डोमरी

प्रकार : गढी

जिल्हा : बीड

उंची : 0

बीड शहराच्या आसपास गढीकोटांची भटकंती करताना आपल्याला असंख्य लहानमोठ्या गढी पहायला मिळतात. या सर्व गढी लक्षात रहाणे तसे कठीणच पण काही गढी मात्र त्याच्या एखाद्या वैशिष्ठपुर्ण वास्तु रचनेमुळे कायमस्वरूपी आपल्या लक्षात रहातात. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोमरी गावात असलेली गढी त्यापैकीच. या गढीच्या बुरुजात असलेल्या वैशिष्ठपुर्ण विहिरीच्या बांधकामामुळे हि गढी कायमची आपल्या लक्षात रहाते. डोमरी हे गाव बीड शहरापासुन २८ कि.मी.अंतरावर असुन पाटोदा या तालुक्याच्या ठिकाणाहुन १८ कि.मी. अंतरावर आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात असलेली हि गढी एका उंचवट्यावर बांधलेली असल्याने दुरूनच नजरेस पडते, त्यामुळे गढीचा पत्ता विचारण्याची गरज पडत नाही. चौकोनी आकाराची हि गढी साधारण पाउण एकरवर बांधलेली असुन गढीच्या तीन टोकांना तीन लहानमोठे बुरुज आहेत. संपुर्ण गढीचे बांधकाम घडीव दगडात केलेले असुन गढीचे मुख्य प्रवेशद्वार कोणताही आडोसा न घेता थेट समोरच बांधलेले आहे. या दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला साधारण २०-२२ पायऱ्या चढून जावे लागते. ... गढीचे बांधकाम बाहेरील बाजूने आजही सुस्थितीत असुन गढीच्या मुख्य दरवाजाच्या दर्शनी भागात तीन दगडी कमळे कोरलेली आहेत. गढीचे एकुण बांधकाम व त्यात वापरलेला दगड पहाता हि गढी निजामाच्या काळात बांधली गेली असावी असे वाटते. गढीच्या दरवाजाची दगडी कमान व त्यातील लाकडी दारे आजही चांगल्या स्थितीत आहेत. गढीचे वंशज सध्या येथे रहात नसल्याने व गढीच्या दरवाजाला टाळे असल्याने आंम्हाला गढी आतील बाजूने काही पहाता आली नाही. या गढीच्या बांधकामातील मला भावलेली गोष्ट म्हणजे या गढीच्या एका बुरुजात असलेली विहीर. हा बुरुज खूपच वैशिष्टपुर्ण असुन या बुरुजाच्या आत पूर्णपणे घडीव दगडात बांधलेली खोल विहीर आहे. या विहिरीतून पाणी काढण्यासाठी एकुण तीन टप्पे असुन य तीन टप्प्यातुन आजही विहिरीचे पाणी काढता येते. पहिला टप्पा म्हणजे विहिरीची सर्वात वरची बाजू. हा टप्पा म्हणजे विहिरीचा कठडा असुन तो तटाच्या वरील बाजूस आहे, म्हणजे तटावरील व्यक्तीला देखील पाण्यासाठी इतरत्र न जाता थेट तटावरून पाणी काढता येईल. यातील दुसरा टप्पा म्हणजे तटाखाली गढीत असणाऱ्या व्यक्तीला देखील लहानशा भुयारी मार्गाने विहिरीच्या मध्यवर्ती भागात येऊन तेथून विहिरीचे पाणी काढता येईल. घरातील महिला देखील पाणी काढण्यास येथे आल्या तरी कोणाच्या नजरेस येणार नाहीत. यांनतरचा तिसरा टप्पा म्हणजे गढीबाहेरील व्यक्तीला देखील बाहेरी बाजूने बुरुजात शिरून तेथून विहिरीचे पाणी काढता येईल पण गढीत प्रवेश मात्र करता येणार नाही. असा आगळा वेगळा बुरुज या गढीच्या बांधकामात पहायला मिळतो. संपुर्ण गढी व तिचा परिसर पहाण्यासाठी पाउण तास पुरेसा होतो. गढीचा इतिहास फारसा कोणाला ठाऊक नसला तरी गावात हि गढी विनायक देशमुखांची डोमरी गढी म्हणुन ओळखली जाते. निजामाच्या व इंग्रजांच्या काळात विनायकराव देशमुख हे डोमरी व आसपासच्या गावातील एक मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जात असे. देशमुखांच्या या गढीतील विनायकराव देशमुख यांचा काळ म्हणजे गढीचा सुवर्णकाळ होता. आजूबाजूच्या अनेक खेड्यांशी त्यांचा संपर्क होता. त्यांचे डोमरी येथे मोठे किराणा सामानाचे दुकान होते. दररोज सकाळी पाच बैलगाड्या येथुन सामान आणण्यासाठी अहमदनगरला जात असत. यावरून त्यांच्या धंद्याचा आवक लक्षात येतो पण विनायकजींची हत्या झाली व हे सर्व ठप्प झाले. हि गढी बहुदा विनायकराव देशमुख यांच्याच काळात बांधली गेली असावी. व्यापारासाठी बांधलेल्या या गढीला ऐतिहासक पार्श्वभूमी तशी नाहीच. पण इंग्रज व निजाम विरूद्ध अनेक चकमकी या डोमरी गढीच्या आसपास घडल्याचे स्थानिक सांगतात. डोमरी गढीचा वैशिष्टपुर्ण बुरुज व त्यातील विहीर पाहण्यासाठी या गढीला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!