जलसार कोट
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : पालघर
उंची : 0
श्रेणी : सोपी
मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण म्हणुन तर अलीबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणुन ओळखला जातो. उत्तर कोकणवर बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने त्यांनी या भागाच्या रक्षणासाठी व कारभारासाठी किनाऱ्यालगत अनेक लहान-लहान कोट बांधले. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फार थोडे अवशेषरुपात शिल्लक आहेत. वैतरणा खाडीमुखाजवळ असलेल्या जलसार गावातील कोट हा त्यापैकी एक कोट. जलसार कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेचे सफाळे रेल्वे स्थानक हे जवळचे ठिकाण असुन रेल्वे स्थानक ते जलसार हे अंतर साधारण ८ कि.मी.आहे. जलसार गावात जाण्यासाठी बस तसेच रिक्षाची सोय आहे. स्थानिकांना हा कोट पुर्णपणे अपरीचीत असल्याने पुरेशी माहीती घेऊनच या कोटाची भटकंती करावी.
...
जलसार गाव मुख्य रस्त्यावर असुन गावात प्रवेश केल्यावर पहिला चौक लागतो तो भवानी मंदिर असलेला. हा चौक पार करून आपण दुसऱ्या चौकात आल्यावर डावीकडे एक चायनिस पदार्थाचे खाद्यगृह आहे. या खाद्यगृहाच्या मागील बाजुस जलसार कोटाचे अवशेष आहेत. कधीकाळी १.५ एकरवर पसरलेल्या या कोटाचे आज मोजकेच अवशेष पहायला मिळतात. कोटात आता दिसत असलेली वास्तु म्हणजे या कोटामधील गिरीजाघर असावे. या वास्तुला दोन दालने असुन मुख्य दालनाला कमानीदार मोठा दरवाजा आहे. या दरवाजाच्या समोरील भिंतीत कमानीदार आयताकृती कोनाडा असुन दालनाच्या डावीकडील भिंतीत आत येण्यासाठी दुसरा लहान कमानीदार दरवाजा आहे. उजवीकडील भिंतीत दुसऱ्या दालनात जाण्यासाठी दुसरा लहान दरवाजा आहे. या वास्तुच्या बांधकामात ओबडधोबड दगड व चुना याचा वापर केलेला असुन आतील भिंतीना चुन्याचा गिलावा आहे. या वास्तुच्या परीसरात फिरताना तटबंदीचा पाया व काही भिंतीचे अवशेष पहायला मिळतात. हा एकूण परिसर पहाता हि वास्तु नांदती असताना बरीच मोठी असुन तिच्यासभोवती तटबंदी असल्याचे दिसुन येते. या वास्तुपासुन काही अंतरावर पोर्तुगीजकालीन विहीर असुन तिचे पाणी आजही वापरात आहे. हे ठिकाण कचेरी कि कोट हे ठामपणे सांगता येत नाही पण वास्तुचे स्थान व आकारमान पाहता या कोटाचा वापर पोर्तुगीजकालीन जकातीचे ठाणे अथवा कचेरी म्हणुन होत असावा. येथे काही प्रमाणात वस्ती देखील असावी. कोट पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो. सोळाव्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३९च्या वसई मोहिमे दरम्यान हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून बस्तान उठले ते कायमचेच. सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असल्यास या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar