊन येते. येथे तटबंदीचे आणि जोत्याचे थोडेफार अवशेष दिसतात. हीच पायवाट गडाचा मुख्य डोंगर डावीकडे ठेवत वळसा मारून परत गडाकडे येते. ... येथून कातळात खोदलेल्या पायऱ्यांनी गडाच्या दरवाज्यापाशी जायचे. दरवाजा सद्यस्थितीत ढासळला असला तरी चौकटीचा खांब मात्र शिल्लक आहेत. येथे कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती व शरभशिल्प आहे. या मुर्तीमुळे हा दरवाजा हनुमान दरवाजा म्हणुन ओळखला जातो. दरवाजाच्या बाहेरील बाजूस एक टाके खोदलेले दिसते तर आतील बाजूस देवडीचे भग्न अवशेष दिसतात. हा गडाचा दुसरा टप्पा. पुढे कातळाला वळसा मारून गेले की तिसऱ्या टप्प्याकडे जाणारा पायऱ्यांचा मार्ग लागतो. पायऱ्यांच्या या वाटेला डाव्या बाजूस भक्कम तट बांधला आहे. ठिकठिकाणी जंग्यासुद्धा आहेत. तसेच एक भलामोठा अर्धा गोलाकार बुरुज सुद्धा वाटेत आडवा येतो. पायऱ्या चढून वर गेले की गडाचा मुख्य दरवाज्याची जागा लागते. तळागडाच्या बालेकिल्ल्याचा दरवाजाही पूर्णपणे नामशेष झालेला असून गावातून निघाल्यापासून अर्ध्या तासात आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. येथून वर गेलो की गडाचा माथा म्हणजेच तिसरा टप्पा लागतो. हा तिसरा भाग म्हणजे किल्ल्याच्या अंर्तभागात असणारे प्रशस्त पठारच होय. गडाचा माथा साधारण ३०० मीटर रुंद व ४०० मीटर लांब आहे. गड दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडमाथ्यावर उजवीकडे एक मोठा चौथरा आणि भक्कम बांधणीचा दुमजली बुरुज दिसतो. हि ध्वजस्तंभाची जागा आहे. या तटावर जाण्यासाठी आतल्या बाजूने पायऱ्यांची सोयही केलेली दिसते. किल्ल्याची तटबंदी आजही शाबूत असुन अनेक ठिकाणचे बुरुज चांगल्या स्थितित आढळतात. डावीकडे कातळात खोदलेली भली मोठी सात टाकी असुन टाक्यांपलीकडे जोत्यांचे काही अवशेष दिसतात ही टाक्यांची मालिका जिथे संपते, तिथे मुख्य इमारत ढासळलेले पण दोन्ही बाजूंच्या भिंती सुस्थितीत असलेले ‘लक्ष्मी कोठार’ आहे. त्याच्यापलीकडे उत्तरेकडे निमुळती होत जाणारी भक्कम तटबंदी आहे. आजही सुस्थितीत असलेली ही तटबंदी आणि बुरुज पाहून पुन्हा मागे यायचे आणि दक्षिणेला असलेला दुमजली बुरुज पहायचा. या तटबंदीच्या शेवटच्या बुरुजावरून घोसाळगड, महाड, रोह्याची खाडी असा सर्व परिसर दिसतो तर पूर्वेला सावित्री नदी व थोडी दूरवर सह्याद्रीची मुख्य रांग दिसते. याशिवाय गडावर एक छप्पर नसलेले महादेवाचे मंदिर असुन या मंदिरातील पिंड इतर पिंडीसारखी गोलाकार नसून चौकोनी आहे. गडाच्या बांधणीवरून उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करून गड भक्कम आणि लढाऊ करण्याचा पूर्ण प्रयत्न दिसून येतो. गडाचा वापर फक्त टेहळणीसाठी होत असल्याने गडावर फारशी शिबंदी नसावी. गडाचा घेर आटोपशीर असल्याने एक तासात गड फिरुन होतो. प्राचीन काळी कुंडलिका नदी मार्गे कोकणातील बंदरात उतरणारा माल ताम्हीणीमार्गे घाटावर जात असे. या व्यापारी मार्गावर असलेली कुडा लेणी आणि तळागड, घोसाळगड, अवचितगड हे किल्ले या मार्गाच्या प्राचीनत्वाची साक्ष देत आजही उभे आहेत. इ.स १६५७ साली तळगड आणि घोसाळगड हे किल्ले मराठयांनी आदिलशहाकडून ताब्यात घेउन स्वराज्यात सामील केले. इ.स. १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने तळागडाला वेढा घातला होता. पण अफजलखानाच्या मृत्युची बातमी मिळताच सिद्दीने वेढा उठवला. पुढे पुरंदरच्या तहात २३ किल्ले मुघलांना दिल्यावर शिवाजी महाराजांकडे उरलेल्या १२ किल्ल्यात तळागडचा सामावेश होता. शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर तळागड सिद्दीकडे आला. पेशवेकाळात थोरल्या बाजीरावांनी सिद्दीवर मात करत १७ एप्रिल १७३५ मध्ये तळागड जिंकला. १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने घोसाळगडाबरोबरच तळागडाचाही ताबा मिळवला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!