जलालखेडा

प्रकार : भुईकोट

जिल्हा : नागपुर

उंची : 0

श्रेणी : सोपी

मानवी अतिक्रमणाची झळ महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांना लागल्याने त्या किल्ल्याची मुळ ओळख पुसली जाऊन आज ते नवीन नावाने ओळखले जातात. अशा अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे नागपुर मधील जलालखेड येथे असलेला भुईकोट किल्ला. या किल्ल्याची मूळ ओळख पुसली जाऊन आज हा किल्ला सोमेश्वर मंदीर किल्ला देवस्थान म्हणुन ओळखला जातो. आज हे ठिकाण किल्ला कमी व मंदीर म्हणुन जास्त प्रचलीत आहे. नागपूर जिल्ह्यात जांब व अन्नपूर्णा नदी तीरावर असलेले प्राचीन कुंतलापूर नगर म्हणजेच आजचे काटोल शहर. काटोल तालुक्यात वर्धा व जांब नदीच्या संगमावरच जलालखेड किल्ला बांधलेला आहे. नागपुर जलालखेडा हे अंतर ८३ कि.मी.असुन काटोल शहरापासुन हे अंतर २२ कि.मी.आहे. जलालखेडा गावाबाहेर नदीकाठी असलेला हा किल्ला सध्या सोमेश्वर मंदीर देवस्थान म्हणुन ओळखला जात असल्याने त्याच नावाने किल्ल्याची चौकशी करावी. गावातुन पक्का रस्ता किल्ल्यातील मंदिरापर्यंत जात असल्याने खाजगी वाहनाने आपण थेट किल्ल्यात प्रवेश करतो. ... आयताकृती आकाराचा हा किल्ला २५ एकरवर पसरलेला असुन किल्ल्यात कपाशीची शेती व संत्र्याची बाग केलेली असल्याने किल्ल्याचे बहुतांशी अवशेष पुर्णपणे नष्ट झालेले आहेत. किल्ल्याच्या दोन बाजुस वर्धा व जांब नदीचे पात्र असुन उर्वरीत दोन बाजुस खंदक खोदुन या नदीचे पात्र त्या खंदकात वळविण्यात आलेले आहे. किल्ल्यात जाणारा गाडीमार्ग या खंदकात उतरूनच आत शिरतो. किल्ल्यात प्रवेश करताना किल्ल्याचे पुर्वाभिमुख भव्य प्रवेशद्वार त्या शेजारील बुरुज व झाडीत लपलेली तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. संवर्धनाच्या नावाखाली संपुर्ण दरवाजाला सिमेंट थापुन त्यावर रंगरंगोटी केल्याने विटांच्या बांधकामात दिसणारे दरवाजाचे मुळ सौंदर्य लयाला गेले आहे. दरवाजावर असलेली शिल्पे या सिमेंटखाली झाकली गेली असुन गणपतीचे एक शिल्प व बंदुकीचा मारा करण्यासाठी असलेल्या काही जंग्या कसेबसे आपले स्थान टिकवून आहेत. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन शेजारील दोन्ही बुरुजात दुमजली दालने बांधलेली आहेत. दरवाजातुन आत शिरल्यावर काही अंतरावर वाटेच्या उजव्या बाजुला एक ढासळलेली वास्तु नजरेस पडते. या वास्तुच्या आवारात तीन थडगी पहायला मिळतात. थडग्याकडील वाटेने सरळ पुढे गेल्यावर वाटेच्या शेवटी असलेली किल्ल्याची तटबंदी व त्यातील ढासळलेला बुरुज पहायला मिळतो. बुरुज पाहुन परत गाडीमार्गावर येऊन किल्ला पहाण्यास सुरवात करावी. रस्त्याच्या डाव्या बाजूने एक मळलेली वाट झाडीत शिरताना दिसते. या वाटेने आत शिरल्यावर कपाशीच्या शेतात एका कोपऱ्यावर पिराची कबर दिसते. तिथुन मागे फिरून सरळ वाटेने पुढे जाताना डाव्या बाजुस किल्ल्याचा दुसरा बुरुज व त्यावर नव्याने बांधलेले मंदीर दिसते. वाटेच्या पुढील भागात किल्ल्यातील मोठा तलाव असुन त्याचे सध्या पटांगणात रुपांतर करण्यात आले आहे. तलावाच्या या काठावरच सोमेश्वर महादेवाचे मंदीर असुन मंदिरासमोरून पायऱ्याची एक वाट नदीकाठी जाते. या ठिकाणी असलेली किल्ल्याची तटबंदी पुर्णपणे नष्ट झालेली असुन येथुन थेट नदीपात्रात उतरता येते. या ठिकाणी बहुदा किल्ल्याचा नदीकाठचा दुसरा दरवाजा असावा पण हा भाग पुर्णपणे नष्ट झाल्याने ठोस विधान करता येत नाही. येथुन नदीपात्रात उतरुन किल्ल्याचा नदीच्या बाजूने आजही चांगल्या अवस्थेत असलेला बुरुज पहायला मिळतो. बुरुजाजवळ काही बांधकामाचे अवशेष दिसुन येतात.सोमेश्वर मंदिराकडून सरळ जाणारा रस्ता लहान उंचवट्यावर असलेल्या बालेकिल्ल्याच्या पायऱ्याकडे जाऊन थांबतो. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या २०-२५ पायऱ्या नव्याने बांधलेल्या असुन पायऱ्यांच्या वरील बाजुला एक विहीर पहायला मिळते. या ठिकाणी विहिरीचे पाणी किल्ल्यावर फिरवण्यासाठी असलेली व्यवस्था पहायला मिळते. बालेकिल्ल्यावर एक लहान मंदीर असुन त्याशेजारी बालेकिल्ल्यावर असलेला सुटा बुरुज आहे. या बुरुजावर नव्याने बांधलेले महादेवाचे मंदीर असुन या बुरुजावरून किल्ल्याचा आतील संपुर्ण भाग व बाहेरील दूरवरचा प्रदेश तसेच वर्धा व जांब नदीचे दूरवर पसरलेले पात्र नजरेस पडते. किल्ल्याच्या नदीच्या दिशेने असलेल्या बुरुजाकडे एका मंदिराचे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्याला फेरी मारताना दरवाजाकडील २ व तटबंदीत ८ असे एकुण १० बुरुज पहायला मिळतात. संपुर्ण किल्ला फिरण्यास १ तास पुरेसा होतो. या किल्ल्याची निर्मिती ४ थ्या शतकात वाकाटक राजांच्या काळात झाल्याचे अनुमान केले जाते. देवगिरी यादवांच्या पराभवानंतर हा भाग मोगलांचे मांडलिक असलेल्या देवगडच्या गोंड राजवटीखाली आला. इ.स.१७३८ मध्ये रघुजीराजे भोसले यांनी गोंड राजांचा पराभव करत या भागात मराठी राजवट स्थापन केली. याच काळात जलालखेडा येथील शिवमंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. इ.स.१७६५ मध्ये जानोजीराजे व मुधोजीराजे भोसले या भागात आले असता त्यांनी या किल्ल्यावर मुक्काम केल्याचे उल्लेख आढळतात. २० जानेवारी १७६९ रोजी माधवराव पेशव्यांनी हा किल्ला व आसपासचा परीसर ताब्यात घेतला पण नंतर हा प्रांत भोसल्यांच्या स्वाधीन केला. इ.स. १८२० साली हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!