डहाणु

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : 0

श्रेणी : सोपी

महाराष्ट्राच्या ७५० कि.मी. लांब असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर लहानमोठे असे अनेक दुर्ग वसलेले आहे. यातील उत्तर कोकणाच्या टोकावर असलेला शेवटचा किल्ला म्हणजे डहाणु किल्ला. डहाणु किल्ल्यास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने डहाणू स्थानकास उतरावे. डहाणू रोड स्थानकापासून साधारण चार कि.मी. अंतरावर असलेल्या या किल्ल्यावर रिक्षाने १० मिनिटात पोहोचता येते. डहाणू किल्ला डहाणु खाडीच्या मुखावर वसलेला असुन किल्ल्याच्या पश्चिमेस व दक्षिणेस असणाऱ्या खाडीमुळे किल्ल्याला नैसर्गिक सरंक्षण लाभलेले आहे. खाडीच्या दक्षिणेकडे मुख्यतः कोळी समाजाची वस्ती आहे. सध्या या किल्ल्याचा वापर सरकारी कार्यालयासाठी होत असल्याने सुट्टीचा दिवस वगळता किल्ल्यावर मोकळेपणाने फिरता येत नाही. मुळ किल्ल्याचे बाहेरील स्वरूप आजही कायम असुन सरकारी कार्यालयाच्या वापरामुळे किल्ल्याचे अंतर्गत स्वरूप पुर्णपणे बदललेले आहे. रिक्षाने आपण किल्ल्याच्या उत्तरेकडील तटबंदीत नव्याने बांधलेल्या पायऱ्याजवळ पोहोचतो. ... या पायऱ्याच्या दोन्ही बाजुस किल्ल्यातील दोन तोफा मांडुन ठेवण्यात आल्या आहेत. आपला येथुन किल्ल्यात प्रवेश होत असला तरी किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पुर्वेकडील तटबंदीत असुन ते आजही वापरात आहे. या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन यातील एका देवडीत तांदळा स्वरूपातील देवतेची स्थापना करण्यात आली आहे. चौकोनी आकाराचा हा किल्ला साधारण अर्धा एकरवर पसरलेला असुन तटबंदीच्या चार टोकावर चार बुरुज बांधलेले आहेत. किल्ल्याच्या अंतर्गत भागात एक विहीर वगळता इतर कोणतीही इमारत शिल्लक नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या वास्तु या ब्रिटिशांच्या काळात बांधलेल्या आहेत. किल्ल्याच्या तटाला बाहेरून फेरी मारताना किल्ल्याबाहेर असलेल्या तटरक्षक दलाच्या कार्यालयाच्या आवारात दोन तोफा पहायला मिळतात. संपुर्ण किल्ला पाहण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. इ.स.पहिल्या शतकापासून डहाणू प्रांताचा प्रसिद्ध बंदर असे संदर्भ मिळतात. प्राचीन काळी डहाणू हे एक मोठे बंदर होते. नाशिकच्या गुहांमधे डहाणुका शहर व नदीचा उल्लेख सापडतो. नहपान राजाचा जावई उशवदत्त ह्याने डहाणू खाडीतून होडीमार्गे जाण्याची सोय केली होती असाही उल्लेख आहे. दमण व तारापूर यातील समुद्री दळणवळणावर नजर ठेवण्यासाठी डहाणू किल्ला महत्वाचा होता. इ.स. १५३४ साली पोर्तुगीजांनी गुजरातच्या सुलतानाकडून डहाणू प्रांत ताब्यात घेतला व येथे लहानसा कोट बांधला. पुढे डहाणू बंदराचे महत्व लक्षात घेऊन कॅप्टन नोसा सेन्होरा दा ऑगस्टीया याने नव्याने डहाणू किल्ला बांधला. शिवकाळात डहाणुवर पोर्तुगीजांचे राज्य होते. इ.स.१५८२ मधे मुघलांनी डहाणुवर आक्रमण केले पण ते परतवले गेले. इ.स. १६८३ च्या मे महिन्यात संभाजी महाराजांनी डहाणू प्रांतावर हल्ला चढवला होता. पोर्तुगीज कागदपत्रात या किल्ल्याच्या शिबंदीत एक कप्तान, काही पोर्तुगीज, दोन कार्पोरल, तीन संदेशवाहक, दोन अरबी घोडेस्वार, काही ख्रिश्चन कुटुंबे तसेच काही शिकारी ससाणे असल्याचे उल्लेख मिळतात. चिमाजीअप्पांच्या वसई मोहिमेत ११ जानेवारी १७३९ साली राणोजी शिंदे यांनी डहाणू किल्ला मराठयांच्या ताब्यात आणला व गडावर भगवे निशाण फडकले. डीसेंबर १७८१ साली इंग्रजांनी डहाणु किल्ला जिंकला पण लगेचच म्हणजे १७८२ मध्ये मराठयांच्या ताब्यात दिला. सन १८१७च्या इंग्रज मराठा करारानंतर डहाणू किल्ला इंग्रजांकडे आला. या वेळच्या नोंदीत किल्ल्याला तीन मीटर रुंद व ११-१२ मीटर उंच तट, चार देखणे मनोरे व भक्कम बांधकामाचे बुरूज असल्याचे म्हटले आहे. इ.स.१८६२च्या पहाणीत डहाणू येथे पडीक विहीर असलेला व झाडी मातलेला एक भक्कम किल्ला होता. इ.स.१८८८ मध्ये येथे पोलीस व तहसील कार्यालय उभारताना जुन्या वास्तू नामशेष करून नवीन इमारती बांधण्यात आल्या. या इमारती आजही वापरात आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!