डच वखार

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : सिंधुदुर्ग

उंची : 0

श्रेणी : सोपी

महाराष्ट्रात सातवाहन, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, कदंब या सत्तांनी प्राचीन काळापासून दुर्गबांधणी केली. त्यानंतर मध्ययुगीन काळात मोगल,बहामनी,सिद्दी ,इंग्रज,पोर्तुगीज, मराठा या सत्तांनी देखील मोठ्या प्रमाणात दुर्गरचना केली. पण डचांनी बांधलेली केवळ एकमेव गढी आज महाराष्ट्रात आहे आणि ती म्हणजे वेंगुर्ला येथील गढीवजा वखार. आज या गढीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असुन वेळीच लक्ष न दिल्यास हि वास्तु काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्यता आहे. डचांनी महाराष्ट्रात बांधलेला हा एकमेव किल्ला वेळीच जपायला हवा नाहीतर हि वास्तु नष्ट झाली की हळहळत बसावं लागेल. वेंगुर्ले वखार शहराच्या मध्यभागी असल्याने वेंगुर्ला शहरात आल्यावर सहजपणे तिथे पोहोचता येते. दुर्लक्षामुळे या गढीत मोठ्या प्रमाणात झाडे वाढलेली असुन आतील इमारतीत धोकादायक अवस्थेत आहेत. पुरातत्व खात्याने येथे तशा आशयाचा फलकच लावलेला आहे. चौकोनी आकाराची हि गढी एक एकरवर पसरलेली असुन गढीच्या चारही टोकावर चौकोनी आकाराचे चार बुरुज आहेत. ... गढीचा दरवाजाकडील दर्शनी भाग साधारण २०-२२ फुट उंच असुन तटबंदी १०-१२ फुट उंच आहे. गढीच्या मुख्य दरवाजाची कमान अर्धवर्तुळाकार असुन दरवाजाच्या वरील बाजुस झरोका आहे. या तटबंदीत तोफा ठेवण्यासाठी झरोके बांधलेले असुन तटबंदीवर मोठमोठी झाडे वाढलेली आहेत. दरवाजाच्या आतील भागात दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. दरवाजातुन आत शिरल्यावर समोरच पडझड झालेली दुमजली इमारत आहे. इमारतीच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या असुन सावधगिरी बाळगत या जिन्याने वर जाता येते. या मजल्यावर एकात एक अशी अनेक दालने आहेत. यातील एका दालनात वरील भागात जाण्यासाठी अरुंद जिना आहे पण सध्या या जिन्याने वर जाणे धोकादायक झाले आहे. येथुन बाहेर डोकावले असता संपूर्ण वखार नजरेस पडते. संपुर्ण वखारीची फेरी मारली असता तटाला लागुन बांधलेल्या अजून काही वास्तु नजरेस पडतात. याशिवाय वखारीच्या आवारात चौकोनी आकाराची घडीव चिऱ्यात बांधलेली एक खोल विहिर आहे. बुरुजावर तोफा चढविण्यासाठी तटाला लागुन उतार बांधलेला आहे. वखारीत आज एकही तोफ नसली तरी जवळच असलेल्या वेंगुर्ला बंदरावर २ तोफा पहायला मिळतात. वेंगुर्ले प्राचीन काळी एक प्रसिध्द व्यापारी बंदर असल्याने, सोळाव्या शतकात हिंदुस्थानात आलेल्या डच व्यापाऱ्याचे वेंगुर्ले येथे आगमन झाले. हॉलंडहून आलेल्या डच व्यापाऱ्यांचा मराठा कागदपत्रात "वलंदेज" या नावाने उल्लेख आढळतो. वेंगुर्ले हे प्रमुख व्यापारी बंदर असल्याने या ठिकाणी सत्ताधारी असलेल्या विजापूरच्या आदिलशाहाच्या परवानगीने डच व्यापारी प्रमुख 'लिटर्ड' जान्सझून्स याने इ.स. १६५५ साली येथे वखार बांधली. परंतु ती कोसळल्यावर नव्याने किल्ल्यासारखी तटबंदीयुक्त वखार बांधण्यात आली. हि बांधण्यासाठी त्याकाळी तीन हजार गिल्डर (तीन हजार तोळे सोने) एवढा खर्च आला. पोर्तुगीज पध्दतीने बांधलेल्या या वखारीचा माल साठविण्याचे गोदाम तसेच गढी असा दुहेरी वापर व्हावा अशी तिची रचना करण्यात आली. या वखारीवर दहा तोफा व दोनशे बंदुकधारी सैन्याचा पहारा ठेवण्यात आला होता. वखारीवरील तोफांवर आफ्रिकेतील गुलामांची नेमणूक करण्यात आली तर इतर संरक्षणासाठी भारतीय सैनिक होते. इ.स.१६७१ मध्ये बडीबेगमने हज यात्रेस जाण्यापूर्वी या वखारीत मुक्काम केला होता. इ.स. १६८० मध्ये वखारीच्या भोवताली खंदक खोदून त्यावर पुलाची सोय करण्यात आली. अडचणीच्या वेळी हा पूल उचलून घेण्याची सोय होती. वेंगुर्ल्याच्या वखारीत डचांशी वाटाघाटी करण्यासाठी आदिलशहाचे सरदार मुस्तफाखान, अफजलखान, शिवाजी महाराजांतर्फे रंगो पंडीत, नेतो पंडीत येऊन गेल्याची नोंद येते. औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याने काही काळ येथे वास्तव्य केले होते. इ.स.१७३६ मध्ये करवीरकरांच्या फौजेने डच वखार लुटली. त्यानंतर त्यांच्यात झालेल्या तहातील एका कलमानुसार डचांनी मालवण बंदरात वखार बांधण्याची परवानगी मिळविली. इ.स.१७६५ मध्ये इंग्रजांनी वाडीकरांचे यशवंतगड व भरतगड हे किल्ले काबिज केले. त्यावेळी झालेल्या तहात इंग्रजांनी भरतगड किल्ला परत केला व युध्द खर्चापोटी २ लाख रुपये मिळेपर्यंत वेंगुर्ला इंग्रजांच्या ताब्यात राहील अशी अट घातली. त्याप्रमाणे इ.स.१७८० पर्यंत वेंगुर्ला इंग्रजांच्या ताब्यात होते. त्याच वर्षी वाडीकरांनी हल्ला करून वेंगुर्ला शहर व कोट ताब्यात घेतले. इ.स. १७८६ मध्ये करवीरकर व पेशवे यांच्या संयुक्त फौजेने वेंगुर्ला कोट ताब्यात घेतला. पण त्यांची पाठ वळताच वाडीकर व पोर्तुगिज यांच्या संयुक्त सैन्याने तो पुन्हा ताब्यात घेतला. इ.स.१८१३ मध्ये करवीरकर व सावंतवाडीकर यांच्यात झालेल्या युध्दात इंग्रजांनी मध्यस्ती केली. युध्द खर्चापोटी सावंतवाडीकरांनी वेंगुर्ला शहर व कोट इंग्रजांच्या ताब्यात दिले. १९६३ सालापर्यंत या वखारीच्या जागी सरकारी कार्यालये होती. त्यानंतर ही इमारत खाली झाल्यावर त्यातील तुळ्या, वासे, दरवाज्या चौकटी हे सामान चोरीस गेले व इमारतची पडझड होऊन ती केवळ अवशेष रुपाने उभी आहे. डच वकिलातीने १९८३ मध्ये या वखारीच्या संरक्षणाची मागणी केली तेव्हा दहा हजार रुपये खर्चुन या गढीची तात्पुरती डागडुजी करण्यात आली.
© Suresh Nimbalkar

Read more...

छायाचित्रे

error: Content is protected !!