चौल्हेर

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशीक

उंची : ३५०० फुट

श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे आभाळात घुसणाऱ्या शिखर किल्यांचे गोकुळच आहे. नाशिक जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आधी सातमाळा रांग आणि नंतर सेलबारी-डोलबारी रांग दिसते. या दोन रांगांच्या मधल्या भागात काही किल्ले स्वतंत्रपणे वसलेले आहेत. चौल्हेर हा त्यातलाच एक गिरिदुर्ग. गिरणा आणि आरम नद्यांच्या खोऱ्यात हा किल्ला उभा आहे. चौल्हेर हा चौरगड ऊर्फ तिळवणचा किल्ला किंवा चाल्हेरीचा किल्ला या नावाने ओळखला जातो. चौल्हेरला पोहोचण्यासाठी नाशिक मार्गे ९५ किमी वरील सटाणा गाठावे. सटाण्यावरुन तिळवणला जाणारी एसटी पकडावी. तिळवणपासून अर्ध्या तासात आपण वाडी चौल्हेर गावात पोहचतो. चौल्हेरचा आकार हा साधारण साल्हेरसारखाच आहे. चौल्हेरची उंची ३७०० फूट असुन गड चढायला सोपा असला तरी काही ठिकाणी मात्र अंगावर येणारा उभा चढ आहे. वाडी चौल्हेर हे पायथ्याचे गाव असुन गावातच किल्ल्यावरुन उतरणारी एक डोंगरसोंड आहे. याच डोंगरसोंडेवरुन चालत किल्ल्यास पोहोचायला दोन टेकड्या पार करून जावे लागते. ... पहिली टेकडी पार केल्यावर किल्ल्याची खडी चढण सुरु होते. वाडी चौल्हेर गावातुन या किल्ल्यावर पोहोचायला साधारण १.३० ते २ तास लागतात. गडाचा दरवाजा प्रत्यक्ष समोर गेल्याशिवाय वाटेवरून कुठूनच दिसत नाही. गडावर शिरतांना एक भुयारी दरवाजांची रांग लागते. गडावर शिरण्यासाठी हे ४ दरवाजे पार करावे लागतात. चौल्हेरच्या दुर्गस्थापत्याची करामत ही त्याच्या दरवाजाच्या रचनेत आहे. गडाच्या पहिल्या दरवाज्याखाली कातळात खोदलेल्या बऱ्याचशा पायऱ्या आहेत. या दरवाजाचा आकार लहान असुन त्याच्या पुढे गेल्यावर किल्ल्याच्या दरवाज्याच्या बांधणीचे वैशिष्ठे दिसून येते. मुख्य प्रवेशमार्ग एका बोगदावजा रचनेतून तयार करण्यात आला असून एकूण तीन दरवाजांची रचना या बोगद्यात करण्यात आली आहे. पहिल्या दरवाजातून काही पायऱ्या चढून आत गेल्यावर दुसरा व सर्वात शेवटी तिसरा दरवाजा असून हा संपूर्ण मार्ग गोलाकार पध्दतीने बांधला आहे. या भुयारात अंधुक प्रकाश असुन दरवाजातच शत्रूला रोखून धरण्याची योजना बघायला मिळते. या दरवाजातून फिरताना देवगिरीच्या भुयारी मार्गाची आठवण येते. गडाच्या पायथ्यापासुन ते माथ्यापर्येंत एकूण सात दरवाजे आहेत. या दरवाज्यांची रचना कोरीवकाम अतिशय सुंदर असे आहे. शेवटच्या दरवाज्याच्या माथ्यावर एक बुरुज बांधलेला असुन या बुरुजाच्या बाजुस उघड्यावर शंकराची पिंड आहे. समोरील भिंतीवर दगडात कोरलेले व झिज झालेले एक पुरातन शिल्प आहे. येथून समोर नजर टाकली असता चौरंगनाथाची, गणेशाची व हनुमानाची मुर्ती असलेले पत्र्याने झाकलेले छोटे मंदिर दिसते. मुख्य दरवाजातून वर गेल्यावर डावीकडे आणि उजवीकडे असे गडाचे दोन भाग होतात. गडावर शिरल्यावर समोरच बालेकिल्ला आहे तर डावीकडे गडाची छोटीशी माची आहे. गडाच्या माचीवर शेवाळ साठलेल्या पाण्याची दोन टाके आहेत तसेच एक कोरडा पडलेला छोटा तलाव आहे तर शेवटच्या टोकाला तटबंदीचे काही अवशेष आहेत. माचीवर फेरफटका मारुन बालेकिल्याची वाट धरावी. माचीच्या खालील भागात कड्यात कोरलेले एक मोठे टाके नजरेस पडते पण आता तेथे जाण्याचा वाट नाही. गडावर अशी बरीचशी टाकी असुन त्यांना मोती टाके,शेवाळे टाके,हत्यार टाके,खेकडा टाके,लाल टाके अशी विविध नावे आहेत. बालेकिल्ल्याचे कातळाच्या डाव्या बाजूस असलेल्या पायवाटेने पुढे एक छोटासे नव्याने बांधलेले मंदिर आहे. येथुन पुढे गेल्यावर खडकात खोदलेले अजून एक टाके नजरेस पडते व या भागात देखील माचीवरील बुरुजासारखा अजुन एक बुरुज उध्वस्त अवस्थेत दिसून येतो. बालेकिल्ल्याला जाण्यासाठी दोन्ही बाजुंनी वाटा आहेत पण येथुन पुढे जाणारी वाट थोडीशी अवघड असल्याने परत मागे फिरून उजवीकडच्या वाटेने १० मिनिटात पायऱ्याने गडावर पोहचता येते. वाटेत मोतीटाके आणि अनेक पाण्याची कातळात खोदलेली टाकी आढळतात. मोती टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मोती टाक्याच्या शेजारी अजून एक टाके आहे. त्यातले पाणी शेवाळलेले असुन पिण्यायोग्य नाही. येथुन पुढे काही अंतरावरच बालेकिल्ल्याचा पडका दरवाजा आहे. या दरवाज्यातुन आतमध्ये प्रवेश केल्यावर समोरच पडक्या वाड्यांचे काही अवशेष आहेत. या वाड्याच्या डाव्या बाजुस काही अंतरावर गेले असता बालेकिल्यावरून खाली उतरणारा चोरदरवाजा दिसून येतो. या दरवाजात पडझडीमुळे बरीच माती साठलेली असुन वरखाली जाणे धोकादायक आहे. या दरवाजाशेजारी ४० x ९० फुट आकाराचे प्रचंड मोठे कोठार दगडात कोरलेले आहे. गडावरची पाण्याची टाकी व हे कोठार गडाची प्राचीनता सिद्ध करते. बालेकिल्यावर सुध्दा पाण्याची ४ जोड टाकी आढळतात पण त्यातील पाणी पिण्याजोगे नाही. येथुन पुढे समोरच ध्वजस्तंभ आपल्या दृष्टीक्षेपास येतो. बालेकिल्यावरुन संपूर्ण गडाचा घेरा लक्षात येतो तसेच सातमाळ रांग व सेलबारी-डोलबारी रांगेचे मोहक दर्शन होते. ध्वजस्तंभावरून अजमेरा, साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरा, हरगड, भिलाई, प्रेमगिरी, इंद्रमाळ, मार्कंडेय, रवळ्या-जावळ्या, धोडप, कांचना, कोळधेर, राजधेर, इंद्राई एवढा विस्तीर्ण परीसर दिसतो. चौल्हेरच्या जवळ पूर्वेकडे 'दीर-भावजय' या नावाचे वैशिष्ट्यपूर्ण सुळकेही दिसतात. गडाच्या दुसऱ्या बाजूकडील पठाराच्या टोकापाशी असणारा सरळसोट कडा छाती दडपून टाकतो. संपूर्ण गड फिरण्यास दोन तास पुरतात. चौल्हेर दुर्ग हा त्याच्या स्थापत्याच्या वैशिष्ट्यांसाठी भेट द्यावी असा आहे. वाडी या शब्दाचा अर्थ छोटी वसाहत असा होतो. किल्ल्याचा आटोपशीर आकार लक्षात घेता किल्ल्याची मुख्य वस्ती ही त्याच्या पायथ्याला असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच त्या गावाला वाडी चौल्हेर हे नाव मिळाले असावे. इतिहासाची पाने चाळली असता वाडी चौल्हेर या गावाला आधी मोठा कोट होता व येथे गवळी राजा राज्य करीत होता असे संदर्भ मिळतात. त्याच काळातील एक घोडपागा व तलाव वाडीचौल्हेर शेजारील डोंगरसोंडेवर आजही पहावयास मिळते. या राजाच्या हाताखाली काही हजारी सरदार होते यातील एक सरदार पुढे मोगलकाळात या परिसराची देखभाल करत होता. सुरतेच्या स्वारीच्या काळात हा किल्ला स्वराज्यात होता आणि याच काळात शिवाजी राजे या किल्ल्यावर आले होते असे स्थानिकाकडून सांगितले जाते पण याला संदर्भ आढळत नाहीत. या किल्ल्यावर दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पिठोरी अमावस्येला जत्रा भरते. गड वनखात्याच्या ताब्यात असुन वाटेवर धोकादायक ठिकाणी त्यांनी लोखंडी कठडे बांधले आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!