डोसवाडा
प्रकार : सराई
जिल्हा : तापी
उंची : 0
श्रेणी : सोपी
मध्ययुगीन काळात सुरत हे महत्वाचे बंदर असल्याने सुरत-बुरहानपुर हा एक महत्वाचा वहाता व्यापारी मार्ग होत. बंदरात येणारा माल सुरत-सोनगड-नवापुरमार्गे खानदेशात व तेथुन बुऱ्हानपूर व इतरत्र रवाना होत असे. व्यापारीमार्ग असल्याने या मार्गावर व्यापाऱ्यांच्या सुरक्षित रहाण्याची सोय असणे गरजेचे होते अन हि सोय डोसवाड येथे सराई बांधुन पुर्ण करण्यात आली. सुरत व व्यारा येथील किल्ला पाहुन तापी तालुक्यातील सोनगड किल्ला पहायला जाताना आम्हाला डोसवाड येथे किल्ला असल्याची माहीती मिळाली व आमची स्वारी डोसवाड गावाकडे वळली. सुरत सोनगड महामार्गावर डोसवाड हे गाव व्यारा शहरापासुन १८ कि.मी व महामार्गापासुन ३ कि.मी.आत आहे. डोसवाड ते सोनगड हे अंतर ११ कि.मी. आहे. पर्यटनक्षेत्र असले तरी गावात जाण्यासाठी बसची सोय नसल्याने महामार्गावर जाण्या-येण्यासाठी खासगी रिक्षाचा वापर करावा. डोसवाड येथील धरण परीसर पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी येथे असलेला किल्ला मात्र फारसा कोणाला ठाऊक नाही.
...
डोसवाड गावात शिरल्यावर एक रस्ता धरणाच्या दिशेने जातो. मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजुस रस्त्याला लागुनच धरणाच्या भिंतीजवळच डोसवाड किल्ला उभा आहे. मुळात हा किल्ला नसुन व्यापारी मार्गावर असलेली मध्ययुगीन काळातील सराई आहे. चौकोनी आकाराची हि सराई चारही बाजुने तटबंदीने बंदिस्त असुन साधारण २ एकरवर बांधलेली आहे. सराईचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असुन उत्तर दिशेला उध्वस्त झालेला दुसरा लहान दरवाजा आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस देवड्या असुन वरील बाजुस दोन घुमटीवजा मिनार आहे. आत शिरल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजुस तटावर जाण्यासाठी तटबंदीत जिना बांधलेला आहे. सराईच्या आतील भागाचे बागेत रुपांतर झाले असुन या बागेत एक जुनी विहीर पहायला मिळते. सराईच्या दक्षिण,पुर्व व पश्चिम तटबंदीला लागुन रहाण्यासाठी एकुण २८ दालने बांधलेली आहेत. यातील पुर्व बाजुस असलेल्या चार दालनांच्या कमानीवर पर्शियन भाषेत कुराणातील आयत रंगविलेल्या आहेत. याशिवाय फारसे काही शिल्लक नसल्याने १५ मिनिटात आपले सराई दर्शन पुर्ण होते. सध्या या सराईची देखरेख एक खाजगी संस्था करते पण सराईविषयी त्यांच्याकडे देखील कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
© Suresh Nimbalkar