जयनगर

प्रकार : गढी

जिल्हा : नंदुरबार

उंची : 0

श्रेणी : सोपी

एकेकाळी खानदेशात असणारे नंदुरबार खानदेशच्या विभाजनानंतर स्वतंत्र जिल्हा म्हणुन अस्तित्वात आले. अदीवासी बहुल असलेल्या या नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १५ किल्ले डोंगरी, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे महाराष्ट्रातील गडकिल्ले या पुस्तकातील ७ किल्ले वगळता इतर कोठेही या किल्ल्यांचा उल्लेख दिसुन येत नाही. आजच्या संगणकाच्या युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व किल्ल्यांचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. यात १३ गढीकिल्ले असुन त्यात १ गिरिदुर्ग, ३ भुईकोट २ नगरकोट तर उरलेल्या ७ गढी आहेत. यातील बहुतांशी गढीकोटात गावे वसलेली असल्याने गावातील वाढत्या वस्तीने या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे तसेच स्थानिकांची उदासीनता देखील या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. ... जयनगर गढी हि त्यापैकी एक. एकेकाळी खानदेशाचा भाग असणारे जयनगर खानदेशच्या विभाजनानंतर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्याचा भाग बनले. जयनगर गढी दक्षिण नंदुरबार भागात जयनगर गावात शहादा पासुन १५ कि.मी. अंतरावर आहे. जयनगर गढीला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नंदुरबार अथवा शहादा गाठावे लागते. नंदुरबार जयनगर हे अंतर ५३ कि.मी.असुन प्रकाशा- शहादा-कहातुल मार्गे तेथे जाता येते. जयनगर मधील हेरंब गणेश मंदिर या भागात प्रसिध्द आहे. पुजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मूळ मंदीर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले असुन गणेशमुर्ती होळकरकालीन आहे तर मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या मागील बाजुस एक जुना मोठा दगडी पार असुन या पाराकडून गढीकडे जाण्याची वाट आहे. या वाटेवर आपल्याला नागाचे सुंदर कोरीव शिल्प पहायला मिळते. जयनगर गढीचे अवशेष म्हणजे केवळ एक बुरुज व एका ठिकाणी दिसणारा तटबंदीचा पाया. या बुरुजाचे वैशिष्ट म्हणजे हा बुरुज आतील बाजुने पोकळ आहे. असे पोकळ बुरुज सहसा भुईकोटात आढळत नाहीत. गावकरी या बुरुजास तुपाचा बुरुज म्हणुन ओळखतात व पुर्वी त्यात तूप साठवीत असे सांगतात. गढीत असलेल्या वस्तीने गढीचे आतील अवशेष तटबंदी व बुरुज पुर्णपणे नष्ट केल्याने कोटाचा आकार व इतर अवशेष याबाबत अंदाज करता येत नाही. बुरुजाचे बाहेरील दगड गावकऱ्यांनी घरे बांधण्यासाठी काढलेले असुन केवळ आतील चिकट मातीच्या आधारे बुरुज आजही तग धरून आहे. गढीबाबत माहिती विचारली असता गावकरी हि गढी गोसावी घराण्याची असल्याचे सांगतात. या गोसावी घराण्याच्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजुस ५-६ बांधीव समाधी आहेत. सर्व समाधीचे बांधकाम पहाता या राज परीवारातील समाधी असल्याचे जाणवते. बुरुज व समाधी पहाण्यास १० मिनीटे पुरेसी होतात. गढीचा व गोसावी घराण्याचा उल्लेख इतिहासात आढळत नाही. येथे राहण्याची वेळ आल्यास हेरंब गणेश मंदिराच्या भक्त निवासात सोय होऊ शकते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!