डेरमाळ

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ३५२० फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्रात सर्वात जास्त किल्ले असलेला जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यात ६५ पेक्षा जास्त गिरीदुर्ग असुन यातील बहुतांशी किल्ले अपरिचित आहेत. शिवकाळाचा परीसस्पर्श न लाभल्याने अपरिचित राहिलेला असाच एक गिरीदुर्ग म्हणजे डेरमाळ किल्ला. हरिश्चंद्रगडाप्रमाणे अर्धगोलाकार आकाराचा भैरवकडा व साल्हेर-मुल्हेर अहिवंत यांच्याइतका विस्तार लाभुन देखील हा दुर्गम किल्ला दुर्गप्रेमीना फारसा परीचीत नाही. गाळणा डोंगररांगेवर गाळणा किल्ल्याच्या परीघात असलेला हा किल्ला नाशिक शहरापासुन १२८ कि.मी.अंतरावर तर सटाणा येथुन ३८ कि.मी. अंतरावर आहे. डेरमाळ किल्ल्याच्या पायथ्याशी तीन दिशांना टिंघरी, बिलपुरीचे व प्रतापपुर अशी गावे असुन खाजगी वाहन सोबत असल्यास टिंघरी गावातुन जाणे जास्त सोयीचे आहे. टिंघरी गावातून डेरमाळ किल्ला नजरेस पडत नाही. टिंघरी गावातुन प्रतापपुरकडे जाणारा पक्का डांबरी रस्ता असुन हा रस्ता हिंदळबारी (खिंड) घाटातुन जातो. डेरमाळ किल्ला ज्या पठारावर वसलेला आहे ते पठार या खिंडीला लागुन आहे. पिसोळ किल्ल्यावरून चालत आल्यास साधारण ३ तासात आपण याच हिंदळबारी घाटात पायउतार होतो. खाजगी वहानाने टिंघरी गावातुन हिंदळबारी खिंडीत असलेल्या हिडंबादेवीच्या मंदीरापर्यंत जाता येते. या मंदिरासमोरच पठारावर जाण्यासाठी मळलेली ढोरवाट आहे. ... या वाटेने अर्ध्या तासात पठारावर व तेथुन पाउण तासात किल्ल्यावर पोहोचता येते अन्यथा टिंघरी गावातुन गडावर जाण्यासाठी २ ते २.३० तास तर बिलपुरी गावातुन गडावर जाण्यासाठी २.३० ते ३ तास लागतात. गाडी सोबत असल्यास आपला २० टक्के डोंगर चढण्याचा त्रास कमी होतो व एक तासाची पायपीट वाचते. धुळेमार्गे आल्यास आपण प्रथम प्रतापपुर गावात व नंतर हिंदळबारी (खिंड) घाटातुन टिंघरी गावात पोहोचतो. हिंदळबारी घाटातील हिडंबादेवीच्या मंदीराच्या आसपास प्राचीन मंदीराचे अवशेष पहायला मिळतात. हे मंदीर येथे असावे कि किल्ल्यावरील मंदीराचे अवशेष येथे आणले असावे हे सांगता येत नाही. येथुन मळलेल्या वाटेने पठारावर आल्यावर दुरूनच दोन डोंगरावर पसरलेला किल्ला नजरेस पडतो. किल्ल्याखालील हे पठार थेट डेरमाळ किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गेलेले आहे. प्रशस्त अशा माळावर डेरा टाकलेला हा किल्ला आपले डेरमाळ हे नाव सार्थ करतो. पुर्वी या पठारावर पावसाळ्यात शेती केली जात असे, आता मात्र हे पठार ओसाड पडलेले आहे. या पठाराच्या सुरवातीस मातीचा पावसाळी बंधारा असुन त्यावरून पुढे आल्यावर उजव्या बाजुस किल्याकडे जाणारी वाट आहे. या वाटेने पुढे आल्यावर ३ फ़ुट उंच दगडावर घोड्यावर बसलेला योध्दा कोरल्याची विरगळ पहायला मिळते. या पठारावर काही ठिकाणी नक्षीकाम केलेले दगड विखुरलेले असुन विरगळीसमोर काही अंतरावर सुकलेला तलाव आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी एकुण तीन दरवाजे असुन यातील एक दरवाजा बिलपुरी गावाच्या वाटेवर आहे तर तर उर्वरीत दोन दरवाजे आपण जात असलेल्या टिंघरी गावाच्या वाटेवर आहेत. विरगळी पासून किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असुन सरळ जाणारी मळलेली वाट ही दोन डोंगराच्या लहानशा घळीतुन किल्ल्यावर जाते तर उजवीकडील वाट किल्ल्याच्या दक्षिण दरवाजात जाते. दुसरी वाट फारशी मळलेली नसुन या वाटेच्या शेवटच्या टप्प्यात घसारा असल्याने व किल्ला पहाण्यासाठी संपुर्ण डोंगराला वळसा मारावा लागत असल्याने शक्यतो पहिल्या वाटेचा वापर करावा. विरगळ पाहुन १५ मिनीटात आपण डोंगराच्या पायथ्याशी पोहोचतो. येथुन थोडे वर चढल्यावर किल्ल्याची तटबंदी डावीकडे ठेवत कातळात कोरलेल्या ओबडधोबड पायरीमार्गाने आपण गडावर प्रवेश करतो. गडाचा हा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन याच्या शेजारी असलेल्या दोन्ही बुरुजांची देखील पडझड झालेली आहे. गडावर फ़ारसा वावर नसल्याने वाटा मोडलेल्या असुन गडावरील अवशेष शोधावे लागतात. गडावर प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला एक वाट गेली असुन समोर भैरवकडा तर उजव्या बाजुला बालेकिल्ल्याची टेकडी दिसते. गडावर प्रवेश केल्यावर सर्वप्रथम आपण गडाचा डावीकडील तटबंदीचा भाग पाहुन घ्यावा. या भागात फारसे अवशेष नसुन गडाच्या या टोकावर शेवाळयुक्त पाण्याने भरलेले कातळात कोरलेले मोठे टाके आहे. येथुन आपण आलो ते संपुर्ण पठार नजरेस पडते. गडाची हि बाजु पाहुन झाल्यावर पुन्हा प्रवेशाच्या ठिकाणी यावे व गडाची उजवीकडील टेकडी चढण्यास सुरवात करावी. वाटेच्या सुरवातीस कातळात कोरलेले आयताकृती टाके असुन त्याच्या वरील बाजुस चौकोनी आकाराचे दुसरे टाके आहे. येथुन थोडे वर चढल्यावर गाळाने अर्धवट भरलेले टाके असुन ते पाहुन वर चढल्यावर आपण बालेकिल्ल्याखालील सपाटीवर पोहोचतो. येथे सपाटीवर सात लहानमोठी टाकी एका रांगेत कातळात कोरलेली आहेत. हि सर्व टाकी पाण्याने भरलेली असली तरी केवळ एका टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. येथुन बालेकिल्ल्याच्या दिशेने निघाल्यावर बालेकिल्ल्याच्या तटबंदीजवळ अजुन दोन मोठी व एक लहान अशी तीन टाकी पहायला मिळतात. यातील एक मोठे टाके कोरडे असुन उर्वरीत दोन टाक्यात हिरवेगार पाणी आहे. या टाक्यांच्या पुढील भागात दाट झाडी असुन या झाडीत किल्ल्याची तटबंदी व कातळात खोदलेली दोन मोठी पाण्याची टाकी पहायला मिळतात. ती पाहुन मागे फिरावे व आधीच्या टाक्याकडून बालेकिल्ल्याची तटबंदी चढण्यास सुरवात करावी. हि तटबंदी चढुन वर आल्यावर वाटेच्या डाव्या बाजुस एका लहान झाडाखाली झीज झालेली गणेशमुर्ती असुन काही अंतरावर हनुमान,तीन शिवलिंग व एक देवीची लहान मुर्ती आहे. येथुन डावीकडील वाट खाली उतरत जाते तर उजवीकडील बालेकिल्ल्याच्या माथ्यावर जाते. बालेकिल्ल्याचा माथा चार बुरुजांनी व तटबंदीने बंदिस्त केला असुन सध्या या अवशेषांवर मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने नीटपणे फिरता येत नाही. बालेकिल्ल्याचा दरवाजा दोन बुरुजात बांधलेला असुन तेथे देखील भयानक झाडी वाढल्याने जाता येत नाही. बालेकिल्ल्याचे अंतर्गत अवशेष पहाता येथे कधीकाळी मोठा वाडा असावा. बालेकिल्ल्यात चौकोनी आकाराचे बुजलेले टाके पहायला मिळते. बालेकिल्ल्याचा हा भाग गडावरील सर्वात उंच ठिकाण असुन या ठिकाणी गडाची समुद्रसपाटीपासुन उंची ३५२० फुट आहे. गड माथ्यावरून पिसोळ, साल्हेर-सालोटा, मुल्हेर-मोरा-हरगड, मांगी- तुंगी व भामेर या किल्ल्यांचे दर्शन होते. बालेकिल्ला पाहुन गणेश मुर्तीकडून खाली उतरत जाणाऱ्या वाटेने डावीकडे वळल्यावर आपण एका भुमिगत गुहेपाशी पोहोचतो. स्थानिक लोक या गुहेचा कोरडी वखार असा उल्लेख करतात. गुहेचे तोंड अतिशय लहान असल्याने त्यात वाकुन प्रवेश करावा लागतो. गडावर मुक्काम करायचा असल्यास ७ ते ८ लोक या गुहेत सहज राहु शकतात. येथे आपली बालेकिल्ल्याची फेरी पुर्ण करून भैरवकड्याकडे निघावे. भैरवकड्याच्या काठावर एका मोठ्या वास्तुचे अवशेष असुन या वास्तुची केवळ एक भिंत व त्यातील कमान शिल्लक आहे. बालेकिल्ला फिरताना हा दरवाजा सतत आपल्या नजरेस पडत असल्याने या वास्तुची ओढ निर्माण होते पण हि कमान व भिंत वगळता येथे कोणतेही अवशेष नाहीत. हा बहुदा किल्लेदाराचा वाडा असावा. या वास्तुच्या आतील बाजुस कड्याच्या काठावर दोन पाउले कोरलेली असुन स्थानिक लोक या पाउलांना भैरव देवाची पावलं म्हणतात. येथुन अर्धगोलाकार आकाराच्या भैरवकड्याचे सुंदर दर्शन घडते. कडा हजार बाराशे फूट सरळसोट तुटलेला असुन या बाजुस प्रतापपूर गाव वसलेले आहे. या वास्तुच्या कमानीसमोर काही अंतरावर कातळात कोरलेली पाण्याची दोन टाकी असुन यातील एक टाके जोडटाके आहे. वास्तुच्या उजवीकडे पठाराच्या दिशेने असलेली सोंडेवर गेले असता तटबंदीचे व घरांचे अवशेष पहायला मिळतात. या सोंडेवरून पठारावर जाण्यासाठी चोरदरवाजाची वाट आहे पण ती फारशी मळलेली नाही. येथुन पुन्हा कमानीजवळ परतुन कमानीच्या डाव्या बाजूने आपली पुढील गडफेरी सुरु करावी. या वाटेने सुरवात केल्यावर सर्वप्रथम वाटेच्या डाव्या बाजुस कोरडा पडलेला पावसाळी तलाव पहायला मिळतो. या वाटेवर कातळात अर्धवट कोरलेले एक टाके आहे. येथुन पुढे जाणारी वाट आपल्याला खाली माचीवर घेऊन जाते. या वाटेवर कातळात कोरलेले पाण्याचे एक मोठे जोडटाके असुन स्थानिकांनी याला समुद्री टाके नाव दिलेले आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. किल्ल्याच्या उत्तर भागातले हे अवशेष पहाताना आपण बरेच खाली उतरून आलो असल्याने पुन्हा वर न चढता दक्षिण दिशेने किल्ल्याला वळसा मारण्यास सुरवात करावी. या वाटेने पुढे जाताना डोंगर उतारावर घडीव दगडात बांधलेली किल्ल्याची तटबंदी पहायला मिळते. या वाटेने अजुन पुढे गेल्यावर कातळात कोरलेली अजुन दोन टाकी पहायला मिळतात. या टाक्यांच्या पुढून खाली उतरत जाणारी वाट म्हणजे बिलपुरी गावातुन किल्ल्यावर येणारी वाट आहे. आपला गडप्रदक्षिणा मार्ग सरळ पुढे जात असला तरी खाली उतरून या वाटेवरील दरवाजा व इतर अवशेष पाहुन घ्यावेत. या वाटेने खाली उतरल्यावर सर्वप्रथम पाण्याचे एक टाके लागते. टाक्याच्या पुढील भागात समोरच्या डोंगराच्या दिशेने खिंडीत उतरत जाणारी वळणदार वाट असुन या वाटेवर कधीकाळी तीन दरवाजे असल्याच्या केवळ खुणा शिल्लक आहेत. हे सर्व पाहुन पुन्हा माचीवर येण्यासाठी साधारण ४० मिनीटे लागतात. माचीवरून आपली पुढील गडफेरी सुरु केल्यावर जवळपास अर्ध्या डोंगराला वळसा घालुन आपण किल्ल्याच्या दक्षिण भागात येतो. शेवटच्या टप्प्यात हि वाट अतिशय धोकादायक असुन दरीकाठावरून भटकंती करण्याचा अनुभव नसलेल्यांनी या वाटेच्या नादी न लागता बिलपुरी दरवाजा पाहुन मागे फिरावे. या वाटेने पठाराच्या दिशेला आल्यावर समोर काहीशा उंचीवर सहा गुहा दिसतात. यातील एक गुहा निसर्गनिर्मित असुन उर्वरीत पाच गुहा मानव निर्मित आहेत. यातील दोन गुहा म्हणजे पाण्याची टाकी असुन यातील एका टाक्यातील पाण्याची तुलना सिंहगडवरील देवटाक्यातील पाण्याशी करता येईल इतके ते चवदार आहे. उर्वरीत तीन गुहा मुक्काम करण्यायोग्य असल्या तरी या गुहा उभ्या कड्यात असल्याने गुहेबाहेर वावरण्यास जागा नाही. शिवाय गुहेत जाण्याच्या वाटाही सहजसोप्या नाहीत. किल्ल्याचा हा उतार घसारायुक्त असुन कड्याच्या या भागापासुन खाली दरीपर्यंत उतारावर तटबंदी बांधलेली आहे. हि तटबंदी बहुतांशी ढासळलेली असुन यातील दोन दरवाजांनी देखील माना टाकल्या आहेत. या वाटेवरील तीव्र घसारा सांभाळून पार करत आपण किल्ल्याखालील पठारावर असलेल्या सुकलेल्या तलावाजवळ पोहोचतो व हिंदळबारीच्या दिशेने आपला परतीचा प्रवास सुरु होतो. किल्ल्याच्या काही भागात प्रचंड झाडी वाढलेली असल्याने अवशेष शोधण्याचे काम जिकीरीचे आहे. किल्ल्याचा विस्तार चांगलाच मोठा असुन संपुर्ण किल्ला फिरायला चार तास लागतात. डेरमाळ किल्ल्याचा इतिहास उपलब्ध नसला तरी खानदेश-सुरत बंदर जोडणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावरील त्याचे स्थान पहाता मध्ययुगीन काळात हा महत्वाचा किल्ला असावा. १३ व्या शतकात गवळी राजा महेश याने या किल्ल्याची निर्मीती केल्याचे मानले जाते. १४व्या शतकात राठोडवंशीय बागुलराजा नानदेव होता याने गवळी राजा महेश याचा पराभव करून साल्हेर, मुल्हेर,डेरमाळ व पिसोळ किल्ले जिंकले. त्यानंतर या प्रदेशावर राठोड वंशीय बागुल राजे राज्य करू लागले व त्यांच्या नावानेच हा प्रदेश बागलाण म्हणुन ओळखला जाऊ लागला. इ.स.१६३७ मध्ये बागलाणचा हा परिसर मुघलांच्या ताब्यात गेला. शिवकाळात हा प्रांत मराठ्यांच्या ताब्यात असला तरी या पिसोळ-डेरमाळ किल्ल्यांचा कोठे उल्लेख येत नाही. इ.स. १८१८ मध्ये बागलाण प्रांत ब्रिटिशांच्या ताब्यात आला व येथे ब्रिटिश सत्ता सुरू झाली. टीप- हिंदळबारीच्या अलीकडे चार-पाच घरे असुन तेथे किल्ल्याची खडानखडा माहीती असलेला पंडीत नावाचा ६० वर्षाचा तरुण वाटाड्या रहातो. गडावर फारसा राबता नसल्याने तसेच वाटा मोडलेल्या असल्याने किल्ला पहाण्यासाठी वाटाड्या घेऊन जावा. योग्य नियोजन केल्यास खाजगी वहानाने डेरमाळ व पिसोळ हे दोन्ही किल्ले एका दिवसात पहाता येतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!