चिपळूण लेणी
प्रकार : बौद्ध लेणी
जिल्हा : रत्नागिरी
श्रेणी : सोपी
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरापासुन काही अंतरावर अपरिचित असा तीन बौद्ध लेण्यांचा समुह आहे. खुद्द चिपळूणकरांना माहीत नसलेली हि लेणी 'बावशेवाडीची लेणी' अथवा नेहमीप्रमाणे पांडवलेणी म्हणुन ओळखली जातात. चिपळूण शहरापासुन हि लेणी ५ कि.मी.अंतरावर असुन नवीन चिपळूण-गुहागर बायपास रोडवर महालक्ष्मीच्या डोंगरात कोरलेली आहेत. चिपळूणमधुन या रस्त्याने जाताना एक लहानसा चढ पार केल्यावर पहिल्याच वळणावर रस्त्याच्या डाव्या बाजूला हि लेणी सहजपणे दिसुन येतात. लेण्यांची सध्याची अवस्था अतिशय बिकट असुन मोठ्या प्रमाणात झीज झाल्याने त्यावर कोणत्याही प्रकारचे कोरीवकाम दिसून येत नाही. कदाचित हि लेणी अर्धवटच कोरलेली असावी. यातील पहिले लेणे म्हणजे बौद्ध भिक्षुना राहण्यासाठी १० x १० फुट आकाराचा लहानसा विहार असुन याच्या भिंतीला लागुन झोपण्यासाठी दगडी बाक कोरलेला आहे. या विहारात एक भग्न विरगळ मांडलेली आहे.
...
दुसरे लेणे पहिल्या लेण्यापेक्षा थोडे मोठे असुन ते अर्धवट कोरलेले आहे. तिसऱ्या क्रमांकाचे लेणे म्हणजे चैत्य असुन यातील स्तुपाची काळाच्या ओघात झीज झालेली असुन छतालगत त्याची हर्मिका पहायला मिळते. खाली शिल्लक असलेल्या स्तुपाच्या भागावर नंदी व शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. या लेण्यापासुन काही अंतरावर खडकात कोरलेले पाण्याचे टाके असुन सध्या ते पुर्णपणे कोरडे पडलेले आहे. पाण्याचे टाके व मधले लेणे पहाता हि अपुर्ण लेणी असावीत त्यामुळे या लेण्यांचा कालावधी निश्चित करता येत नाही.
© Suresh Nimbalkar