झापरागड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : गडचिरोली
उंची : १६२५ फुट
श्रेणी : मध्यम
कृत्रिमतेचा कोणताही स्पर्श न झालेला व मानवाचा आजही वावर नाही असेच वर्णन आपल्याला गडचिरोली जिल्ह्यातील जंगलाचे करता येईल. हे जंगल आजही इतके दाट आहे कि या जंगलातुन भरदुपारी फिरत असताना देखील आपल्याला संध्याकाळ झाल्याचे जाणवते. येथे असणारे गिरीदुर्ग इतक्या दाट जंगलात आहेत कि त्यांना गिरीदुर्ग म्हणावे कि वनदुर्ग म्हणावे हेच कळत नाही. असाच एक गिरीदुर्ग आपल्याला कोरची तालुक्यात छत्तीसगड जिल्ह्याच्या सीमेवर पहायला मिळतो. या दुर्गाच्या पायथ्याशी असलेल्या बेतकाठी गावापासून छत्तीसगड सीमा केवळ एक कि.मी. अंतरावर आहे. विदर्भाचा हा भाग विरळ लोकवस्तीचा असल्याने या भागात खाजगी वाहने देखील फारशी दिसत नाही त्यामुळे सार्वजनीक वाहन दिसणे हि देखील दुर्मिळ गोष्ट आहे. त्यामुळे या भागातील दुर्गांची भटकंती करताना प्रवास व सुरक्षा या दोन्हीच्या दृष्टीने खाजगी वाहनाचा वापर करावा अन्यथा एका दिवसात एक किल्ला पहाणे देखील कठीण आहे. कोरची हे तालुक्याचे ठिकाण गडचिरोली शहरापासुन १०० कि.मी. गोंदीया येथुन ११५ कि.मी. तर भंडारा शहरापासुन १२५ कि.मी.अंतरावर आहे.
...
झापरागड किल्ला पांढरीगोटा व बेताकाठी या दोन्ही गावाच्या मध्यवर्ती भागात असुन कोरची येथून पांढरीगोटा ५ कि.मी.अंतरावर तर बेतकाठी ८ कि.मी. अंतरावर आहे. बेतकाठी गावापासून छत्तीसगड सीमा ए१ कि.मी.अंतरावर आहे. पांढरीगोटा गावापासुन बेतकाठी गावाच्या दिशेने जाताना साधारण २.५ कि.मी.अंतरावर डाव्या बाजुस किल्ल्याकडे जाण्याचा कच्चा मार्ग आहे. येथे जय गडमाता, किल्लाधाम,झापरागड बेतकाठी असा फलक लावलेला आहे. या कच्या रस्त्याने साधारण अर्धा कि.मी.आत जंगलात गेल्यावर गड चढाई सुरु होते व अर्ध्या तासात आपण गडावर पोहोचतो. गडावर स्थानिकांचे देवस्थान असल्याने व सध्या एक पुजारी तेथे मुक्कामास असल्याने वाट चांगली मळलेली आहे. या वाटेने साधारण अर्ध्या तासात आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. गडाचा हा माथा दगड फोडून सपाट करण्यात आला असुन हा दगड तटबंदीसाठी वापरलेला आहे. या सपाटीवर अखंड दगडात घडवलेली आठ फुट उंच गदाधारी मारुतीची मुर्ती पहायला मिळते. गडाचा माथा निमुळता असल्याने या भागात साधारण १२-१५ फुट उंच तटबंदी बांधुन पुढील भाग सुरक्षित करण्यात आला आहे. हि तटबंदी साधारण ७०-८० फुट लांब असुन या तटबंदीत असलेला दरवाजा काळाच्या ओघात नष्ट झाला आहे. या दरवाजाचे पडझड झालेले दगड वापरून तटाला लागून पुजाऱ्यासाठी नव्याने एक खोली बांधलेली आहे. हि तटबंदी पार केल्यावर आपण तटबंदीच्या आत असलेल्या किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. किल्ल्याचा निमुळता माथा दक्षिणोत्तर साधारण २४ एकरवर पसरलेला असुन समुद्र सपाटीपासुन १५७० फुट उंचावर आहे. तटबंदीच्या आतील बाजुस तटाजवळ एका वास्तुचा चौथरा पहायला मिळतो. तटाच्या डावीकडे खाली उतरत जाणारी वाट असुन या वाटेवर पाण्याचा एक झरा आहे पण ह झरा केवळ डिसेंबर पर्यंतच वाहात असतो. पठाराच्या पुढील बाजुस दाट जंगल असल्याने पुढे जाता येत नाही त्यामुळे गडावर पाण्याची नेमकी काय सोय असावी ते कळत नाही. आम्ही गेलो तेव्हा पुजारी गडाखाली गेला असल्याने भेट झाली नाही पण तेथे पाण्याने भरलेली दोन पिंप पहाता गडावर पाणी असावे पण ते ठिकाण आम्हाला पहाता आले नाही. सुरवातीचा भाग वगळता झाडीमुळे गडमाथा फारसा फिरता येत नसल्याने १५ मिनिटात आपली गडफेरी पुर्ण होते व आपण परतीच्या मार्गाला लागतो. विदर्भातील हा किल्लाच कोणाला परीचीत नसल्याने किल्ल्याचा इतिहास अबोल आहे पण गोंड राजसत्तेचा या भागावर असलेला प्रभाव पहाता हा किल्ला गोंड राजांनी बांधला असावा असे वाटते.
© Suresh Nimbalkar