जळगाव

प्रकार : नगरकोट

जिल्हा : जळगाव

उंची : 0

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा. आज जिल्ह्याला जळगाव नाव ज्या शहरामुळे मिळाले ते शहर मध्ययुगीन कालखंडापासुन खानदेशातील महत्वाचे शहर होते. पुर्वी हे शहर तटाबुरुजांनी बंदीस्त व खंदकाने संरक्षित होते पण वाढलेल्या लोकवस्तीने केव्हाच या तटाबुरुजाचा घास घेतला व खंदकाचे रुपांतर नाल्यात केले आहे. पण आजही या कोटाचे काही अवशेष आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत. जळगाव कोटाचे अवशेष असलेला हा परिसर म्हणजे मेहरूण. पूर्वीचे जळगाव शहर या मेहरूण भागातच सामावलेले होते. जळगाव कोटाचे हे अवशेष वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असुन दाट वस्तीतून वाट काढत आपल्याला हे अवशेष पहायला मिळतात. कोटाचा एक बुरुज मेहरूण रोडवर असुन ओळखीची खुण म्हणजे या बुरुजाजवळच मेहरूण मेडीकल स्टोर आहे. गोलाकार आकाराचा हा बुरुज साधारण ३० फुट उंच असुन आतील बाजुने पोकळ आहे. बुरुजाचे तळातील बांधकाम दगडांनी केलेले असुन त्यावरील बांधकाम विटांनी केलेले आहे. या बुरुजाला लागून असलेली तटबंदी पुर्णपणे नष्ट झाली असुन या बुरुजाचे एकुण बांधकाम पहाता हा कोटाच्या कोपऱ्यावरील बुरुज असावा असे वाटते. ... या बुरुजाच्या वरील भागात बंदुकीचा मारा करण्यासाठी असलेल्या जंग्या दिसुन येतात. या बुरुजाकडून रस्ता ओलांडुन सरळ चालत गेल्यास मध्ययुगीन काळातील एक मोटेची विहीर पहायला मिळते. या विहिरीवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करण्याची सोय दिसुन येते. पुर्वी मोटेने होणारा हा उपसा आता पंपाने केला जातो. याशिवाय कोटाचा दुसरा बुरुज तांबापुरा भागात असुन या बुरुजावर कुण्या बाबाचे थडगे बसवून त्याचे दर्ग्यात रुपांतर केलेले आहे. यानंतर दिसणारा कोटाचा तिसरा भाग म्हणजे कोटाच्या आतील भागात शासकीय कामासाठी असलेली गढी. हि गढी आज पुर्णपणे नष्ट झाली असुन तिचा केवळ लहानसा चौथरा शिल्लक आहे. हा चौथरा मेहरूण तलाठी कार्यालयाच्या समोर पहायला मिळतो. तलाठी कार्यालयाकडून सरळ रस्त्याने बाहेर पडल्यास या कोटाचा शिल्लक असलेला एकमेव दरवाजा पहायला मिळतो. या दरवाजाला सिमेंटचा गिलावा करण्यात आला असुन त्याला व तटाला लागुनच नव्याने घरे बांधण्यात आली आहेत. या दरवाजा समोरच नाल्यात रुपांतर झालेला कोटाचा खंदक आहे. जळगाव कोटाचे हे सर्व अवशेष फिरून पहाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. नगरकोट असल्याने या कोटाचा इतिहास कोठे वाचनात येत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!