ढाकभैरी
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : रायगड
उंची : २९३६ फुट
श्रेणी : अत्यंत कठीण
लोणावळा म्हणजे मुंबई-पुणे येथील पर्यटकांचे एका दिवसाच्या सहलीसाठी आवडीचे ठिकाण. त्यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते. पण लोणावळ्याच्या डोंगररांगेत व राजमाचीच्या घनदाट जंगलात असलेला ढाकचा किल्ला तसा फारसा कोणाला परिचयाचा नाही. या किल्ल्याची आपल्या सारख्या रानावनात हिंडणा-या मंडळीना ओळख करून दिली ती आपले सर्वांचे आवडते अप्पा म्हणजे 'गो. नी. दांडेकर' यांनी. पुण्याहून मुंबईकडे जाताना खंडाळा स्थानक गेले की उजव्या हाताला राजमाचीनंतर हा किल्ला लगेच ओळखू येतो. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याचा माथा साधारण २९३६ फुट उंचावर आहे. एक मोठा कळकराय नावाचा सुळका व गडावर दुसरा छोटा सुळका ह्याची नेमकी ओळख पटवतो. कळकरायच्या सुळक्यावर चढाई करण्यासाठी अनेक गिर्यारोहक इथे येतात.
ढाकच्या किल्ल्याचे दोन भाग आहेत. १) बहिरीची गुहा २) ढाकचा किल्ला.
...
१) बहिरीची गुहा- या गुहेत असलेले भैरवाचे स्थान पंचक्रोशीत ढाकचा बहिरी वा गडदचा बहिरी म्हणुन ओळखला जातो. ढाक किल्ल्याच्या पोटातील कातळात ३ गुहा कोरलेल्या आहेत. या गुहेत जायला काळ्या कातळावरील एक अनगड वाट आहे. गडाचा डोंगर व कळकरायचा सुळका ह्यामधील अरुंद घळीतून आपल्याला खाली उतरुन जावे लागते. चार पाच फूट रुंदीच्या ह्या घळीतून सुटी माती असलेल्या वाटेने आपल्याला ८-१० मीटर खाली उतरावे लागते. उतरताना समोरील दरीचे भीषण दर्शन होत असते. ह्या घळीतून खाली उतरले की काळ्या कातळावरुन आपल्याला ४० मीटर अंतर कापावे लागतात. इथे पाय घसरला तर दरीमधे थेट २०० मीटर खाली निश्चित.पुढचे ८-१० मीटर कातळात खोदलेल्या पकडींच्या आधारे वर जावे लागते. इथे एका झाडाचे खोड उखळीत बसवले आहे. त्याची वरची बाजू मोकळी असल्याने आपल्या वजनाने ते सहजपणे झुलते. त्याच्या छाटलेल्या फांद्यांचा आधार घेत आणखी ८-१० मीटर कापता येतात.जणु काही इतक्यावर भागले नाही म्हणून ह्यापुढे एका वेलीच्या आधारे आणखी १० मीटर वर जावे लागते. इतक्या अडथळ्यांना पार केल्यावर आपण बहिरीच्या गुहेत पोहोचतो. या गुहेत बहिरोबाची घुमटी असुन त्यातील मुर्ती म्हणजे शेंदुर फासलेला तांदळा आहे. या गुहेत पाण्याची २ मोठी टाक आहेत. या टाक्यांमध्येच गावकऱ्यानी जेवणासाठी काही भांडी ठेवली आहेत. जेवण झाल्यावर ही भांडी धुवून पुन्हा या टाक्यातच ठेवावी. गुहेच्या वर साधारण हजार फुट उंचीची कातळभिंत आहे. इथून आजूबाजूच्या निसर्गाचे घडणारे दर्शनही फार विलोभनीय आहे. गुहेच्या समोरच राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथूनच नागफणीचे टोक , प्रबळगड , कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो. दुसर्या लेण्यात काहीही अवशेष नाहीत ,तर ३ रे लेणे अर्धवट खोदलेल्या स्थितीत आहे.
२) ढाकचा किल्ला :- ह्या गडावर फार काही उल्लेखनीय घटना झाल्याचे सापडत नाही. तरी ह्या गडाचे भौगोलिक ठिकाण अगदी मोक्याचे आहे. भोर घाटातून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्याकरता ही उत्तम जागा आहे. शेजारीच राजमाचीसारखा मोठा व बलदंड किल्ला असल्याने ढाकचे महत्व कमी असावे. ढाकच्या किल्ल्यावर पोहचायचे असल्यास 'वदप' गाव गाठावे. गडावर आज काही मोजकेच अवशेष शिल्लक आहेत. त्याचा काही भाग अजून उभा असला तरी तटबंदी बरीचशी पडली आहे. किल्ल्याच्या माथ्यावर पाण्याची दोन- तीन टाकी आणि एक मंदिर आहे. इतर गोष्टी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत किंवा दाट झाडाझुडपात लपल्या आहेत. किल्याचा आकार व त्यावरील अवशेष पहाता याचा ऊपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. माथ्यावरुन पश्चिमेला पळसदरी तलाव, पूर्वेला उल्हास नदीचे खोरे व राजमाची, कोरीगड, माणिकगड, कर्नाळा, प्रबळगड, माथेरान, भिमाशंकर, सिद्धगड हे किल्ले दिसुन येतात.
गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. यापूर्वी अनेक जणांचा या ठिकाणी पडून मृत्यु झालेला आहे.
© Suresh Nimbalkar