टिपागड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : गडचिरोली
उंची : १९०३ फुट
श्रेणी : मध्यम
गडचिरोली हा जिल्हा आदिवासीबहुल असून या भागातील लोकांची स्वत:ची विशिष्ट अशी संस्कृती आहे. गडचिरोली जिल्ह्यात घनदाट जंगल असल्याने येथील आदिवासी जमातीचे वास्तव्य हे प्रामुख्याने जंगलातच दिसून येते. या लोकांची स्थानिक दैवते असुन हि दैवते जंगल अथवा डोंगरावरच वसलेली आहेत. टिपागड किल्ल्यावर असलेले गुरुबाबा देवस्थान हे त्यातील एक दैवत. मुळात टिपागड हा किल्ला असुन त्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. आजवर नक्षलग्रस्त प्रांत म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या भागात दुर्गभटक्यांची पाउले कधी फिरकलीच त्यामुळे हे दुर्ग स्वतःची ओळख हरवुन बसले आहेत. या भागातील नक्षलवाद आता ओसरला असला तरी पर्यटनाची ठिकाणे फार कमी असल्याने भटक्यांची या भागात तशी वानवाच आहे. नागरी राहणीमानापासुन काहीसा दूरच राहीलेला हा समाज आता मुख्य समाजधारेशी जोडला जात आहे हि समाधानाची गोष्ट आहे. या भागात असलेल्या घनदाट जंगलामुळे येथील किल्ल्यांना वनदुर्ग म्हणावे कि गिरीदुर्ग हेच कळत नाही. हे जंगल आजही इतके दाट आहे कि या जंगलातुन भरदुपारी फिरत असताना देखील आपल्याला संध्याकाळ झाल्याचा भास होतो.
...
विदर्भाचा हा भाग विरळ लोकवस्तीचा असल्याने या भागात खाजगी वाहने देखील फारशी दिसत नाही त्यामुळे सार्वजनीक वाहन दिसणे हि देखील दुर्मिळ गोष्ट आहे. त्यामुळे या भागातील दुर्गांची भटकंती करताना प्रवास व सुरक्षा या दोन्हीच्या दृष्टीने खाजगी वाहनाचा वापर करावा अन्यथा एका दिवसात एक किल्ला पहाणे देखील कठीण आहे. आमच्या गडचिरोली दुर्गभ्रमंतीमध्ये आम्ही या अपरिचीत दुर्गांचा मागोवा घेत त्यांचे नष्ट होत चाललेले अस्तित्व लोकांसमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात टिपागड किल्ला वसलेला आहे. हा किल्ला घनदाट जंगल व नक्षलवादी विभागात असल्याने तेथे जाता येत नाही असे सांगीतले व लिहिले जाते पण आता ते तितकेसे खरे नाही. मोटाझलीया हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव कोरची या तालुक्याच्या ठिकाणाहुन ४२ कि.मी. तर गडचिरोली येथुन धानोरा मार्गे ९८ कि.मी.अंतरावर आहे. कोरची मार्गे जाताना रात्री कुरखेडा येथे मुक्काम करून सकाळी झापरागड,त्यानंतर टिपागड व शेवटी बाजागड असे तीन किल्ले करून शेवटी धानोरा किंवा गडचिरोली येथे मुक्कामास जाता येते पण सोबत खाजगी वाहन असणे गरजेचे आहे. या मार्गाने जाताना झापरागड ते टिपागड दरम्यान काही काळ आपण छत्तीसगड जिल्ह्याच्या हद्दीतुन प्रवास करतो. हा क्रम उलटा देखील करता येईल पण कोरची येथे राहण्याची सोय नाही हि गोष्ट लक्षात ठेवावी. मोटाझलीया गावात शिरणारा पक्का रस्ता गावाबाहेर नदीकाठी जेथे संपतो तेथूनच नदी ओलांडुन किल्ल्यावर जाणारा कच्चा रस्ता आहे. पुर्वी या रस्त्याने जीपसारखे वाहन किल्ल्याच्या अर्ध्या वाटेपर्यंत जात असे पण आता मात्र हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला असुन त्याचे मोठ्या पायवाटेत रुपांतर झाले आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी वाटाड्याची गरज नसली तरी किल्ल्यावरील अवशेष सहजपणे दिसत नसल्याने शक्यतो वाटाड्या सोबत घ्यावा. गावातुन साधारण तासाभरात आपण किल्ल्याच्या तटबंदीजवळ पोहोचतो. हि वाट पुर्णपणे उंच वृक्षांच्या दाट जंगलातुन जात असल्याने उन व थकवा दोन्ही जाणवत नाही. किल्ल्याच्या दरवाजात जाणाऱ्या मूळ वाटा मोडलेल्या असुन आता हीच वाट वापरात आहे. तटबंदीखाली चारपाच पायऱ्या नव्याने बांधलेल्या असुन त्या चढुन तटावरून आपण किल्ल्यात प्रवेश करतो व किल्ल्याचा एकुण पसारा पाहूनच चकित होतो. किल्ल्यावर प्रवेश करताच समोर बारा एकरपेक्षा जास्त परिसरावर पसरलेला तलाव आहे. आपण प्रवेश केला ती रचीव दगडाची तटबंदी दोन डोंगरांच्या घळीत बांधलेली असुन या तटबंदीची रुंदी ५ते ६ फुट असुन उंची साधारण ८ ते १० फुट आहे. या तटबंदीमध्ये जागोजागी गोलाकार आकाराचे बुरुज बांधलेले आहेत. तटबंदी रचीव दगडाची असली तरी यात वापरलेले दगड मात्र खूप मोठ्या आकाराचे आहेत. घळीतील हि तटबंदी नंतर दोन्ही बाजुस डोंगराच्या वरील दिशेने गेलेली आहे. समोर दिसणारा तलाव दोन डोंगरामधील उतारावर बांधलेला असुन हा तलाव पाण्याने वर्षभर तुडुंब भरलेला असतो. डोंगराच्या माथ्यावर वर्षभर पाण्याने भरलेला हा प्रशस्त तलाव म्हणजे एक आश्चर्य म्हणावे लागेल. हि तटबंदी पाहुन झाल्यावर तलावाच्या डावीकडील वाटेने समोरील बाजुस दिसणाऱ्या दोन वास्तुकडे निघावे. डावीकडील बाजुस उंचावर दिसणारी गडाची तटबंदी पहात पाच मिनिटात आपण या वास्तुकडे पोहोचतो. तलावाची दुसरी बाजू म्हणजे पाणी अडविण्यासाठी घातलेली रुंद भिंत असुन य भिंतीच्या खालील बाजुस गडाची तटबंदी पहायला मिळते. येथे असलेल्या दोन वास्तुतील एक वास्तु म्हणजे वनखात्याने बांधलेला निवारा असुन दुसरी वास्तु म्हणजे गडदेवतेचे मंदिर आहे. स्थानिक लोक या वास्तुस गडकुरी माता मंदिर म्हणुन ओळखतात. मंदिराकडून तलावाच्या वाटेने थोडे पुढे गेले असता अजून एक लहान मंदीर पहायला मिळते. या मंदीरात शिवलिंग, गणपपती, हनुमान या कोरीव मुर्ती असुन इतर महादेवाच्या सिमेंटच्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. येथुन पुन्हा गडकुरी माता मंदिराकडे यावे व समोर दिसणाऱ्या तटबंदीवर चढावे. हि तटबंदी खाली डोंगर उतारावर बांधत नेलेली असुन यात जागोजागी गोलाकार बुरुज आहेत. या तटबंदीची उंची साधारण १५ फुट असुन काही ठिकाणी ती २५ फुटापर्यंत वाढवत नेलेली आहे. हि तटबंदी पाहुन झाल्यावर मागे फिरावे व येताना आपण बंधाऱ्यावर जेथे उतरलो तेथे यावे. येथे पायऱ्यांची एक वाट तटबंदी शेजारून वर जाताना दिसते. या पायऱ्या चढुन वर गेले असता उजवीकडील तटबंदीमध्ये गडाबाहेर जाणारा लहान दरवाजा पहायला मिळतो. पण हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा नसावा. तटबंदी बाहेर जाऊन किल्ल्याचा हा दरवाजा पाहुन घ्यावा व पुन्हा आत येऊन तटबंदी शेजारून वर चढण्यास सुरवात करावी. साधारण १० मिनिटाचा उभा चढ चढुन आपण एका प्रचंड शिळेखाली असलेल्या गुहेजवळ पोहोचतो. हि गुहा म्हणजे गुरु टीपाबाबा यांची समाधी आहे. हि गुहा तटाखाली असुन गुहेच्या वरील बाजुस गडाची तटबंदी व त्यात बुरुज आहेत. येथुन बर गेली असता आपण डोंगर माथ्यावर पोहोचतो पण तेथे दाट जंगल असल्याने काहीच दिसत नाही. येथुन खाली उतरून बंधाऱ्यावर आले असता आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला फिरण्यासाठी दीड तास पुरेसा होतो. गोंदीया-गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या इतर अनेक वनदुर्गांप्रमाणे या किल्ल्याचे देखील संदर्भ वा माहिती उपलब्ध नाही. मध्ययुगीन व उत्तर मध्ययुगीन काळात विदर्भावर वेगवेगळ्या राजवंशांनी आपल्या सत्ता स्थापन केल्या व किल्ले बांधले. साधारण सहाव्या शतकात या भागावर राष्ट्रकूट राजांचे राज्य होते.११ -१२ व्या शतकात देवगिरीचे यादव यांनी या प्रदेशावर सत्ता प्रस्थापित झाली. गोंड राजवटीचा उदय इ. स. १३ व्या शतकाच्या मध्यार्धात पूर्व विदर्भात झाला व त्यांनी या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ३५० वर्षे राज्य केले. त्यामुळे त्यांनी चंद्रपूर आणि गडचिरोली भागात मध्ययुगीन कालखंडात साधारण २० किल्ले बांधले. टिपा या शब्दाचा गोंड भाषेत अर्थ द्वीप असा होतो. पूरमशाह नावाचा गोंड राजा येथे राज्य करीत होता आणि त्याने आजच्या छत्तीसगडचा बराच भाग जिंकला होता. टिपागडचा राजा पुरमशहाच्या अंतानंतर या किल्ल्यातील खजिना आपल्याला मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले त्यासाठी तत्कालीन गुरुबाबा यांच्यावर प्रचंड दबाव आणला गेला त्याला कंटाळून गुरुबाबांनी टिपागडच्या तलावात जलसमाधी घेतली अशी आख्यायिका स्थानीक टिपागड बाबत सांगतात. टिपागडचे अनुपम निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी एकदा तरी या गडाला भेट द्यायलाच हवी.
© Suresh Nimbalkar