टाकळी भोकरदन
प्रकार : गढी
जिल्हा : जालना
स्वतंत्रपुर्व काळात मराठवाडा निजामाच्या शासनाखाली असल्याने तेथील प्रशासन व्यवस्था पुर्णपणे वेगळी होती. या भागात महसुल गोळा करण्यासाठी असलेले केंद्र हे गढी स्वरूपात होते. याशिवाय काही मातब्बर सरदारांनी तसेच जमीनदारांनी देखील स्वतःच्या संरक्षणासाठी वाड्याभोवती गढीवजा कोट बांधले होते. यामुळे मराठवाड्याची भटकंती करताना आपल्याला मराठवाड्यात असंख्य गढीवजा कोट पहायला मिळतात. भोकरदन जवळील टाकळी या गावात केळणा नदीकाठी असलेल्या लहानशा टेकडीवर आपल्याला अशीच एक उध्वस्त गढी पहायला मिळते. काळाच्या ओघात या गढीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असली तरी काही भिंती व दोन बुरुज आजही आपले अस्तित्व राखून आहेत. स्थानिक लोक येथील दगड माती आपली घरे बांधण्यासाठी वापरात असल्याने हे अवशेष देखील काळाचेच सोबती आहेत. महाराष्ट्रात टाकळी नावाची अनेक गावे असुन जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात एक व जाफराबाद तालुक्यात एक अशी दोन गावे आहेत. महत्वाचे म्हणजे हि दोन्ही गावे केळणा नदीच्या काठावर भोकरदन –जाफराबाद या वाटेवर आहेत. आपण आता भेट देत आहोत ते गाव भोकरदन तालुक्यात असल्याने टाकळी भोकरदन म्हणुन ओळखले जाते.
...
टाकळी भोकरदन हे गाव भोकरदन या तालुक्याच्या ठिकाणाहुन १५ कि.मी. अंतरावर तर जाफराबाद येथुन २५ कि.मी.अंतरावर आहे. हे गाव भोकरदन –जाफराबाद महामार्गावरील सिपोरा बाजार या फाट्यावरून साधारण ५ कि.मी. आतील बाजुस आहे. मध्ययुगीन काळात जाफराबाद व भोकरदन हि दोन्ही महत्वाची शहरे असल्याने या दोन्ही शहरात व्यापार उदीम असणे साहजिकच होते. मराठवाड्यातील पाण्याची कमतरता पहाता या दोन्ही शहरामध्ये होणारा व्यापारी तसेच सैन्य प्रवास हा केळणा नदीच्या काठाने होत होता. त्यामुळे या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केळणा नदीच्या काठावर एक संरक्षित ठाणे म्हणुन या गढीची बांधणी झाली असावी. नदी पार करून टाकळी गावात प्रवेश केल्यावर एक लहान रस्ता जुन्या टाकळी गावात जातो. या वाटेवरच डाव्या बाजुला नदीकाठी एका टेकाडावर गढीचे अवशेष पहायला मिळतात. या टेकडावर आज एकही बुरुज दिसत नसला तरी खाली उतारावर पांढऱ्या मातीचे दोन बुरुज व तटबंदीच्या भिंती पहायला मिळतात. या बांधकामात असलेले दगड गढीच्या आसपास असलेली घरे बांधण्यासाठी वापरले आहेत. गढीपासुन काही अंतरावर घडीव दगडात बांधलेल्या चार समाधी आहेत. या समाधी गोसावी समाजाच्या असुन गिरी घराण्यातील असल्याचे स्थानिक सांगतात पण गढीबद्दल त्यांना काहीच माहीती सांगता येत नाही. मराठवाड्याचा हा भाग निजामाच्या ताब्यात असल्याने व गढीचा वापर निजामकाळातच बंद झाल्याने गढीचा इतिहास ज्ञात नाही. गढीचे फारसे अवशेष शिल्लक नसल्याने गढी व समाधी पहाण्यासाठी १५ मिनिटे पुरेसी होतात.
© Suresh Nimbalkar