जवळ्या

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ४१७० फुट

श्रेणी : कठीण

महाराष्ट्रात आढळणारी दुर्ग विविधता इतरत्र कोठेही आढळत नाही आणि म्हणुनच महाराष्ट्राला दुर्गाचा देश म्हणुन ओळखले जाते. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सातमाळ डोंगररांगेत रवळ्या जवळ्या हे असेच दोन किल्ले आपल्याला एका पठारावर पहायला मिळतात. हे किल्ले साधारण ३.५ कि.मी. लांब व १.५ कि.मी.रुंद अशा मोठ्या पठारावर वसलेले दोन स्वतंत्र किल्ले आहेत. या दोन किल्ल्यांमधील अंतर साधारण १ कि.मी. असुन पठार चढुन आल्यावर एका दिवसात हे दोन्ही किल्ले पाहुन होतात. मुळाणे व बाबापुर हि या दोन्ही किल्ल्याच्या पायथ्याची गावे असुन या दोन गावाच्या मध्ये असलेली मुळाणे बारी किंवा बाबापुर खिंड येथुन या किल्ल्यांवर जाण्यासाठी सोयीचा मार्ग आहे. याशिवाय मुळाणे गावातुन देखील किल्ल्याखालील पठारावर जाता येते. नाशीकहुन वणीमार्गे बाबापुर खिंड हे अंतर ५३ कि.मी.असुन वणीपासुन हे अंतर ९ कि.मी.आहे. वणीहुन बाबापूर मार्गे या खिंडीत आल्यास डावीकडील वाट मार्कंडेय किल्ल्यावर जाते तर उजवीकडील वाट रवळ्या जवळ्या खालील पठारावर जाते. ... खिंडीत वनखात्याने पर्यटन निवारा उभारला असुन वाहनतळाची सोय केली आहे. पठारावर जाणारी वाट मळलेली असल्याने चुकण्याची शक्यता नसली तरी दोन्ही गड संपुर्णपणे पहायचे असल्यास बाबापुर गावातुन अनुभवी वाटाड्या घेणे उत्तम. त्यामुळे कमी वेळात संपुर्ण गड व त्यावरील सर्व अवशेष पहाता येतात. उजवीकडील सोंडेवरून पठार चढायला सुरवात केल्यावर साधारण अर्ध्या तासाने समोर पठाराचा दुसरा भाग दिसतो व येथुन वाट डावीकडे वळते आणि परत उजवीकडे वळून पठारावर जाते. वाट जेथुन उजवीकडे त्या ठिकाणी उध्वस्त दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात. खिंडीतुन पठारावर जाण्यास साधारण एक तास लागतो. रवळ्या जवळ्या किल्ले ओळखण्यात गोंधळ होऊ नये यासाठी मार्कंड्याच्या बाजुस असलेला जवळ्या व धोडपच्या बाजुस असलेला रवळ्या हे लक्षात ठेवावे. पठारावर आल्यावर समोरच त्रिकोणी आकाराचा जवळ्या किल्ला दर्शन देतो. किल्ल्यावर जाण्यासाठी पुर्वेकडून वाट असल्याने आपल्याला किल्ल्याच्या दुसऱ्या टोकास जावे लागते. येथुन उजवीकडून तसेच डावीकडुनही रवळ्या जवळ्या मधील खिंडीत जाण्यासाठी वाट आहे. जाताना डावीकडुन गेल्यास व येताना उजवीकडून आल्यास जवळ्या किल्ल्याला संपुर्ण फेरी मारून होते व पठारावरील सर्व अवशेष पहाता येतात. या दोन्ही वाटा पुर्णपणे मळलेल्या आहेत. पठारावर काही ठिकाणी झाडीत लपलेले वास्तुचे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्याला वळसा घालताना पुर्व बाजुस एका ठिकाणी ८-१० कबर व त्यावर कोरीव दगड दिसुन येतात. या कोरीव दगडावर दिवा ठेवण्याची सोय केलेली आहे. वाटेच्या पुढील भागात खडकात खोदलेले लहान पाण्याचे टाके असुन टाक्यात माती वाहुन येऊ नये यासाठी टाक्याचा डोंगराकडील भाग घडीव दगडांनी बांधुन काढला आहे. गडावर पिण्यायोग्य पाण्याचे हे एकमेव टाके असुन या टाक्यातील पाणी वर्षभर पुरते. टाक्याच्या काठावर दगडी ढोणी असुन काही अंतरावर कोरीव नंदी,शिवलिंग व पादुका पहायला मिळतात. टाक्याच्या वरील बाजुस अजुन एक खोदीव टाके असुन या टाक्यात जमा झालेले पाणी पाझरून खालील टाक्यात येते. टाक्याच्या समोरील बाजुस पठारावर ४-५ घरे असुन हि वस्ती तिवारी वस्ती म्हणुन ओळखली जाते. हे तिवारी सध्या नाशीक येथे राहायला असुन पावसाळ्यात किल्ल्याखालील गावातील गुराखी गुरांसह येथे राहायला असतात. इतर वेळी हि घरे रिकामी असल्याने येथे राहण्याची चांगली सोय होते. पठारावरून इथवर येण्यास पाउण तास लागतो. या घरांकडे जाताना एक वाट उजवीकडे जवळ्याच्या धारेखाली असलेल्या जंगलाकडे जाते. या वाटेवर एक खोदीव टाके असुन त्यातील पाणी शेवाळ जमा झाल्याने पिण्यायोग्य नाही. जंगलातील या वाटेने उभा चढ चढुन अर्ध्या तासात आपण एका घळीपाशी येऊन पोहोचतो. घळीच्या या कातळात अलीकडे एक माणुस रांगत आत शिरेल अशी गुहा कोरलेली असुन या कातळाला वळसा मारत पुढे गेल्यावर गुहेचे दुसरे तोंड पहायला मिळते. गुहा पाहुन घळीत परत आल्यावर सोपे प्रस्तरारोहण करून आपण घळीच्या वरच्या भागात पोहोचतो. येथे समोरच २० फुट उंचीचा कातळटप्पा असुन हा कातळटप्पा चढल्यावर किल्ल्यावर जाणारी वाट आहे. कातळाच्या वरील बाजुस किल्ल्याची उध्वस्त तटबंदी दिसते. कातळावर दोर बांधण्यासाठी बोल्ट मारलेला असुन हा कडा चढण्यासाठी दोर असणे आवश्यक आहे. नेहमी गडकिल्ले फिरणारे दोर न लावता हा कातळ चढू शकतात पण सुरक्षेसाठी दोर लावणे गरजेचे आहे. हा कातळटप्पा पार करून आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. येथुन थोडासा चढ चढुन वर आल्यावर उजवीकडील वाटेने आपण गडाच्या दुसऱ्या भागाकडे निघतो. माथ्यावर मोठया प्रमाणात गवत वाढलेले असुन या गवतात लपलेले अनेक वास्तुचे चौथरे दिसुन येतात. वाटेच्या पुढील भागात उजव्या बाजुला डोंगर उतारावर गडाचा उत्तराभिमुख उध्वस्त व अर्धवट गाडलेला दरवाजा दिसुन येतो. या अवशेषात दरवाजाची अर्धवर्तुळाकार कमान तसेच दरवाजाचे दगडी बिजागर दिसतात. दरवाजाच्या दोन्ही बाजुस बुरुज असुन यातील एक बुरुज गुप्तधनाच्या लालसेने आतील बाजुस खोलवर खणलेला आहे. दरवाजाच्या खालील बाजुस उतारावर पडझड झालेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसुन येतात. दरवाजा पाहुन मुळ वाटेवरुन पुढे निघाल्यावर कातळात खोदलेली तीन टाकी दिसतात. यातील एक टाके मोठया प्रमाणात बुजलेले आहे तर एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्याकडून वाट गडाच्या माथ्याकडे वळते. या वाटेने ५ मिनिटाचा उभा चढ चढल्यावर वाटेच्या उजवीकडे व डावीकडे अशी पाण्याची दोन टाकी पहायला मिळतात. या दोन्ही टाक्यातील पाणी शेवाळलेले आहे. या टाक्यापासून सरळ वर जाणारी वाट गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाते. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ४१७० फुट असुन त्रिकोणी आकाराचा गडमाथा २२ एकर परिसरावर पसरलेला आहे. माथ्यावर काहीही अवशेष नसले तरी मार्कंड्या त्या मागे असलेला सप्तशृंगीगड, कण्हेरगड, मोहनदर पुर्वेला रवळ्या त्यामागे धोडप, कंचना, कोळधेर, राजधेर, इंद्राई असे ८-१० किल्ले नजरेस पडतात. गडमाथा फिरून आल्या वाटेने कातळ टप्पा उतरल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गडफेरी करण्यास दिड तास पुरेसा होतो. इ.स.१६३५-३६ मध्ये शहाजहान याने निजामशाही सांभाळणाऱ्या शहाजी राजांचा पाडाव करण्यासाठी खानदौरान, खानजमान व दिलेरखान असे तीन सरदार पाठवले. दिलेरखानावर नाशिक-त्रिंबक या भागातील किल्ले घेण्याची जबाबदारी होती. त्यात अलावार्दीखन या दिलेरखानाच्या हाताखालील सरदाराने इ.स.१६३६ मध्ये हे दोन्ही किल्ले जिंकुन घेतले. रवळ्या किल्ल्याच्या दरवाजावरील शिलालेखात याचा उल्लेख येतो तसेच बादशहानामा या ग्रंथात या किल्ल्यांचा रोला-जोला म्हणुन उल्लेख येतो. इ.स.१६७० साली नोव्हेंबर मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सरत लुटली त्या काळात हा किल्ला स्वराज्यात सामील केला. सभासदाच्या बखरीमधील वर्णनानुसार इ.स.१६७१ मध्ये दिलेरखान याने या किल्ल्यांना घातलेला वेढा मोरोपंत यांनी रवाना केलेल्या सैन्याने उधळून लावला. त्यानंतर आलेल्या महाबतखानाने मात्र वेढा घालुन हा किल्ला जिंकून घेतला. पेशवेकाळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला. इ.स. १८१८ मध्ये कॅप्टन ब्रिग्जने ब्रिटीशांच्या वतीने किल्ला ताब्यात घेतला. १८१९ मध्ये ब्रिटीश अधिकारी म्याकीन्तोष याने किल्ल्याच्या पायऱ्या व तटबंदी तोफ़ा लावुन उध्वस्त केली.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!