तल्लुर
प्रकार : गढी
जिल्हा : बेळगाव
उंची : 0
श्रेणी : सोपी
बेळगाव सीमाप्रश्न हा महाराष्ट्राच्या ह्रदयावरची कधीही न भरणारी जखम आहे. स्वराज्यात असणारा हा मराठी प्रांत भाषावार प्रांतरचना करताना कर्नाटक राज्याला जोडला गेला. आज बेळगाव जिल्ह्यात असणारे हे किल्ले एकेकाळी स्वराज्यात असल्याने या किल्ल्यांना मी आजही महाराष्ट्रातील किल्ले समजतो. स्वतःचे खाजगी वाहन असल्यास दिवसाला येथील ५-६ कोट सहजपणे पहाता येतात. यातील बहुतांशी किल्ले हे भुईकोट अथवा गढी असुन एखादा दुसरा अपवाद वगळता गिरिदुर्गांची संख्य फारच कमी आहे. आम्ही भेट दिलेल्या या सर्व गढीकोटांची माहीती मी दुर्गभरारी या संकेतस्थळावर देण्याचा प्रयत्न केला आहे. खानदेशात रावळ, कोकणात खोत, देशावर कुलकर्णी अथवा पाटील त्याचप्रमाणे बेळगावच्या भागात देसाई हि पदवी दिसुन येते. काळाप्रमाणे बदलणाऱ्या राजसत्तेच्या अधीन राहून जमा केलेला कर सरकारकडे जमा करणे हे या देसायांचे काम असे.
...
याबद्दल त्यांना ठराविक हिस्सा मिळत असे. हे देसाई एखादया संस्थानीकाप्रमाणे रहात असत. त्यांनी त्यांच्या प्रदेशात भुईकोटा सारख्या तटाबुरुजानी संरक्षित गढ्या बांधल्या. या सर्व गढ्या खाजगी स्वरूपाच्या असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करण्यासाठी व स्वसंरक्षणसाठी होत असे. यातील काही गढी १८ व्या शतकात बांधलेल्या असुन या गढीवर लढाईचा प्रसंग कधीच न आल्याने त्या आजही त्यांच्या मुळ स्थितीत असुन वापरात आहे. अशीच एक तटबुरुजांनी बंदीस्त केलेली सुस्थितीतील गढी आपल्याला सौंदत्ती तालुक्यातील तल्लुर येथे पहायला मिळते. तल्लुर गढी व शिरसंगी गढी या दोन्ही गढीचे आत बाहेरील बांधकाम एकसमान आहे. तल्लुर गढी बेळगावपासुन ६० कि.मी.अंतरावर तर सौंदत्ती या तालुक्याच्या ठिकाणाहुन 32 कि.मी.अंतरावर आहे. तल्लुर गावाच्या एका टोकावर असलेली हि गढी गावात देसाई भुईकोट म्हणुन ओळखली जाते. गढीच्या दरवाजासमोर प्रशस्त आवार असुन यात अनेक अवशेष पहायला मिळतात. या आवारात प्रवेश केल्यावर डावीकडे घडीव दगडात बांधलेले सुंदर मंदीर आहे. या मंदिराची थोडीफार पडझड झाली असुन ते आता वापरात नाही. या शिवाय अजुन एक लहान मंदीर या आवारात पहायला मिळते. आवाराच्या मध्यभागी दगडी बांधकामातील खोल विहीर असुन शेजारी दोन दगडी ढोणी आहेत. या विहिरीशेजारी काही अंतरावर चुन्याचा घाणा आहे. दरवाजाशेजारी उजव्या बाजुस तटबंदीत एक लहान कोनाडा असुन त्यात काही देवतांच्या तांदळा असुन शेजारी कट्टयावर विरगळ, सप्तमातृका,शिवलिंग व काही शिल्प ठेवलेली आहेत. गढीच्या डावीकडील बुरुजाच्या भिंतीत हनुमानाचे शिल्प आहे. चौकोनी आकाराची हि गढी पाउण एकरवर पसरलेली असुन गढीच्या चार कोपऱ्यावर चार बुरुज आहेत. गढीचे बुरुज व तटबंदीत बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधल्या आहेत. गढीचा मुख्य दरवाजा पुर्वाभिमुख असुन वरील बाजुस नगारखान तर शेजारी अजुन एक लहान दरवाजा आहे. गढीत देसाई यांचे वंशज रहात असल्याने परवानगी घेऊनच आत प्रवेश करावा. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पुर्वीच्या कचेऱ्या व पहारेकऱ्यासाठी खोल्या आहेत. आत आल्यावर समोरच देसाईंच्या पुर्व वैभवाची जाणीव करून देणारा सुंदर दुमजली वाडा आहे. वाडयाच्या दोन्ही बाजुस तटाला लागुन ओसरी व देवड्या बांधलेल्या आहेत. दरवाजाच्या उजव्या बाजुस तटावर जाण्यासाठी दगडी जिना आहे. तटावरून संपुर्ण कोटास फेरी मारता येते. गढी पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar