जंगली जयगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : सातारा
उंची : २९८५ फुट
श्रेणी : कठीण
महाराष्ट्रात जयगड नावाचे दोन किल्ले आहेत. एक रत्नागिरी जिल्ह्यात असलेला जलदुर्ग जयगड तर दुसरा साताऱ्याच्या घनदाट जंगलात लपलेला जंगली जयगड. दाट जंगलामुळे भर उन्हाळ्यात जमीनीपर्यंत पोहोचु न शकणारा सुर्यप्रकाश व या जंगलाची सभोवती असणारी तटबंदी हीच या किल्ल्याची खरी संपत्ती आहे. इतिहासातील या किल्ल्याचे नाव ज्ञात नसुन येथील घनदाट जंगलामुळे याला जंगली जयगड नाव देण्यात आले असावे. प्रसिद्धीच्या फारसा झोतात नसलेला आणि संरक्षित क्षेत्रामुळे किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी करावी लागणारी यातायात यामुळे फारच कमी दुर्गप्रेमी या किल्ल्यास भेट देतात. जंगली जयगडाला जाण्यासाठी चिपळूण - पाटण - कराड रस्त्यावर चिपळूण पासून ४३ कि.मी.अंतरावर वर कोयनानगर गाव आहे. कोयनानगरपासून १९ कि.मी. अंतरावर नवजा गाव असुन नवजाला जाण्यासाठी बस तसेच खाजगी जीपची सोय आहे. जंगली जयगड आणि आसपासची गावे हा सर्व भाग कोयनाप्रकल्प आणि वनखात्याअंतर्गत संरक्षित करण्यात आलेला आहे. यासाठी वनखात्याचे ठराविक शुल्क भरून नवजा गावातूनच स्थानिक वाटाडय़ा सोबत घेतल्यास या गडाची भटकंती सहजपणे करता येते.
...
कोयना वनखात्याच्या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक-(०२३७२-२८४०९१). कराडवरुन चिपळूणला जाण्यासाठी कोयनानगर-हेळवाकमार्गे कुंभार्ली घाट आहे तसेच दुसरा घाटमार्ग नवजामार्गे पंचधारा बोगद्यामार्गे तळातील कोळकेवाडी गावात उतरतो. सुरक्षेच्या कारणास्तव हा घाट खाजगी गाड्यांना बंद आहे. नवजा गावातूनच ६ कि.मी. अंतरावर याच रस्त्यावर जंगली जयगडावर जाणारी वाट आहे. खाजगी वाहन सोबत असल्यास येथवर चालत जाण्याचे श्रम कमी होतात. मुख्य रस्त्यावर या गडाची वाट दर्शवणारा एकही फलक नाही तसेच वाट मळलेली असली तरी जंगलात मुख्य वाटेला २-३ फाटे फुटत असल्याने स्थानीक वाटाड्या सोबत असणे गरजेचे आहे. किल्ल्यावर पाणी नसल्यामुळे गावातूनच पुरेसे पाणी सोबत घ्यावे व रस्त्याने पंचधारा बोगद्याकडे आपली पदयात्रा सुरु करावी. या रस्त्यावर नवजा गावापासुन ३ कि.मी.अंतरावर एक चौकी आहे. ती ओलांडल्यावर साधारणपणे ३ कि.मी. अंतरावर एक कच्चा रस्ता डावीकडे डोंगरात गेलेला दिसतो. येथून डोंगर चढण्यास सुरुवात करावी. गडावर जाण्यासाठी हि एकमेव वाट असुन कोकणातून सरळ कडा असल्याने त्याबाजुने गडावर जाता येत नाही. घनदाट जंगलातून जाणाऱ्या या मळलेल्या वाटेने अर्ध्या तासात आपण पाण्याच्या झऱ्याजवळ पोहोचतो. जंगलाच्या या भागात हा पाण्याचा एकमेव स्त्रोत असल्याने येथे जंगली प्राण्यांचा वावर असतो. झऱ्याच्या वरील बाजुस वन विभागाने विश्रांतीसाठी एक दगडी कट्टा बांधलेला आहे. स्थानीक लोक या जागेस घोडतळे म्हणुन ओळखतात. ब्रिटीशांच्या काळात गडावर येणारे अधिकारी या ठिकाणी आपली घोडी थांबवुन पुढे पायी गडाकडे जात असे स्थानिक सांगतात पण ते पटत नाही. पाण्याचा हा नैसर्गिक स्त्रोत अलीकडील काळातील वाटतो शिवाय पुढे जाणारी वाट पहाता येथे थांबणारी घोडी अजुन बरेच अंतर पुढे जाऊ शकतात. झऱ्याच्या वरील बाजुस असलेल्या पायवाटेने साधारण २० मिनिटे चालल्यावर वाटेला दोन फाटे फुटतात. उजवीकडील वाट डिचोली गावाकडे जाते तर सरळ वर चढत जाणारी वाट गडाकडे जाते. येथुन डोंगरमाथ्याचा हा भाग निमुळता होण्यास सुरवात होते. वाटेने पुढे जाताना डाव्या बाजुस दरीकाठावर बांधलेला लहान गोलाकार बुरुज असुन त्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. हे बांधकाम अलीकडील काळातील असले तरी येथुन दिसणारा परिसर पहाता येथे पहाऱ्याचे मेट असावे. आपण चढुन आलो त्या डोंगराची सोंड आता खाली उतरू लागते. या सोंडेच्या डाव्या बाजुस संरक्षणासाठी लोखंडी कठडे उभारले आहेत. झाडीतुन उतरत जाणाऱ्या या सोंडेवर एका ठिकाणी वास्तु अवशेष असुन दोन ठिकाणी खडकातून चिरे काढल्याच्या खुणा दिसुन येतात. या सोंडेच्या टोकावर आल्यावर समोरच खोल दऱ्यांच्या मधोमध उघड्या-बोडक्या डोंरावर वसलेला जंगली जयगड दिसतो. घोडतळ्यापासून इथवर येण्यास अर्धा तास पुरेसा होतो. किल्ल्यावर येण्याचा मार्ग जरी घनदाट जंगलातुन असला तरी प्रत्यक्षात किल्ल्यावर एक दोन खुरटी झाडे वगळता कोणतेही मोठे झाड दिसत नाही. जंगली जयगड सह्य़ाद्रीच्या मुख्य रांगेतुन बाहेर आलेल्या एका निमुळत्या डोंगर्सोंडेवर बांधलेला असुन हि डोंगरसोंड एका चिंचोळ्या धारेने सह्य़ाद्रीशी जोडली गेली आहे. चिंचोळ्या धारेवरून खाली उतरत गडाकडे जाणारी हि पायवाट अतिशय काळजीपूर्वक पार करावी लागते. या धारेवर असलेले एक-दोन लहान उंचवटे टेपार करून आपण किल्ल्याच्या डोंगरासमोर पोहोचतो.किल्ल्याचा डोंगर व आपण आलो ती डोंगरधार यामध्ये किल्ल्याच्या संरक्षणासाठी खंदकाप्रमाणे खाच मारण्यात आली आहे. हि खाच ढासळू नये यासाठी खाचेच्या दोन्ही बाजुस रचीव दगडांची भिंत बांधलेली आहे, तरी देखील निसर्गाने आपले काम चोख बजावलेले आहे. या खाचेच्या समोरील बाजुस असलेला किल्ल्याचा दरवाजा व बुरुज ढासळून त्याचे दगड या खंदकात कोसळले आहे. खंदकाच्या उजवीकडे डोंगर उतारावर जांभ्या दगडातील तटबंदी दिसुन येते. खंदक पार करून समोरील डोंगरावर चढताना गोलाकार बुरुजाचा पाया दिसुन येतो. तेथे ढासळलेल्या वास्तुंमधुन आपण गडावर प्रवेश करतो. गडाचा माथा म्हणजे निमुळती डोंगरसोंड असुन दोन्ही बाजुस खोल दरी असल्याने प्रवेशाचा दर्शनी भाग वगळता कोठेही तटबंदी बांधलेली दिसुन येत नाही. गडाचा माथा समुद्रसपाटीपासुन २९८५ फुट उंचावर असुन पुर्वपश्चिम साधारण ४ एकरवर पसरलेला आहे. येथुन गडाच्या दुसऱ्या टोकाकडे जाताना दोन लहान कातळ सुळक्यांना वळसा घालून जावे लागते. पुढील सपाटीवर एका वास्तुचे अवशेष असुन त्यापुढील भागात पडके मंदिर आहे. मंदीराच्या चौथऱ्यावर असलेल्या कोनाड्यात ओळखता न येण्याइतपत झिजलेली गडदेवतेची मुर्ती आहे. चौथऱ्याच्या दर्शनी भागात दिपमाळेचे दोन भाग रचुन ठेवलेले असुन जवळच एक दगडी भांडे आहे. येथुन पुढील टप्पा चढताना आपण दोन बुरुजामधून चढत असल्याचे जाणवते. यातील एक बुरुज बहुतांशी नष्ट झाला असुन दुसरा चौकोनी बुरुज काही प्रमाणात शिल्लक आहे. या सपाटीवर एका मोठ्या वाड्याचा चौथरा असुन त्यावरील भिंती देखील काही प्रमाणात शिल्लक आहेत. वाडय़ाच्या मागील बाजुस उतारावर जांभ्या दगडात बांधलेली विहीर असुन सध्या या विहिरीत मोठ्या प्रमाणात माती साठलेली आहे. विहीर असलेल्या सपाटीवर मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असुन त्यात काही वास्तु अवशेष लपलेले आहेत. गडाचे हे पश्चिम टोक असुन या टोकावर भगवा झेंडा लावलेला आहे. किल्ल्याच्या या टोकावरून संपुर्ण तळकोकण तसेच कोळकेवाडी, बारवई, वासोटा, महिमंडणगड,मकरंदगड,रसाळगड, सुमारगड, महिपतगड,भैरवगड हे किल्ले नजरेस पडतात. या गडाचे एकुण स्थान पहाता कुंभार्ली घाट व आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी हा महत्वाचा टेहळणीचा किल्ला असावा. संपुर्ण किल्ला फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. पायथ्यापासुन गड पाहुन परत पायथ्याशी जाण्यास तीन-साडेतीन तास लागतात. नवजा गावात परतताना गावाच्या अलीकडे रामबाण नावाचे तीर्थस्थान आहे. येथे ७ x ७ फुट आकाराची ओबडधोबड जांभ्या दगडाची शिळा असुन या शिळेत ४ फुट उंचीवर बाणाच्या आकाराची त्रिकोणी खाच आहे. या खाचेत आत पोकळी असुन त्यात पाण्याचा जिवंत झरा आहे व हे पाणी कधीच आटत नसल्याचे सांगितले जाते. आम्ही एप्रिल महिन्यात गेलो तेव्हा मात्र हा झरा आटलेला होता. कोणी मांसाहार करून किंवा चपला घालुन या शिळेस स्पर्श केल्यास यातील पाणी काही काळासाठी आटते असे आम्हास सांगण्यात आले. जांभा दगड सछिद्र असल्याने पावसाचे पाणी यात पाझरून हि पोकळी पाण्याने भरली जात असावी व ठराविक काळापर्यंत हे पाणी त्यात साठत असावे. शिळा दाट जंगलात असुन त्यावर जराही प्रकाश पडत नसल्याने व पाण्याचे बाष्पीभवन होत नसल्याने हे पाणी जास्त काळ टिकत असावे. कुंभार्ली घाट व तळकोकणावर लक्ष ठेवण्यासाठी जंगली जयगडची निर्मिती करण्यात आली असावी. चंद्रराव मोरे यांची जावळी जिंकल्यावर हा प्रदेश शिवाजी महाराजांच्या अमलाखाली आला. गडाशेजारील हेळवाक गाव बाजारपेठ व या प्रदेशाचा महाल असुन जंगली जयगडचा समावेश हेळवाक महालात होत असे. इ.स. १७५८-५९ मध्ये पंतप्रतिनिधींकडील हा किल्ला पेशव्यांचे सरदार खंडोजी मानकर यांनी घेतला, पण पेशव्यांनी याचा ताबा परत पंतप्रतिनिधींकडे दिला. पुढे परशुराम पंतप्रतिनिधी गादीवर असताना इ.स.१८१० मध्ये प्रतिनिधींची आश्रित ताई तेलीण हिच्या ताब्यातून पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी हा किल्ला जिंकून घेतला. शेवटी इ.स.१८१८च्या इंग्रज-मराठे युद्धात कर्नल हिवेट याच्या नेतृत्वाखालील फौजेने हा किल्ला जिंकून घेतला. जंगली जयगडला रहाण्याची सोय नसली तरी नवजा गावात रहाण्याची व जेवणाची घरगुती सोय होते. नवजा गावातील संपर्क-अक्षय शेलार-७७४१८११०४१,रणजीत कदम-९३२२०६८९४१
© Suresh Nimbalkar