डोंगरीपाडा

प्रकार : गढी

जिल्हा : पालघर

उंची : 0

श्रेणी : सोपी

उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने त्यांनी वसई ते भिवंडी- कल्याण या सागरी मार्गावरील उल्हास खाडीच्या काठावर संरक्षणासाठी तसेच प्रशासकीय सोयीसाठी अनेक लहान-मोठ्या वास्तु बांधल्या. यातील बहुतांशी वास्तुंची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फार थोडे अवशेषरुपात शिल्लक आहेत. याला असणारा एकमेव अपवाद म्हणजे वसई-भिवंडी महामार्गावर असलेला डोंगरीपाडा कोट. प्रशासकीय कामासाठी पोर्तुगीजांनी बांधलेली हि वास्तु अगदी अलीकडील काळापर्यंत खाजगी वापरात राहील्याने चांगल्या अवस्थेत असुन बाहेरील बाजूने तिच्या मुळ स्वरूपात पहायला मिळते. वसई-भिवंडी महामार्गावर चिंचोटी येथुन ६ कि.मी.अंतरावर असणारा हा कोट वसई रेल्वे स्थानकापासुन १५ कि.मी.अंतरावर आहे. वसईहुन भिवंडीकडे जाणाऱ्या बसने पोमण येथे उतरून डोंगरीपाडा कोटास जाता येते. वसई-भिवंडी मार्गावरील पोमण येथील युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजीनीयरींग नंतर डावीकडे जाणारा दुसरा फाटा आपल्याला डोंगरीपाड्यात असलेल्या कोटाजवळ घेऊन जातो. ... माडी म्हणुन हे ठिकाण स्थानिकांना परीचीत असल्याने शोधशोध करावी लागत नाही. कोटाच्या बाहेरील बाजूस या परीसरात सापडलेल्या काही प्राचीन मूर्ती ठेवलेल्या आहेत. यात विष्णुची मूर्ती असुन एक जैन मूर्ती आहे. याशिवाय इतर काही भग्न शिल्प ठेवलेली आहेत. पोर्तुगीजांनी बांधलेल्या टेहळणीच्या बहुतांशी वास्तु एकसमान व एक आकाराच्या दिसुन येतात. साधारण ३०x ३० फुट आकाराचा हि दुमजली वास्तु असुन याचे वरील छप्पर खापरी नळ्यांनी शाकारलेले आहे. या वास्तुच्या बांधकामात ओबडधोबड दगड व चिकटमाती याचा वापर केला असुन काही ठिकाणी चुन्याचा वापर केलेला आहे. कोटाच्या भिंतीत वरील मजल्यासाठी दीड फुट जाडीच्या आडव्या तुळया टाकलेल्या आहेत. त्याच्यावर फळ्या टाकून व त्यावर माती सारवून दुसरा मजला तयार केलेला दिसुन येतो. उंच चौथऱ्यावर उभारलेल्या या कोटाला दोन बाजुस दरवाजे असुन वरील मजल्यावर चारही बाजुस खिडक्या आहेत. कोटाच्या अंतर्गत भागात अलीकडील काळात राहण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. २२ फुट उंच असणाऱ्या या वास्तुचे स्थान व आकारमान पाहता याचा वापर पोर्तुगीजकालीन जकातीचे ठाणे अथवा कचेरीसोबत टेहळणीसाठी देखील होत असावा. कोट पाहण्यास २० मिनिटे पुरेशी होतात. कुटुंब वाढल्याने आता येथे कोणी राहत नसल्याने या वास्तुची पडझड होण्यास सुरवात झाली आहे. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा उपयोग प्रांतातील लहान मोठया कोटाना रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३९च्या वसई मोहिमे दरम्यान हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. आजही सुस्थितीत असलेली पोर्तुगीजांची हि प्रशासकीय वास्तु व टेहळणी चौकी पाहण्यासाठी या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!