चोपडा
प्रकार : नगरकोट
जिल्हा : जळगाव
उंची : 0
श्रेणी : सोपी
जळगाव जिल्हा म्हटले कि आपल्याला आठवतात ती जळगावची केळी. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी रत्नावती नदीच्या काठावर असलेले हे तालुक्याचे शहर धुळ्यापासून ७५ कि.मी. तर जळगाव पासुन ५० कि.मी.अंतरावर आहे.पुर्वी खानदेशात असलेले चोपडा शहर मध्ययुगीन काळापासून नावाजलेले व गजबजलेले शहर होते. शहराच्या रक्षणासाठी या संपुर्ण शहरा सभोवती तटबंदी व तटबंदीत सहा दरवाजे होते. काळाच्या ओघात वाढत्या लोकवस्तीने हि संपुर्ण तटबंदी व दरवाजे नष्ट झाले असले तरी त्यातील दोन दरवाजे आजही आपले स्थान टिकवून आहेत. या दोन्ही दरवाजांचा जीर्णोद्धार करण्यात आला असुन त्यांची मूळ रचना मात्र कायम ठेवण्यात आली आहे. यातील शहराच्या दक्षिण वेशीत नदीच्या दिशेने असलेला दरवाजा म्हणजे पाटील दरवाजा. या दरवाजाचे नुतनीकरण केले असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले असले तरी या दरवाजाशेजारी असलेले दोन बुरुज पहाता येतात.
...
या दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्याची देवडी असुन तेथुन बुरुजावर जाण्यासाठी जिना असावा पण सध्या हा मार्ग बंद करण्यात आला आहे. या नंतरचा दुसरा दरवाजा म्हणजे शहराच्या पश्चिम तटबंदीत असलेला ठाण दरवाजा. शिरपुरच्या दिशेला असलेला हा दरवाजा शहराचा मुख्य वाहता दरवाजा असावा. पाटील दरवाजा व ठाण दरवाजा या दोन्ही दरवाजाची रचना वेगवेगळी आहे. पाटील दरवाजाचे बुरुज दरवाजाशी बिलगुन आहेत तर ठाण दरवाजाचे बुरुज पुढील बाजुस बांधलेले असुन दरवाजा मागील बाजुस आहे. या दरवाजाच्या आतील बाजूस असलेल्या देवडीत सध्या घर बांधलेले असुन एका बुरुजावर जाण्यासाठी आतील बाजुने जिना आहे. दरवाजासमोर मारुतीचे पुरातन मंदिर आहे. याशिवाय शहरात चोपडा गावचे वतनदार रावसाहेब श्रीपतराव देशमुख यांचा जुना वाडा आहे. कधी काळी तीन मजली असलेल्या या वाडयाची पडझड होऊन आज केवळ दोन मजले उरले आहेत तरीही या वाड्यातील लाकडावरील कोरीवकाम आवर्जुन पाहण्यासारखे आहे. वाड्याभोवती असलेली तटबंदी पुर्णपणे नष्ट झाली असुन या तटबंदीतील केवळ दरवाजाची कमान शिल्लक आहे. चोपड्याहुन यावलकडे जाताना नव्याने उभारलेल्या कारगिल चौकात एक तोफ ठेवलेली दिसते.
© Suresh Nimbalkar