तडवळे

प्रकार : गढी

जिल्हा : पुणे

उंची : 0

श्रेणी : सोपी

महाराष्ट्रात वाडे व गढीकोटांची संख्या हजारोच्या घरात आहे. मराठेशाहीच्या उत्तरकाळात पेशव्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या अनेक वतनदारांनी त्यांच्या प्रदेशात भुईकोट व गढ्या बांधल्या. यातील बरेच भुईकोट वाडे हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करण्यासाठी व स्वसंरक्षणसाठी होत होता. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत. स्थानिकांची या वास्तुबाबत असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. सातारा जिल्ह्यातील तडवळे गावात असलेली सरदार खराडे यांची किल्लेवजा गढी याचे एक उदाहरण आहे. बघताक्षणी गढी नव्हे किल्ला वाटावी अशी हि वास्तु आज दुर्दशेच्या फेऱ्यात सापडल्याने नष्ट होत आहे. आंतरजाल व इतर कोणत्याही पुस्तकात या गढीची माहिती सापडत नसल्याने या किल्लेवजा गढीची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. ... फलटणचा इतिहास व ऐतिहासिक वास्तु म्हणजे निंबाळकर हे समीकरण रुढ झाल्याने गावातील काहीजण हा राजे निंबाळकर यांचा किल्ला असल्याचे सांगतात पण प्रत्यक्षात हि सरदार खराडे यांची किल्लेवजा गढी आहे. फलटण तालुक्यातील तडवळे येथील गढी पुण्यापासुन सासवड-जेजुरी-निरा-लोणंद-काळजमार्गे ८० कि.मी. अंतरावर तर फलटण पासुन १८ कि.मी. अंतरावर आहे. लोणंदहुन जाताना काळजला डावीकडे जाणारा तडवळे गावाचा फाटा लागतो. तडवळे गावात प्रवेश केल्यावर वाटेवर उजवीकडे एका उंचवट्यावर असलेली बुरुज तटबंदी आपले लक्ष वेधुन घेते. हाच तो सरदार खराडे यांचा गढीवजा किल्ला. साधारण चौकोनी आकाराची हि गढी अर्ध्या एकर परिसरात पसरलेली असुन आज या गढीची केवळ पश्चिम बाजुची तटबंदी व एक बुरुज शिल्लक आहे. एकेकाळी या गढीला चार टोकाला चार बुरुज असल्याचे स्थानिक सांगतात. शिल्लक तटबंदी बुरुजाचे बांधकाम व भव्य दरवाजा तसेच गढीतील अवशेष आजही या वास्तुच्या भव्यतेची साक्ष देतात. गढीचा दगडी बांधणीतील उत्तराभिमुख कमानीदार दरवाजा १५-१८ फुट उंच असुन याच्या बाहेरील बाजुस कमानीवर चुन्यामध्ये कोरलेली शिल्पे दिसुन येतात. गढीची बुरुज व तटबंदी घडीव दगडात बांधलेली असुन त्यामध्ये बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. सध्या शिल्लक असलेल्या तटबंदी बुरुजावर जाण्यासाठी तटाला लागुनच पायऱ्या आहेत. या जिन्याने तटावर आले असता संपुर्ण गढीचा आतील भाग व गढी उंचवट्यावर असल्याने खुप लांबवरचा प्रदेश पहायला मिळतो. बुरुजावर एक नाथपंथीय साधुची समाधी असुन बुरुजाच्या मध्यभागी एक गोलाकार उंचवटा आहे. हि बहुदा गढीवरील टेहळणीची किंवा झेंडा रोवण्याची जागा असावी. बुरुजाच्या खालील भागात एक खोली असुन आत शिरण्यासाठी लहान दरवाजा आहे. बुरुजाच्या अलीकडे एक दगडात बांधलेली गोलाकार विहीर असुन या विहिरीच्या आत मध्यभागी एक कमान दिसुन येते. गावकरी ते भुयार असल्याचे सांगतात पण प्रत्यक्षात ती विहिरीत उतरणाऱ्या पायऱ्यावरची कमान असावी. किल्ल्यातील वास्तु ढासळल्याने त्याच्या दगडमातीने वरील बाजूस असलेल्या पायऱ्या बुजल्या असाव्यात. या शिवाय गढीच्या आत एक भलेमोठे दगडी कमानी असलेले तळघर आहे. या तळघरात शिरण्यासाठी एक कमानदार दरवाजा असुन सध्या या दरवाजापुढे एक गोठा बांधलेला आहे व दरवाजावर दगडमाती लोटण्यात आली आहे. पण हा कमान असलेला दरवाजा व त्यातील तळघर आत न जाता आजही पहायला मिळते. दरवाजाच्या पुढी बाजुस काही अंतरावर एक चौकोनी हौद आहे. हा हौद म्हणजे या तळघरात हवा व प्रकाश येण्यासाठी बांधलेला झरोका आहे. या झरोक्यातून तळघरातील कमानी पहाता येतात. इतर ठिकाणी असलेले हे झरोके बुजले असावेत. गढीचे इतर अवशेष नष्ट झाल्याने वाडयाच्या बांधकामाचा अंदाज करता येत नाही. गढीच्या बांधकामातील दगडांचा वापर स्थानिकांनी घरे बांधण्याकरता केलेला दिसुन येतो. संपुर्ण गढीची फेरी करण्याकरता अर्धा तास पुरेसा होतो. छत्रपती शिवरायांच्या काळापासून तडवळे गाव अस्तित्वात आहे. खराडे हे मराठा घराण्यातील भोसले कुळाचे एक उपकुळ असुन खराडे हे नाव सांगली जिल्ह्यातील खराडी गावामुळे पडले आहे. खराडे सरदारांनी आयुष्यभर मराठी साम्राज्याची सेवा केली. मराठा आरमाराचे सरदार सुभानजी खराडे छत्रपती शिवाजी यांचे विश्वासू सरदार होते. सरदार शिताजी खराडे आणि त्याचा मुलगा सरदार फकीरजी शिताजी खराडे यांचा अब्दालीचा वझीर शहापसंद खान याच्याशी लढताना मृत्यू झाला. सरदार तानाजी खराडे यांनी बारादी घाटच्या लढाईत आणि पानीपतच्या रणसंग्रामात (१७६१साली) भाग घेतला होता.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!