जुना पन्हाळा

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सांगली

उंची : २६९५ फुट

श्रेणी : सोपी

सांगली जिल्ह्यातील मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांच्या सीमेवर पुर्वपश्चिम पसरलेला गिरीलिंगाचा डोंगर आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात असलेला हा डोंगर त्यावर असलेल्या गिरीलिंगेश्वर देवस्थानामुळे या भागात प्रसिध्द आहे. मुळात हा एक डोंगर नसुन पश्चिमेकडे गिरीलिंग व पुर्वेकडे गौसिद्ध असे दोन डोंगर आहेत. हे दोन्ही डोंगर ९० फुट रुंद अशा डोंगरसोंडेने एकमेकाशी जोडले गेले असुन यातील पश्चिमेकडील गिरीलिंग डोंगर म्हणजे ४१५ एकरवर पसरलेले अस्ताव्यस्त पठार आहे तर पुर्वेकडील गौसिद्ध डोंगर केवळ २२ एकरमध्ये सामावला आहे. समुद्रसपाटी पासुन २७२६ फुट उंचीवर असलेला हा गौसिद्ध डोंगर म्हणजेच जुना पन्हाळा किल्ला होय. स्थानिक लोक या डोंगरास उंदरोबा या नावाने देखील ओळखतात. ज्या ठिकाणी हे दोन डोंगर एकमेकांशी जोडले जातात त्या भागात संरक्षणासाठी अर्धवर्तुळाकार रुंद खंदक खोदुन व त्यावर तटबंदी उभारून जुना पन्हाळा किल्ला मुख्य डोंगरावरील पठारापासुन वेगळा करण्यात आला आहे. ... हा खंदक व त्यावरील तटबंदी पहाता कधीकाळी येथे किल्ला असल्याचे स्पष्ट होते. हा किल्ला कवठेमहांकाळ या तालुक्याच्या ठिकाणापासुन १७ कि.मी. अंतरावर तर मिरज शहरापासुन खंडेराजुरी-कुकटोळी मार्गे २७ कि.मी. अंतरावर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक वाटा असल्या तरी गिरीलिंगेश्वर महादेव मंदिर पाहुन किल्ल्यावर जाणे सोयीचे ठरते. कुकटोळी गावातुन गिरीलिंग डोंगरावरील महादेव मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता असुन खाजगी वाहनाने थेट मंदिरापर्यंत जाता येते अन्यथा हे अंतर चालत जाण्यासाठी पाउण तास पुरेसा होतो. गाडी थेट डोंगरावर जात असल्याने किल्ला चढण्याचे श्रम वाचतात शिवाय गिरीलिंगेश्वर महादेव हे प्राचीन मंदिर देखील पाहुन होते. मंदिराचे गर्भगृह व अंतराळ कड्यामध्ये कोरलेला असुन बाहेरील दगडी बांधकाम कोरीव कामाने सजवले आहे. मंदीर परिसरात कातळात कोरलेल्या तीन गुहा पहायला मिळतात पण या बांधकामाचा किल्ल्याशी कोणताही संबंध नाही. मंदिराकडून १०-१२ पायऱ्या चढुन आपण गिरीलिंगच्या माथ्यावरील विस्तीर्ण पठारावर पोहोचतो. येथुन गडाकडे जाण्यापुर्वी वाट नीट समजुन घ्यावी कारण वर चुकण्याची शक्यता नसली तरी गडाकडे जाण्याचा फेरा मात्र वाढतो. गिरीलिंग पठाराच्या कडेकडेने पुर्व दिशेने गेल्यावर साधारण ४० मिनिटात आपण हे पठार व किल्ला यामध्ये असलेल्या खंदकाजवळ पोहोचतो. खंदकाजवळील रचीव दगडांचा तट मोठया प्रमाणात ढासळलेला आहे. खंदक ओलांडुन आत आल्यावर एका वास्तुचा पाया पहायला मिळतो. येथुन कडयाच्या उजवीकडे जात सरळ गेल्यावर खडकात खोदलेले एक भलेमोठे कोरडे टाके पहायला मिळते. या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत. टाके पाहुन पुढे आल्यावर अजुन एक अर्धवट खोदलेले टाके व त्याशेजारी एक ढासळलेली वास्तु पहायला मिळते. बा रायगड या दुर्गसंवर्धन संस्थेने या दोन्ही टाक्यांचे व गडावरील वास्तुंचे संवर्धन करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. या वास्तुशेजारी कडयालगत खाली उतरण्यासाठी खडकात खोदलेल्या १५-१६ पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरुन खाली आल्यावर कातळात कोरलेल्या तीन गुहा आहेत. सध्या या गुहेत एक साधु महाराज मुक्कामास आहेत. येथुन खाली उतरत जाणारी वाट कदमवाडी या पायथ्याच्या गावात जाते. या गुहेच्या खालील बाजुस डोंगर उतारावर चिंचेच्या झाडाखाली खडकात बांधलेले पाण्याचे टाके असुन त्यात वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध असते. या ठिकाणी आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्यावर येण्याचा वेळ वगळता एका तासात आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्यावर मुक्काम करायचा झाल्यास येथे अथवा गिरीलिंग मंदिराकडे राहता येईल. शिवकाळात या किल्ल्याचा कोठेही उल्लेख आढळत नाही. या किल्ल्यास पन्हाळा हे नाव का अशी विचारणा केली असता स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शिलाहार राजांनी कोल्हापुरचा पन्हाळा गड बांधण्यापुर्वी या ठिकाणाची पाहणी केली होती व किल्ला बांधावयास सुरवात देखील केली होती. पण नंतर काही कारणाने हे बांधकाम अर्धवट सोडून कोल्हापूरजवळ पन्हाळ्याची उभारणी केली. म्हणुन हा गड जुना पन्हाळा म्हणुन ओळखला जातो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!