जवळा
प्रकार : गढी
जिल्हा : नगर
उंची : 0
श्रेणी : सोपी
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका व नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याची दुर्गभटकंती करताना आपल्याला मोठ्या प्रमाणात गढी व नगरकोट पहायला मिळतात. अशीच एक गढी व नगरकोटाचे अवशेष आपल्याला जवळा गावात पहायला मिळतात. जवळा गावातील हि गढी जहागीरदार सोमवंशी गढी म्हणुन ओळखली जाते. जवळा गाव पुणे शहरापासुन शिरुरमार्गे ८२ कि.मी. अंतरावर असुन पारनेरपासून १७ कि.मी अंतरावर आहे. कधीकाळी जवळा गाव हे तटबंदीच्या आत वसलेले असावे पण आज हि तटबंदी पुर्णपणे नष्ट झाली असुन त्यातील केवळ दोन दरवाजे अवशेषरुपात शिल्लक आहेत. गावाच्या एका बाजुस ओढा असुन या ओढ्याच्या काठावरच बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतून जवळा गावात प्रवेश केल्या दोन दरवाजे पर करूनच गढीजवळ पोहोचता येते. हे दोन्ही दरवाजे एकमेकापासून काही अंतरावर काटकोनात बांधलेले असुन पहिला दरवाजा पश्चिमाभिमुख तर दुसरा दरवाजा उत्तराभिमुख आहे. हे दोन्ही दरवाजे आजही चांगल्या अवस्थेत असुन त्यांच्या केवळ गोलाकार कमानी ढासळल्या आहेत. दोन्ही दरवाजाच्या आसपास असलेली तटबंदी अतिक्रमणामुळे नष्ट झाली आहे. हे दोन्ही दरवाजे घडीव दगडात बांधलेले असुन आतील दरवाजाची उंची बाहेरील दरवाजापेक्षा जास्त आहे.
...
दुसऱ्या दरवाजा समोरच मारुतीचे मंदिर असुन दरवाजाला लागुनच एक विरगळ ठेवलेली आहे. या दरवाजापासून थोड्याच अंतरावर जहागीरदारांची गढी आहे. चौकोनी आकाराची हि गढी एक एकरवर पसरलेली असुन गढीच्या चार टोकाला चार व दरवाजाशेजारी दोन असे एकुण सहा बुरुज आहेत. गढीचा उत्तराभिमुख दरवाजा व त्याशेजारील दोन बुरुज घडीव दगडात बांधलेले असुन हे काम अतिशय सुबकतेने केले आहे. तटबंदीची उंची २५-३० फुट असुन तटाचा खालील भाग ओबडधोबड दगडांनी तर वरील भाग सफेद चिकणमातीच्या भेन्ड्यानी बांधलेला आहे. दरवाजाच्या कमानीवर दोन्ही बाजुस कमळ व पंजात हत्ती पकडलेले शरभ कोरलेले असुन चौकटीवर नक्षी कोरलेली आहे. शरभ,कमळ व नक्षीकामाचे हे दगड दुसऱ्या जुन्या बांधकामातील असावे असे वाटते. दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन त्यात दिंडी दरवाजा आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. गढीच्या आत जहागीरदार वंशजांची नव्याने बांधलेली घरे असुन आतील मूळ अवशेष पुर्णपणे नष्ट झाले आहेत. दरवाजाच्या डावीकडील तटात दरवाजा तसेच बुरुजावर जाण्यासाठी लहानसा बंदिस्त पायरीमार्ग आहे. दरवाजाच्या दिशेकडील तटबंदी वगळता इतर बाजुची तटबंदी काही प्रमाणात ढासळल्याने त्यावरून फेरी मारता येत नाही. दरवाजाच्या वरील भागातुन संपुर्ण जवळा गाव नजरेस पडते. याशिवाय गढीच्या नैऋत्येच्या कोपऱ्यात पीराचे ठाणे पहायला मिळते.संपुर्ण गढी पाहण्यास १५ मिनटे पुरेशी होतात. महाराष्ट्रातील काही घराणी आजही त्यांची वंशदर्शक नावे धारण करतात, जावळे येथील सोमवंशी क्षत्रिय घराणे त्याचपैकी एक. हे घराणे महाराष्ट्रात नेमके केव्हा आले हे इतिहासाला ठाऊक नसले तरी मराठ्यांच्या उत्तरेकडील मोहीमे दरम्यान या सोमवंशी घराण्याचा बाजीराव पेशवे यांच्याशी संबंध आला. निजामाबरोबर झालेल्या पालखेडच्या लढाईत सोमवंशी घराण्यातील दावलजी सोमवंशी यांचा उल्लेख येतो. या सोमवंशी घराण्यातील एक शाखा जवळा गावी स्थायीक झाली. दामाजीराव हे या शाखेचे मूळपुरूष मानले जातात. त्यांचा मुलगा पद्माजीराव सोमवंशी यांना १८५७ च्या उठावानंतर इ.स. ३१ जानेवारी १८५९ साली जवळा गावची देशमुखी मिळाली तर आनंदराव कृष्णराव सोमवंशी यांना २ एप्रिल १८७२ ला इनाम म्हणून जवळा गावाची जहागिरी मिळाली. पण हे इनाम कोणत्या कामगिरीसाठी मिळाले ते कळत नाही. जवळां गाव त्यांच्या जहागीरीचे गाव झाल्याने ते येथे सोमवंशी जहागिरदार म्हणुन ओळखले जातात.
© Suresh Nimbalkar