डोंगराईगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सांगली

उंची : २८५४ फुट

श्रेणी : सोपी

महाराष्ट्रातील अनेक डोंगरांना गड हि संज्ञा लोकांकडुन दिली गेली आहे. मुळात गड म्हणजे किल्ला अथवा डोंगरावर लष्करी ठाणे असलेले ठिकाण पण असे न घडता काही ठिकाणांना सरसकट गड म्हणुनच संबोधले जाते. यात खासकरून देवतांची मंदीरे असलेली ठिकाणे येतात. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात असलेला डोंगराईगड यापैकी एक. दुर्गप्रेमींनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे हा कोणत्याही प्रकारचा गड अथवा किल्ला नसुन अलीकडील काळात बांधले गेलेले डोंगराई देवीचे मंदीर असलेले ठिकाण आहे. या मंदिराच्या दरवाजाची बांधणी एखाद्या किल्ल्याच्या दरवाजाप्रमाणे दोन बुरुजात केलेली असल्याने अलीकडे काही ठिकाणी याचा उल्लेख गड म्हणुन आला आहे. इतिहासात कोठेही या किल्ल्याचा उल्लेख दिसुन येत नाही पण काहीही प्रमाण नसलेल्या कथा मात्र या डोंगराबद्दल ऐकायला मिळतात. कराड-विटा मार्गावरील कडेगाव या तालुक्याच्या ठिकाणापासुन डोंगराईगड हे अंतर साधारण ५ कि.मी.असुन खाजगी वाहनाने थेट मंदीर असलेल्या टेकडीच्या पठारावर जाता येते. ... पठारावरून मंदिर साधारण १०० फुट उंचावर असुन मंदिराकडे जाण्यासाठी ६०-७० पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायऱ्याच्या सुरवातीला दोन लहान उध्वस्त समाध्या असुन एक लहान घुमटीवजा मंदीर आहे. पायऱ्यांनी मंदिरात प्रवेश करण्यापुर्वी आजुबाजुला अजून दोन लहान मंदीरे पहायला मिळतात. दोन बुरुजामध्ये बांधलेल्या दरवाजातुन मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर दरवाजाच्या आतील बाजुस काही कोरीव शिल्पे पहायला मिळतात. मंदिराच्या आवारात एकुण दोन मंदीरे असुन मुख्य मंदीर डोंगराई देवीचे तर दुसरे मंदीर महादेवाचे आहे. डोंगराई देवीच्या मंदिरासमोर दीपमाळ असुन मंदिराच्या मागील बाजुस धर्मशाळा आहे. डोंगरावर कोणत्याही प्रकारची पाण्याची सोय नसल्याने खालील भागातुन नळाने पाणी वर आणण्यात आले आहे. या भागातील हा एकमेव उंच डोंगर असल्याने येथुन खूप दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो पण या डोंगरावर कोणत्याही प्रकारचे किल्लेवजा अथवा सरंक्षणदृष्टया केलेले बांधकाम दिसुन येत नाही. पठारावरून मंदीर पाहुन परत जाण्यास एक तास पुरेसा होतो. टीप – हे केवळ डोंगराई देवीचे मंदीर असलेले ठिकाण असुन याला किल्ला म्हणुन संबोधणे योग्य नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!