टाकळी ढोकेश्वर

प्रकार : शैव लेणी

जिल्हा : अहमदनगर

श्रेणी : सोपी

संपुर्ण भारतात आढळणाऱ्या १२०० लेण्यांपैकी साधारण ८५० लेणी एकटया महाराष्ट्रात आहेत. हे ऐकायला जरी बरे वाटत असले तरी यातील ३०-४० लेणी वगळता इतर लेणी अज्ञातवासात आहेत हे वास्तव आहे. अज्ञातवासात असलेल्या या लेण्यांपैकी एक लेणे म्हणजे टाकळी ढोकेश्वर. अहमदनगर जिल्ह्य़ातील पारनेर तालुक्यात टाकळी गावात असलेले हे लेणे नगरहुन ४० कि.मी.अंतरावर तर पारनेर या तालुक्याच्या ठिकाणाहुन २१ कि.मी.अंतरावर आहे. टाकळी गाव ते ढोकेश्वर लेणी हे अंतर साधारण ५ कि.मी.आहे. कल्याण-नगर महामार्गाने टाकळी गाव पार केल्यावर महामार्गाच्या डाव्या बाजुस ढोकेश्वरची लेणी असलेली लहानशी टेकडी दिसते. या टेकडीच्या मध्यातच ढोकेश्वरची शैवलेणी कोरलेली आहेत. लेण्याचा ताबा पुरातत्व खात्याकडे असुन त्यांनी लेणींपर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. टेकडीच्या पायथ्यापासुन टेकडीच्या मध्यात असलेले लेण्याचे प्रवेशद्वार व तटबंदी ठळकपणे दिसुन येते. ... पायऱ्यांच्या सुरुवातीला डाव्या बाजुस एक दगडी रांजण पहायला मिळतो. येथुन साधारण ५०-६० पायऱ्या चढुन गेल्यावर प्रवेशद्वाराआधी उजवीकडे एक समाधी मंदीर व दुसरा समाधी चौथरा पहायला मिळतो. समाधी मंदीरावर काही प्रमाणात कोरीवकाम केलेले असुन दरवाजावर गणेशशिल्प कोरलेले आहे. समाधी मंदीराच्या आतील चौथऱ्यावर शिवलिंग मांडले आहे. बाहेरील दुसऱ्या समाधी चौथऱ्याला लागुनच एक एक शरभशिल्प ठेवलेले आहे. हे शिल्प बहुधा लेणीच्या तटबंदीतील असावे. लेणींच्या पायऱ्या चढताना काही ठिकाणी नक्षीकाम केलेले बांधकामातील दगड पायऱ्यांसाठी वापरलेले दिसुन येतात. तटबंदीमधील दरवाजाने लेण्याच्या आवारात प्रवेश केल्यावर चौथऱ्यावर उभारलेली दगडी दीपमाळ दिसुन येते. ढोकेश्वरचं लेणं बऱ्यापैकी मोठे असुन लेण्याच्या दोन्ही बाजूस शालभंजिका कोरलेल्या आहेत. लेण्याचा आतील सभामंडप चार स्तंभावर तोललेला असुन डाव्या बाजुस सप्तमातृकापट त्यांच्या वाहनांसह कोरलेला आहे. या पटाच्या एका टोकावर गणपती तर दुसऱ्या टोकाला वीरभद्र कोरलेला आहे. लेण्यातील एका भिंतीवर झीज झालेले गजलक्ष्मी शिल्प आहे. गर्भगृहाच्या दरवाजावर दोन्ही बाजूस हातात फुले घेतलेल्या द्वारपाल असुन त्यांच्या डोक्यामागे प्रभामंडळ व त्यांच्यावर विद्याधर कोरले आहेत. गर्भगृहाला फेरी मारण्यासाठी प्रदक्षिणापथ कोरलेला असुन गर्भगृहात शिवलिंग व सभामंडपात नंदीची स्थापना केलेली आहे. या प्रदक्षिणापथावर मोठया प्रमाणात वीरगळ दिसुन येतात. लेण्याबाहेर डाव्या बाजुला कातळाच्या पोटात कोरलेले पाण्याचे टाके असुन त्यात पाणी उतरण्यासाठी टेकडीच्या उतारावर दगडात पन्हाळी कोरलेली आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्याच्या वरील बाजुस सीता न्हाणी नावाने ओळखले जाणारे दुसरे पाण्याचे टाके आहे. या टाक्याकडे जाण्यासाठी कातळात खाचा मारल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीने पुरातत्व खात्याने लेण्याचा परिसर नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यात सोमवारी व महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. पर्यटकांची वर्दळ नसलेले हे सुंदर ठिकाण आवर्जुन भेट देण्यायोग्य आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!