चिक्कलांदिनी
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : बेळगाव
उंची : २५७० फुट
श्रेणी : सोपी
अपरीचीत किल्ल्याच्या वाटयाला आलेली दुर्दशा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादीत नसुन महाराष्ट्राच्या आसपास असलेल्या किल्ल्यांची देखील हीच अवस्था दिसुन येते. स्वराज्यात असणारा मराठी बेळगाव भाषावार प्रांतरचना करताना मात्र कर्नाटक राज्याला जोडला गेला. बेळगाव जिल्ह्यात असणारे हे किल्ले एकेकाळी स्वराज्याचा भाग असल्याने या किल्ल्यांना मी महाराष्ट्रातील किल्ले समजतो व त्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले म्हणुन करत आहे. बेळगाव जिल्ह्याची भटकंती करताना मला येथील ३५ पेक्षा जास्त गढीकोटांना भेट देता आली. या सर्व गढीकोटांची माहीती मी दुर्गभरारी या संकेतस्थळावर देण्याचा प्रयत्न केला आहे. वेळेचे व मार्गाचे व्यवस्थित नियोजन केल्यास खाजगी वाहनाने दिवसाला येथील ५-६ कोट पहाणे सहज शक्य आहे. बेळगाव जिल्ह्यातील बहुतांशी किल्ले हे भुईकोट अथवा गढी प्रकारातील असुन एखादा दुसरा अपवाद वगळता उंच गिरीदुर्ग फारच कमी आहेत. गिरीदुर्ग म्हणता येतील असे किल्ले लहानशा उंचवट्यावर अथवा टेकडीवर आहेत.
...
चिकलाद्दींनी हा उच्चारण्यास अवघड पण सर करण्यास सोपा असलेला किल्ला देखील असाच एका कमी उंच टेकडीच्या काठावर बांधलेला आहे. टेकडीच्या उर्वरीत भागात लहानसे पठार असुन त्यावर शेती केली जाते. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी चिकलाद्दींनी हे पायथ्याचे गाव आहे. मुंबई–बंगळूर महामार्गावर संकेश्वरहून बेळगावकडे जाताना २८ कि.मी. अंतरावर वंतमुरी गावातुन ६ कि.मी. वर असलेल्या चिकलाद्दींनी गावात जाणारा फाटा आहे. बेळगाव येथुन चिकलाद्दींनी गाव २४ कि.मी.वर तर गोकाक या तालुक्याच्या ठिकाणाहुन ४२ कि.मी.अंतरावर आहे. गावात प्रवेश करतानाच गावामागील १०० फुट उंच टेकडीवरील किल्ल्याचे बुरुज तटबंदी दिसायला सुरवात होते. किल्ला आज गावाच्या नावाने ओळखला जात असला तरी गावातील लोक मात्र या किल्ल्यास शिवाजीचा किल्ला म्हणुन ओळखतात. गावातील वस्तीतून किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट असुन गावापुढे असलेल्या शाळेकडील ८-१० घरांच्या वस्तीतून किल्ल्याच्या पठारावर जाणारी वाट आहे. पहिल्या वाटेने गेल्यास आपण मुख्य दरवाजाने किल्ल्यावर जातो तर दुसऱ्या वाटेने गेल्यास पठारावरील उध्वस्त तटबंदीतुन किल्ल्यात प्रवेश करतो. दुसऱ्या वाटेने गडावर जाताना लहानसा चढ चढुन आपण १० मिनिटात पठारावर पोहोचतो. पठारावर आल्यावर डावीकडे गडाची उध्वस्त तटबंदी पहायला मिळते. या उध्वस्त तटबंदीतुन आपण गडावर प्रवेश करतो. साधारण आयताकृती आकाराचा हा किल्ला ४ एकरवर दक्षिणोत्तर पसरलेला आहे. किल्ल्याच्या पश्चिम व दक्षिण बाजुस पठार असुन पुर्व व उत्तर बाजुस टेकडीचा उतार आहे. सध्या या तटबंदीची मोठया प्रमाणात पडझड झालेली असली तरी तटावरून गडाला फेरी मारता येते. किल्ल्याच्या पठाराच्या दिशेस दोन्ही बाजुस तटाबाहेर खोल खंदक खोदलेला असुन सध्या यात मोठया प्रमाणात झाडी वाढलेली आहे. किल्ल्याच्या कोपऱ्यावर हा खंदक लांबवर खोदत नेलेला दिसतो. कमी उतार असलेल्या किल्ल्याच्या उत्तर बाजुस दुहेरी तटबंदी बांधलेली असुन या तटबंदीतुन गडावर येण्यासाठी वळणदार मार्ग बांधला आहे. खालील बाजुस असलेल्या या तटबंदीत आत येण्यासाठी एकच दरवाजा बांधलेला असुन वरील भागात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे बांधलेले आहेत. यातील पहिला उत्तराभिमुख दरवाजा दोन बुरुजामध्ये बांधलेला असुन या दरवाजाने आपण गडात प्रवेश करतो. गडाचा दुसरा दरवाजा पुर्वाभिमुख असुन हा देखील दोन बुरुजात बांधलेला आहे. या दरवाजाने किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपण मुख्य किल्ल्यात वेगळी तटबंदी बांधून बंदीस्त केलेल्या लहानशा बालेकिल्ल्यात पोहोचतो. चौकोनी आकाराचा बालेकिल्ला पुर्व तटालगत बांधलेला असुन यात दुमजली वाड्याचे अवशेष आहेत. बालेकिल्ल्याच्या आतील एका टोकावर २५ फुट उंच बुरुज असुन बुरुजावर जाण्याचा दरवाजा जमिनीपासुन १५ फुट उंचावर बांधला आहे. बुरुजाची एका बाजूने पडझड झाली असल्याने तेथुन बुरुजावर जाता येते. बुरुजावरून किल्ल्याच्या अंतर्भागात तसेच बाहेर दूरवर नजर ठेवता येते. येथुन हिडकल धरणापर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो. बालेकिल्ल्यातुन गडात प्रवेश करण्यासाठी लहान दरवाजा आहे. पहिल्या उत्तराभिमुख दरवाजाने आल्यास आपण बालेकिल्ल्यात न जाता किल्ल्याच्या मुख्य भागात येतो. किल्ल्यावर येणारा माणूस बालेकिल्ल्यात जाऊ नये यासाठी हि दोन दरवाजांची योजना असावी. गडाच्या बाहेरील तटबंदीत एकुण १२ बुरुज आहेत. संपुर्ण गडफेरी करण्यास पाउण तास पुरेसा होतो. शिवाजीचा किल्ला हे शब्द वगळता या किल्ल्याविषयी फारशी माहिती मिळत नाही पण किल्ल्याची एकुण बांधणी व बेळगावशी असलेली याची जवळीक पहाता मराठयांचा या किल्ल्याच्या बांधणीत नक्कीच हातभार असावा.
© Suresh Nimbalkar