जिंती

प्रकार : गढी/नगरकोट

जिल्हा : सोलापुर

उंची : 0

छत्रपती शिवाजीमहाराज हे तमाम मराठी मनाचे श्रद्धास्थान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजाची सातारा गादी,करवीर गादी तसेच व्यंकोजीराजांच्या वंशजांची तंजावर गादी यांबद्दल आपल्या सर्वानाच माहीती आहे परंतु महाराष्ट्रातच असणारी छत्रपतींचे मोठे बंधू थोरले संभाजीराजे यांची शाखा महाराष्ट्राला पूर्णपणे अपरीचीत आहे. मराठ्यांच्या इतिहासात महत्वाचे पान असलेल्या जिंतीच्या राजेभोसले या घराण्याची म्हणावी तशी माहीती दुर्गप्रेमीना नाही. शिवाजी महाराजांचे जेष्ठ बंधू संभाजीराजे महाराज यांचे वंशज राजेभोसले ( जिंतीकर) सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात जिंती या गावी राहतात. करमाळ्यापासून जवळच करमाळा-राशिन- सिध्दटेक रस्त्यावर जिंती हे गाव आहे. या गावात राजेभोसले घराण्याचा तटबुरुजांनी वेढलेला वाडा असुन तिथे शिवाजी महाराजांचे जेष्ठ बंधू संभाजीराजे भोसले यांचे वंशज आजही वास्तव्यास आहेत. जिंतीच्या परिसरात या घराण्याला खूप मान आहे. चौकोनी आकाराची हि गढी साधारण दिड एकरवर पसरलेली असुन गढीच्या चार टोकावर चार बुरुज आहेत. गढीच्या तटबंदीची पडझड झाली असली तरी या तटबंदीत उत्तरेकडे असलेले दोन्ही दरवाजे त्यांच्या दगडी कमानीसह शिल्लक आहेत. ... हे दोन्ही दरवाजे घडीव दगडात बांधलेले असुन त्यातील एका दरवाजाची कमान पुर्णपणे दगडी तर दुसऱ्या दरवाजाची कमान लाकडी आहे, या लाकडी कमानीवर गणेशपट्टी कोरलेली असुन त्यात गणेशमुर्ती व ऋद्धीसिद्धी कोरलेल्या आहेत. गणेशपट्टीच्या वरील भागात विटांनी बांधकाम केलेले असुन त्यात विटांमध्ये नक्षीकाम केलेले आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी देवड्या बांधलेल्या आहेत. तटबंदीच्या आत असलेला वाडा काळाच्या ओघात नष्ट झाला असुन त्याजागी नवीन बांधकाम केलेले आहे. पण या वाडयाच्या खालच्या भागात असणारे कोठार अथवा बळद आजही चांगल्या अवस्थेत आहे. जमिनीखाली असलेले घडीव दगडातील हे बांधकाम आजही चांगल्या स्थितीत असुन त्याची उंची साधारण सात-साडेसात फूट आहे. यात उतरण्यासाठी दोन बाजुस जिने असुन बळदाच्या किंवा कोठाराच्या भिंतीमध्ये कोनाडे काढलेले आहेत. या कोनाड्यात साठवणुक करण्यासाठी रांजण बसविलेले आहेत. हे तळघर वगळता वाड्याचे इतर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. गढी पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. आता थोडे इतिहासाकडे वळुया. संभाजीराजे म्हटले कि आपल्याला आठवतात ते शिवपुत्र संभाजी महाराज. शिवाजी महाराज आणि राणी सईबाईसाहेब यांना १४ मे १६५७ रोजी पुरंदरावरती पुत्ररत्न झाले व आपल्या पराक्रमी पुत्राची आठवण म्हणुन जिजाऊ आईसाहेबांनी त्या पुत्राचे संभाजी असे नामकरण केले. पण ज्या पराक्रमी काकांच्या नावाने संभाजी महाराजांचे नामकरण करण्यात आले ते शिवाजी महाराजांचे थोरले बंधु संभाजी महाराज यांची फारसी कोणाला आठवण होत नाही. शिवाजी महाराजांचे थोरले बंधू म्हणजेच शहाजीराजे व मातोश्री जिजाऊ यांचे ज्येष्ठ पुत्र थोरले संभाजीराजे हे आदिलशाही मनसबदार होते. संभाजीराजे व अफजलखान कनकगिरीच्या युद्धात वेढ्याचे काम करत होते. संभाजीराजे व अफजलखान एकाच दरबारातील सरदार पण अफजलखान भोसले कुटुंबाचा द्वेष करीत असल्याने त्याने येन युद्धात संभाजीराजे यांना मुद्दामच मदत केली नाही त्यामुळे इ.स.१६५६ साली कनकगिरीच्या लढाईत थोरले संभाजीराजे धारातीर्थी पडले. थोरले संभाजीराजे अल्पवयातच मारले गेले असा एक समज इतिहासाकारांनी करून घेतला, त्यामुळे हे घराणे व त्यांचे कर्तुत्व कायम अज्ञातंच राहिले. राधामाधवविलासचंपू या ग्रंथात जयराम पिंडे याने थोरल्या संभाजीराजांचा उल्लेख युवराज संभाजीराजे असा केलेला आहे. मराठयांच्या इतिहासात प्रमाण मानल्या गेलेल्या सभासदाने आपल्या बखरीत थोरल्या संभाजीराजांच्या जन्माचा उल्लेख केलेला नाही पण अफजलखान प्रकरणात शिवाजी महाराजांच्या तोंडी या थोरल्या संभाजीराजांच्या मृत्युचा उल्लेख सभासद करतो. चित्रगुप्त, एक्क्याण्णवकलमी बखर, मराठी साम्राज्याची छोटी बखर, शेडगावकर भोसले बखर, श्री शिवदिग्विजय यामध्ये थोरल्या संभाजी राजांचा उल्लेख आलेला आहे. याबरोबर तंजावरच्या बृहदीश्वर शिलालेखात काही माहिती विस्ताराने सापडते. परमानंदाने आपल्या शिवभारतात शहाजींना जिजाऊ पासून सहा शुभलक्षणी पुत्र झाले. त्यापैकी थोरले शंभू व शिवाजी हे दोघेच वंशवर्धक झाले असा उल्लेख केलेला आहे. फारसी साधनातील बादशहानाम्यात थोरल्या संभाजी राजांचा उल्लेख दोन हजारी मनसबदार असा दिसतो. थोरल्या संभाजीराजांचा बहुतेक काळ कर्नाटकात गेल्याने महाराष्ट्राशी त्यांचा फारसा संबंध आला नाही. त्यामुळे नंतरच्या काळात देखील मराठयांच्या इतिहासात त्यांचे उल्लेख आढळत नाहीत. एक्क्याण्णव कलमी बखरीत थोरल्या संभाजीचा पुत्र उमाजी याचा उल्लेख आलेला आहे. याशिवाय अन्य कोणत्याही बखरीत थोरल्या संभाजीराजांच्या पुत्रांचा उल्लेख केलेला नाही. परमानंदाने देखील शिवभारतात थोरले संभाजी व जयंतीबाई यांच्या विवाहाविषयी विस्ताराने लेखन केले असले तरी त्यांच्या मुलाविषयी मौन पाळलेले आहे. शेडगावकर भोसले बखरीत तर ‘त्यांच्या पोटी संतान नाही’ असा उल्लेख सापडतो. बृहदीश्वर मंदीरातील शिलालेखात थोरल्या संभाजीराजांचा पुत्र उमाजी याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्याचबरोबर उमाजींचा पुत्र परसोजी याचा जन्म झाल्याची नोंद या शिलालेखात सापडते. याशिवाय अफजलखान-वधाच्या पोवाडयात उमाजींचा उल्लेख आलेला आहे. उमाजीचा या पोवाडयामधील उल्लेख थेट थोरल्या संभाजींचा पुत्र असा नसला तरी ‘पुतण्या उमाजी राजाला’ असा उल्लेख आलेला आहे. बृहदीश्वर शिलालेखात थोरल्या संभाजींना जयंतीबाई शिवाय गौरीबाई आणि पार्वतीबाई अशा अजुन दोन स्त्रिया असल्याची माहिती मिळते. उमाजी हे थोरल्या संभाजीराजांचे दत्तक पुत्र नव्हते हे जेधे शकावली मधल्या नोंदीवरून सिद्ध होते. जेधे शकावलीत उमाजींचा जन्म २५ नोव्हेंबर १६५४ ला झाला अशी नोंद येते. इ.स.१६६४ मध्ये शहाजीराजांचा होदगिरी येथे मृत्यु झाला तेंव्हा उमाजी दहा वर्षांचे होते. उमाजीस विजापूरकरांतर्फे जहागीर होती. ऐन तिशीच्या सुमारास हे आपल्या तलवारीच्या बळावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इ.स.१६८३ च्या एका महजरावरून मिळतो. उमाजींना बहादूरजी नावाचा पुत्र असुन त्यांचादेखील एक हुकूम उपलब्ध आहे. मालोजीराजे भोसले फर्जंद शहाजी फर्जंद संभाजी यांचे फर्जंद उमाजी याचे बहादूरजी...’ सदरचा हुकूम १२ डिसेंबर १६८९ चा आहे. उमाजी शिवाय थोरल्या संभाजीराजांना सुरतसिंग आणि मातोजी असे दोन पुत्र असल्याचे उल्लेख कन्नड कागदपत्रात येतात पण मराठी साधनात यांचे उल्लेख नाहीत. उमाजी या थोरल्या संभाजीपुत्राचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंध आला व त्यांची शाखा महाराष्ट्रात विस्तारली म्हणून त्याची माहिती मराठयांच्या इतिहासात मिळते. थोरल्या संभाजीराजांची पत्नी जयंतीबाई यांचेच दुसरे नाव मकाऊ होते असा *गैरसमज* काही इतिहासकारांच्या लेखनामुळे झालेला आहे. ऐतिहासिक वंशावळी मध्ये देखील मकाऊ या थोरल्या संभाजीराजांची पत्नी असल्याचा उल्लेख येतो. ही वंशावळ इनाम कमिशनपुढे ग्राह्य ठरलेली आहे. वास्तव असे की जयंतीबाई या विवाहानंतर थोरल्या संभाजीराजांसोबत कर्नाटकात कोलार प्रांती गेल्या त्या कायमच्या. थोरल्या संभाजीराजांच्या मृत्युनंतर कोलार प्रांतात जयंतीबाईंनी केलेले दान व बक्षिसाचे पुरावे ही बाब सिद्ध करतात. जयंतीबाईंनी दान केल्याचा अखेरचा शिलालेख हा इ.स.१६९३ चा असुन जयंतीबाई तोवर हयात होत्या व त्या कर्नाटकात वास्तव्य करून होत्या हे कळते. दुसरी गोष्ट म्हणजे मकाऊ भोसले या इ.स १७४० पर्यंत जिंतीचा कारभार करताना दिसतात. त्यांची समाधी आजही जिंती गावी असल्याने जयंतीबाई व मकाऊ या दोघी वेगळ्या होत्या हे सिद्ध होते. मकाऊ या थोरले संभाजीराजे यांचे पुत्र उमाजी भोसले याचीं पत्नी होत्या. त्यांना बहादूरजी नावाचा पुत्र होता परंतु त्याच्यानंतर मकाऊने भांबोरेकर भोसले घराण्यातील परसोजी यांना दत्तक घेतले. भोसले घराण्यात वंशपरंपरागत आलेल्या पाटीलकीच्या वतनात जिंती हे एक गाव होते. बादशाही कागदपत्रात मकाऊचा उल्लेख मकुबाई पाटलीण जिंतीकर असा येतो. मकुबाई शाहू महाराजांच्या चुलत चुलती असल्याने त्यांचा स्नेह शाहू दप्तरातील कागदपत्रांत वाचायला मिळतो. मकाऊस काही अडचण आल्यास ती निवारण करण्याचे आदेश छत्रपती शाहूनी आपल्या कमाविसदारास दिलेले दिसतात. छत्रपती शाहु मोगलांचे कैदेत असताना छत्रपती राजारामांनी मकाऊस धनाजी जाधवाकडून एक गाव दिल्याची नोंद ताराबाईकालीन कागदपत्रात सापडते. इ.स.१७३० च्या सुमारास निजामाचा करमाळा येथील सरदार रावरंभा निंबाळकर याने जिंती गावास व मकाऊस काही उपद्रव केला. त्या वेळी निजामाने रावरंभा निंबाळकरास मकाऊस उपद्रव न करण्याची तंबी दिल्याचे पत्र जिंती दप्तरात पहावयास मिळते. इ.स.१७४० पर्यंत शाहू दप्तरात मकाऊचे उल्लेख सापडतात. आज जिंती गावात त्यांचा उल्लेख मकाई असा केला जातो. जिंती गावाबाहेर एका चौथऱ्यावर पाटलीण मकूबाई भोसले जिंतीकर म्हणजेच मकाईची एक छोटेखानी समाधी आहे. ग्रामस्थ तिला देवी मानतात व दरवर्षी त्यांची जत्रा भरते. बेळगावहून हुबळीमार्गे २७० कि. मी. अंतरावर असलेल्या कोप्पळ जिल्ह्यातील कनकगिरी गावात थोरले संभाजीराजे भोसले यांची समाधी आहे.
© Suresh Nimbalkar

Read more...

छायाचित्रे

error: Content is protected !!