जवखेडा ठेंग

प्रकार : गढी

जिल्हा : जालना

उंची : 0

ज्या दुर्गकोटाना छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास लाभला अथवा जे कोट स्वराज्यात त्यांच्या अधिपत्याखाली होते अशा कोटांचा थोडाफार इतिहास आपल्याला माहित आहे. पण आज काही किल्ले महराष्ट्रात आहेत पण ते किल्ले कधी महाराजांच्या स्वराज्यात नव्हते अशा किल्ल्याची अवस्था मात्र आज अतिशय बिकट झाली आहे. मराठवाड्यात आपल्याला असे असंख्य गढीवजा कोट पहायला मिळतात. इतकेच नव्हे तर सपाट प्रदेशात दुरवर लक्ष ठेवण्यासाठी काही ठिकाणी एकांडा शिलेदार असलेल्या सुट्या बुरुजाची देखील बांधणी करण्यात आली. काळाच्या ओघात या बुरुजांची पडझड झाली व स्थानिकांनी तेथील दगड माती खाजगी वापरासाठी नेल्याने हे बुरुज पुर्णपणे नामशेष झाले तर काही बुरुज आजही आपले अस्तित्व दाखवत ठामपणे उभे आहेत. असाच एक सुटा बुरुज आपल्याला जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यात असलेल्या जवखेड ठेंग या गावात पहायला मिळतो. जवखेड ठेंग हे गाव भोकरदन येथुन २५ कि.मी. अंतरावर तर जाफराबाद येथुन १४ कि.मी.अंतरावर आहे. भोकरदन –जाफराबाद महामार्गापासून हे गाव साधारण ५ कि.मी.अंतरावर आहे. ... मध्ययुगीन काळात जाफराबाद व भोकरदन हि दोन्ही महत्वाची शहरे असल्याने या दोन्ही शहरात व्यापार उदीम असणे साहजिकच होते. मराठवाड्यातील पाण्याची कमतरता पहाता या दोन्ही शहरामध्ये होणारा व्यापारी तसेच सैन्य प्रवास हा केळणा नदीच्या काठाने होत होता. त्यामुळे या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केळणा नदीच्या काठावर असलेल्या जवखेड ठेंग या गावात एक उंच बुरुज बांधला गेला. पुढे नवीन मार्ग वापरात आल्याने या मार्गावरील बुरुजाचे महत्व संपुष्टात आले व हा बुरुज काळाच्या हवाली झाला. जवखेड ठेंग गावात प्रवेश करण्यापुर्वी दुरूनच केळणा नदीकाठी असलेल्या या बुरुजाचे दर्शन होते. साधारण २० फुट गोलाकार आकाराचा हा बुरुज ४० फुट उंच असुन याचे तळातील बांधकाम घडीव दगडांचे असावे. आज या बुरुजाच्या बांधकामात एकही दगड दिसुन येत नाही. तळातून फुगीर असलेला हा बुरुज वरील बाजुस निमुळता होत गेला आहे. बुरुजाचा आतील भाग भरीव असुन आजही हि पांढरी चिकणमाती तग धरून आहे. बुरुजाचे वरील भागात असलेल्या विटा पहाता बुरुजाचे वरील बांधकाम विटांनी केले असावे. मराठवाड्याचा हा भाग निजामाच्या ताब्यात असल्याने व बुरुजाचा वापर निजामकाळाच्या आधीपासुन बंद झाल्याने बुरुजाचा इतिहास स्थानिक जाणत्या माणसांना देखील सांगता येत नाही. बुरुजाची पडझड झाल्याने वरील भागात जाता येत नाही त्यामुळे पाच मिनिटात आपली बुरुजाची फेरी पुर्ण होते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!