टाकळी जाफराबाद
प्रकार : गढी
जिल्हा : जालना
स्वतंत्रपुर्व काळात मराठवाडा निजामाच्या शासनाखाली असल्याने तेथील प्रशासन व्यवस्था पुर्णपणे वेगळी होती. या भागात महसुल गोळा करण्यासाठी असलेले केंद्र हे गढी स्वरूपात होते. याशिवाय काही मातब्बर सरदारांनी तसेच जमीनदारांनी देखील स्वतःच्या संरक्षणासाठी वाड्याभोवती गढीवजा कोट बांधले होते. यामुळे मराठवाड्याची भटकंती करताना आपल्याला असंख्य गढीवजा कोट पहायला मिळतात. जाफराबाद जवळील टाकळी गावात केळणा नदीकाठी असलेल्या लहानशा टेकडीवर आपल्याला अशीच एक उध्वस्त गढी पहायला मिळते. काळाच्या ओघात या गढीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असुन केवळ एक बुरुज, नदीकाठची तटबंदी व गढीचा उंचवटा शिल्लक आहे. महाराष्ट्रात टाकळी नावाची अनेक गावे असुन जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात एक व जाफराबाद तालुक्यात एक अशी दोन गावे आहेत. महत्वाचे म्हणजे हि दोन्ही गावे केळणा नदीच्या काठावर भोकरदन –जाफराबाद या वाटेवर आहेत. आपण आता भेट देत आहोत ते गाव जाफराबाद जवळ व त्याच तालुक्यात असल्याने टाकळी जाफराबाद म्हणुन ओळखले जाते. टाकळी जाफराबाद हे गाव जाफराबाद या तालुक्याच्या ठिकाणाहुन सावरखेडामार्गे ४ कि.मी. अंतरावर आहे.
...
मध्ययुगीन काळात जाफराबाद व भोकरदन हि दोन्ही महत्वाची शहरे असल्याने या दोन्ही शहरात व्यापार उदीम असणे साहजिकच होते. मराठवाड्यातील पाण्याची कमतरता पहाता या दोन्ही शहरामध्ये होणारा व्यापारी तसेच सैन्य प्रवास हा केळणा नदीच्या काठाने होत होता. त्यामुळे या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केळणा नदीच्या काठावर एक संरक्षित ठाणे म्हणुन या गढीची बांधणी झाली असावी. नदी पार करून टाकळी गावात प्रवेश केल्यावर लगेच एक लहान रस्ता उजवीकडे वळतो. हा रस्ता जेथे संपतो तेथे उजव्या बाजुला गढीचा शिल्लक असलेला एकमेव बुरुज व दगडी तटबंदी पहायला मिळते. गढीची उर्वरीत तटबंदी नदीच्या बाजूने शिल्लक असुन ती पहाण्यासाठी नदीकाठी जावे लागते. स्थानिकांना गढीबद्दल काहीच माहीती सांगता येत नसली तरी हि गढी निजामकाळातील असुन पुर्वी या गढीला चार बुरुज असल्याचे ते सांगतात. मराठवाड्याचा हा भाग निजामाच्या ताब्यात असल्याने व गढीचा वापर निजामकाळातच बंद झाल्याने गढीचा इतिहास ज्ञात नाही. गढी कोसळण्यापुर्वी गढीत मरकज नावाचे कुटुंब वास्तव्यास असल्याने हि गढी मरकाजांची गढी म्हणुन ओळखली जाते, गढीचे फारसे अवशेष शिल्लक नसल्याने गढी पहाण्यासाठी १५ मिनिटे पुरेसी होतात.
© Suresh Nimbalkar