टंकाई

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : २९२० फुट

श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्हय़ात सहय़ाद्रीच्या मुख्य रांगेबरोबर सेलबारी- डोलबारी-अजंठा-सातमाळ अशा विविध उपरांगा धावताना दिसतात. यातील अजंठा-सातमाळ डोंगररांगेतील अंकाई-टंकाई हा एक महत्वाचा किल्ला. सुरत-औरंगाबाद या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली व युध्दशास्त्राच्या दृष्टीने त्याला बळकट करण्यासाठी चोहोबाजूंनी कात्रा मेसणा,गोरक्षगड,माणिकपुंज यासारख्या उपदुर्गांची साखळी तयार केली गेली. टंकाई किल्ल्याच्या पोटात असलेली पुरातन लेणी हा किल्ला प्राचीन काळापासुन अस्तित्वात असल्याच्या निदर्शक आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले अंकाई गाव मध्य रेल्वेवरील मनमाड स्थानकापासुन १० कि.मी.वर असुन मनमाड–औरंगाबाद रस्त्यापासुन १ कि.मी.आत आहे. अंकाई गावात जाण्यासाठी खाजगी वाहनांची सोय आहे. ... किल्ल्यावर जाण्यासाठी मनमाड–औरंगाबाद रस्त्याकडून एक वाट असुन दुसरी वाट अंकाई गावातुन आहे. या दोन्ही वाटा दोन दिशांनी व दोन वेगळ्या दरवाजांनी अंकाई-टंकाई मधील खिंडीत एकत्र येतात. यातील अंकाई गावातुन गडावर जाणारी वाट मोठया प्रमाणात वापरात असल्याने सोयीची आहे. गावात शिरताना गावामागे असलेले अंकाई टंकाई किल्ल्याचे डोंगर व त्यामधील खिंडीत असलेले तटबंदीचे बांधकाम व त्यावरील चर्या ठळकपणे नजरेस पडतात. गावातील शाळेजवळुन किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता असुन या शाळेच्या परिसरात आपल्याला २० फुट उंच दरवाजाची कमान व त्याला लागुन ठेवलेली काही कोरीव शिल्प पहायला मिळतात. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या शाळेपासून काही अंतरावर चार फुट उंच व चारही बाजुस कोरलेली सतीशिळा असुन या शिळेच्या खालील बाजुस मुर्ती व शिकारीचा प्रसंग कोरलेला आहे. टंकाई किल्ल्याच्या पाव उंचीवर किल्ल्याच्या पोटात जैन लेणी खोदलेली असुन शाळेपासून काही अंतरावर पुरातत्व खात्याने या लेण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. शाळेकडून या लेण्यापर्यंत जाण्यासाठी १० मिनिटे पुरेशी होतात. लेण्यातील पहिल्या गुहेत असलेल्या अंबिका या जैन देवतेला भवानी मातेचे रूप देण्यात आले आहे. लेणी पाहुन डोंगर चढायला सुरुवात केल्यावर ओबडधोबड पायऱ्यांनी १० मिनिटात आपण खिंडीतील पहिल्या दरवाजात पोहोचतो. दोन मोठया बुरुजाच्या आत लपवलेल्या या दरवाजासमोर जिभी (आडवी भिंत) बांधुन रणमंडळाची रचना केलेली आहे. किल्ल्यात आपला प्रवेश पुर्वेकडून होत असला तरी आत आल्यावर उजवीकडे वळुन दक्षिणाभिमुख दरवाजाने आपण किल्ल्यात प्रवेश करतो. दरवाजा शेजारील दोन्ही बुरुजांपासुन सुरु झालेली तटबंदी थेट अंकाई-टंकाई किल्ल्यांच्या डोंगरांना भिडली आहे. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन दरवाजाची तुटलेली दारे या देवडीत ठेवली आहेत. दरवाजातुन पायऱ्या चढुन आल्यावर समोरच्या तटबंदीत मनमाड–औरंगाबाद रस्त्याकडून येणारा दुसरा दरवाजा दिसतो. दरवाजाबाहेर काही अंतर जाऊन हा दरवाजा पुर्णपणे पहाता येतो. या दरवाजाने पश्चिमेकडुन प्रवेश होत असला तरी उजवीकडे वळुन उत्तराभिमुख दरवाजानेच आपण किल्ल्यात शिरतो. या दरवाजांची रचना देखील पहिल्या दरवाजासारखीच असुन तिहेरी वळणाच्या या दरवाजाबाहेरील एक बुरुज गोलाकार तर दुसरा बुरुज चौकोनी आहे. दरवाजाच्या आतील एका बाजुस देवडी असुन दुसऱ्या बाजुने किल्ल्यात शिरण्याचा मार्ग आहे. दरवाजासमोर असलेली जिभी मात्र मोठया प्रमाणात ढासळली आहे. या दिशेची तटबंदी देखील दोन्ही किल्ल्यांच्या डोंगरांना भिडली आहे. या किल्याच्या तटबंदीच्या बांधकामात मला जाणवलेले वेगळेपण म्हणजे गडावरील तोफांचे झरोके व तोफा या नेहमी फांजीवरील भागात असतात पण या तटबंदीत तोफांच्या जागा या फांजीखाली व बुरुजाखालील तटात असुन त्यासाठी वेगळे बांधकाम केलेले आहे. या भटकंतीत टंकाई किल्ला आपले उद्दीष्ट असल्याने त्या किल्ल्याच्या अनुषंगानेच पुढील वर्णन केलेले आहे. अंकाई गावाकडील दरवाजातून आत आल्यावर डावीकडील डोंगराचा भाग हा अंकाई किल्ल्याचा तर उजवीकडील भाग हा टंकाई किल्ल्याचा आहे. उजवीकडील बाजूने टंकाई किल्ल्याच्या गडफेरीस सुरवात केल्यावर तटावरील चर्या, मारगीरीच्या जंग्या, पहारेकऱ्याच्या देवड्या पहात आपण वाटेच्या सुरवातीस असलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांनी एकाखाली एक कोरलेल्या पाण्याच्या दोन टाक्यांपाशी पोहोचतो. उतारावर असलेल्या या दोन टाक्यात पाणी आणण्यासाठी कातळात चर खोदला आहे. टाके डावीकडे व तटबंदी उजवीकडे ठेवत या वाटेने कडयाच्या दिशेने पुढे गेल्यावर कातळात खोदलेले पाण्याचे मोठे खांबटाके दिसते. या टाक्यात जाण्यासाठी कातळात कोरलेला मार्ग पहाता हे टाके नसुन बहुदा कोठार असावे असे वाटते. या टाक्याच्या माथ्यावर कातळात कोरलेले अजुन एक पाण्याचे टाके असुन तेथे जाण्याचा मार्ग मात्र वरील बाजुने आहे. खांबटाके पाहुन परत सुरवातीच्या कातळात कोरलेल्या पायऱ्याकडे यावे.या पायऱ्यांनी पुढे किल्ल्याकडे निघाल्यावर उजव्या बाजुस कातळात अर्धवट कोरलेला कातळ नजरेस पडतो. वाटेच्या पुढील भागात डाव्या बाजुस सहजपणे नजरेस न येणारी कडयाच्या कातळात कोरलेली पाण्याची तीन टाकी असुन यातील दोन टाकी खांबटाकी आहे. टाकी पहाण्यासाठी वाट सोडुन डावीकडील कातळाच्या धारेवरुन जावे लागते. टाकी पाहुन परत आल्यावर कातळात कोरलेल्या १०-१२ पायऱ्या चढुन आपण बांधीव पायऱ्यापाशी पोहोचतो. या पायऱ्या चढण्यापुर्वी डोंगराला चिटकून उजवीकडील बाजुने कड्याला वळसा पुढे आल्यावर आपण सुरवातीस पाहिलेल्या खांबटाक्याच्या वरील बाजुस असलेल्या टाक्याकडे पोहोचतो. टाके पाहुन परत आल्यावर आपण बांधीव पायऱ्यांच्या वाटेने आपण खिंडीतील तटबंदी टंकाईला मिळते त्याच्या अलीकडे असलेल्या बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावरून कडा डावीकडे ठेवत ५ मिनिटे चालल्यावर पुन्हा उजवीकडे वळुन टंकाई किल्ल्याच्या दरवाजाखाली उतरलेली उभी सोंड चढत आपण टंकाई किल्ल्याच्या पश्चिमाभिमुख दरवाजात पोहोचतो. दरवाजासमोरील या सोंडेवर असलेल्या पायऱ्या मोठया प्रमाणात ढासळलेल्या आहेत. दरवाजाची कमान व लाकडी दाराची चौकट आजही शिल्लक असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजातुन दिसणारे तटबंदीचे व अंकाई किल्ल्याचे बांधकाम (दुर्गरचना) काही काळ आपल्याला इथे थांबण्यास भाग पाडते. अंकाई गावातून या दरवाजात येण्यास पाऊण तास लागतो. दरवाजातुन आत आल्यावर देवडीला लागुन वाटेवरच असलेल्या एका खोलीत कबर बांधलेली आहे. हि कबर ओलांडुन आपण डावीकडे असलेल्या किल्ल्याच्या प्रशस्त पठारावर पोहोचतो. किल्ल्याचा माथा दक्षिणोत्तर ५० एकरवर पसरलेला असुन समुद्रसपाटीपासुन २९३० फुट उंचीवर आहे. अंकाईच्या मानाने टंकाईची उंची काही प्रमाणात कमी आहे. पठाराच्या सुरवातीस दरवाजाच्या डावीकडील भागात एका मोठया वाड्याचे अवशेष असुन वाडयाच्या डावीकडे उतारावर पाण्यासाठी खडकात खोदलेले जोडटाके आहे. या टाक्याच्या डावीकडील बाजुस कडयाच्या काठावर बुरुज व तटबंदी बांधलेली आहे. किल्ल्याच्या चारही बाजुस ताशीव कातळकडे असल्यामुळे चार बाजुचे कोपरे वगळता इतरत्र कोठेही तटबंदी दिसुन येत नाही. टाक्याकडून पठार तुडवत सरळ निघाल्यावर वाटेत कोरीवकाम केलेले प्राचीन शिवमंदिर व त्यापुढे समाधीचा एक चौथरा पहायला मिळतो. मंदिराच्या गाभाऱ्यातील पिंड व सभामंडपातील नंदी आजही शिल्लक आहे. मंदिरापुढे कातळात कोरून काठावर बांधकाम केलेले दोन मोठे तलाव आहेत. तलावांना उजवीकडे ठेवुन वळसा घालत गेल्यावर डोंगर उतारावर असलेली पाण्याची दोन टाकी पहायला मिळतात. टाक्यांच्या उजवीकडे निमुळती होत गेलेल्या डोंगरसोंडेवर एका वास्तुचे अवशेष असुन सोंडेच्या टोकावर बुरुज व आसपास काही प्रमाणात तटबंदी आहे. हा बुरुज पाहुन दरी डावीकडे व पठार उजवीकडे ठेवुन दरीकाठाने परतीचा प्रवास सुरु करावा. पाच मिनिटे चालल्यावर उजवीकडे पठाराच्या दिशेने एक शिंदीचे झाड दिसते. हे झाड एका बुजलेल्या टाक्यात उगवलेले असुन या टाक्याच्या आसपास कातळात कोरलेली शेवाळलेल्या पाण्याने भरलेली अजून चार टाकी पहायला मिळतात. या टाक्यांच्या वरील बाजुस अजून एक अर्धवट कोरलेले व मातीने बुजलेले टाके आहे. किल्ल्याच्या पठारावरून फिरताना भुईसपाट झालेल्या अनेक वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. हे सर्व पाहुन दरवाजाकडे परत आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पहाण्यास २ तास पुरेसे होतात. गडमाथ्यावरून मनमाड शहर, दक्षिणेला गोरखगड, पश्चिमेला अंकाई, हडबीची शेंडी आणि कात्रा किल्ला नजरेस पडतो. टंकाई किल्ल्याच्या डोंगराच्या पोटात असलेली जैन लेणी दहाव्या ते बाराव्या शतकातील असुन या लेणी किल्ल्याचे प्राचीनत्व सिध्द करतात. या किल्ल्याची निर्मिती बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकीर्दीत झाली असावी. पुरातत्वज्ञ डॉ. वर्मांच्या मते देवगिरीचे यादव सम्राट सिंघण याच्या कारकिर्दीत (१२००-१२४७ ) परमारांचा हा किल्ला दुर्गपाल श्रीधर याला लाच देऊन यादवांनी घेतला व त्याचे बांधकाम केले. सुरत-औरंगाबाद या व्यापारी मार्गावरील हा महत्वाचा किल्ला असल्याने इ.स.१६३५ मधे मुघल बादशहा शहाजहानचा सुभेदार खानखानान यानें अलका-पलका किल्ल्यासोबत हा किल्ला लाच देऊन घेतला. इ.स.१६६५ मध्यें थिवेनॉट यानें सुरत व औरंगाबाद यांच्यामधील एक महत्वाचा टप्पा म्हणुन या किल्ल्यांचा उल्लेख केला आहे. इ.स.१६९३ मध्ये सुलेमानबेग हा या किल्ल्यांचा मोगल किल्लेदार असल्याचा उल्लेख येतो. मुघलांकडुन हा किल्ला निजामाकडे गेला. फेब्रुवारी १७३४च्या शेवगाव तहानुसार हा किल्ला मराठयांना देण्याचे निजामाने कबुल केले पण किल्लेदार अब्दुल अजीजखान याने किल्ला मराठयांच्या ताब्यात देण्यास विरोध केला. इ.स. १७५२ मधे भालकीच्या तहानुसार हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. इंग्रज-मराठा युद्धात कर्नल मॅकडोवेल याची तुकडी येथें ५ एप्रिल १८१८ रोजीं येथे आली. त्यांनी सहा पौंडी दोन तोफांच्या सहाय्याने पायथ्यावर हल्ला केला. तोफांचा मारा पाहुन किल्लेदारानें प्रतिहल्ला न करता किल्ला इंग्रजांच्या ताब्यात दिला. इंग्रजांनी किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी किल्ल्यावर ४० पेक्षा जास्त तोफा व ३०० सैनिक असल्याचा उल्लेख ग्याझेटमध्ये येतात पण सध्या किल्ल्यावर एकही तोफ दिसुन येत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!