तळबीड - हंबीरराव मोहिते समाधी
प्रकार : समाधीस्थळ
जिल्हा : सातारा
महाराष्ट्रातील काही किल्ले हे त्यांच्या नावापेक्षा त्या किल्ल्याखाली असलेल्या गावामुळे प्रसिध्द आहे. असेच काहीसे भाग्य तळबीड गावाला लाभले आहे. पराक्रम आणि शौर्य याचे कोंदण लाभलेल्या तळबीड गावात सेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी आहे. तळबीड गाव व शिवाजी महाराज यांचे एक अनोखे नाते होते. शहाजीराजे यांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई म्हणजेच महाराजांच्या सावत्र आई या तळबीड गावच्या म्हणजे एक प्रकारे हे महाराजांचे आजोळ आहे. शिवाजी राजांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई या देखील तळबीड गावच्या म्हणजे महाराजांचे हे सासर आहे इतकेच नव्हे तर राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई म्हणजे महाराजांच्या स्नुषा या देखील तळबीड गावच्या. या नात्याने तळबीड महाराजांचे सोयरसंबंध असलेले गाव आहे. या गावाने स्वराज्याच्या कार्यात सतत आपले योगदान दिले आहे. स्वराज्याच्या यज्ञकुंडात एक नव्हे तर सेनापती हंबीरराव मोहिते व रणरागिणी ताराबाई यांच्या रूपाने दोन आहुत्या दिल्या आहेत.
...
असे असले तरी तळबीड गावात असलेली सेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी आजही लोकांना अपरीचीतच आहे. मुंबई बंगळुर महामार्गाने कराडकडे जाताना उंब्रजपासुन ६ कि.मी. अंतरावर तळबीडला जाणारा फाटा असुन उंब्रज तळबीड हे अंतर १० कि.मी.आहे. तळबीड गावात प्रवेश करताना समोरच सेनापती हंबीरराव मोहीते यांची समाधी नजरेस पडते. हि समाधी म्हणजे घडीव दगडांचा एक चौथरा असुन या चौथऱ्यावर नक्षीकाम केले आहे. चौथऱ्याच्या खालील भागात चारही बाजुला हत्ती व मोर यांची शिल्पे आहेत. समाधी शेजारी दोन तोफा असुन यातील एक तोफ अर्धवट तुटलेली आहे. समाधीच्या चौथऱ्यावर नव्याने बांधलेला घुमट असुन समोरील बाजुस बाग उभारली आहे. या समाधी चौथऱ्याशिवाय गावात अजुन तीन समाधी चौथरे असुन यातील एका चौथऱ्याला चार विरगळ टेकवुन ठेवल्या आहेत. हे समाधी चौथरे कोणाचे आहेत याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. स्वराज्य निर्मितीसाठी सैन्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेले व शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तळबीड हे गाव. नेसरीच्या लढाईत सेनापती प्रतापराव गुजर धारातीर्थी पडल्यावर सेनापती पदाची जबाबदारी हंबीरराव मोहिते यांच्यावर पडली व ती त्यांनी तितक्याच समर्थपणे सांभाळली. स्वकर्तुत्वाने व पराक्रमाने मिळालेले सरसेनापतीपद हंबीरराव मोहिते यांनी तितक्याच समर्थपणे पेलले. १६ डिसेंबर १६८४ रोजी मोगलांशी लढताना वाई येथे तोफगोळा लागून सेनापती हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडल्यावर त्यांची समाधी त्यांच्या तळबीड या मुळ गावात बांधली गेली. छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर हंबीररावांच्या कन्या ताराबाई मोगलांच्या कर्दनकाळ बनुन उभ्या ठाकल्या. संताजी, धनाजी यांचे नेतृत्व निर्माण करण्यात महाराणी ताराबाई यांचा मोलाचा वाटा होता.
© Suresh Nimbalkar