चापोरा

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : गोवा

उंची : २१५ फुट

श्रेणी : सोपी

दिल चाहता है !!! या हिंदी चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेला गोव्यातील एक किल्ला म्हणजे चापोरा. कधीकाळी केवळ गडप्रेमीना माहित असलेला हा किल्ला आता मात्र या चित्रपटाच्या छायाचित्रणामुळे पर्यटकांनी कायमचा गजबजलेला असतो. उत्तर गोव्यात वागातोर खाडीतुन होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. अंजुना गावाच्या पुढे वागातोर किनाऱ्याजवळ तिन बाजूनी समुद व एका बाजूने चापोरा खाडीच्या पाण्याने वेढलेल्या एका टेकडावर हा किल्ला उभा आहे. म्हापसा शहरापासुन वागातोर किनारा साधारण १० कि.मी.अंतरावर आहे. किल्ल्याच्या टेकडीच्या पायथ्यापर्यंत गाडीचा पक्का रस्ता आहे. रस्त्याने चापोरा किल्ल्याजवळ पोहोचल्यावर १० मिनिटाच्या चढाईत आपण किल्ल्याच्या आग्नेय दिशेकडील प्रवेशव्दाराने किल्ल्यावर प्रवेश करतो. किल्ल्याची टेकडी समुद्रसपाटीपासून २२५ फुट उंचावर असुन किल्ल्याचा परीसर ९ एकरवर पसरलेला आहे. संपुर्ण किल्ल्याच्या तटबंदीत एकूण सात बुरुज असुन यातील तीन बुरुज गोलाकार तर उर्वरीत चार बुरुज पोर्तुगीज शैलीतील बाणाकृती आकाराचे आहेत. किल्ल्याला एकूण चार लहान दरवाजे असुन आज यातील केवळ दोन दरवाजे वापरात आहेत. ... किल्ल्यावर काही वास्तुंचे चौथरे पहायला मिळतात. यातील एका चौथऱ्याच्या जागी कधीकाळी सेंट अँथनी चर्च असल्याचे सांगितले जाते. किल्ल्याच्या बांधकामात पोर्तुगीज शैलीचे खास वैशिष्ट असलेली सैनिकांना बुरुजावार उभे रहाण्यासाठी असलेली कॅप्सुल आकाराची चौकी या किल्ल्यावर पहायला मिळते. आज किल्ल्याचा अंतर्भाग पुर्णपणे उजाड झाला असला तरी आणीबाणीच्या काळात किल्ल्याबाहेर पडण्यासाठी पोर्तुगीजानी बांधलेल्या भुयारांचे तोंड तटबंदीबाहेर पहायला मिळते. संपुर्ण किल्ला पहाण्यास एक तास पुरेसा होतो. पोर्तुगीजांचे गोव्यात बस्तान बसण्यापुर्वी या भागावर विजापूरच्या अली आदिलशहाची सत्ता होती. त्याच्याच काळात म्हणजे १६व्या शतकात त्याच्या अधिकाऱ्याने येथे मुळचा चापोरा किल्ला बांधल्याचे मानले जाते. ह्या भागाचे मुळ शाहपुरा हे नाव पोर्तुगीज आमदानीत अपभ्रंशाने चापोरा झाले. १३ डिसेंबर १५७१ रोजी आदिलशहा व पोर्तुगीज यांच्यातील तहानुसार हा बारदेशचा हा भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. इ.स.१६१७ साली अदिलशहा, सावंतवाडीकर व स्थानिक देसायांपासून आपल्या प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. इ.स. १६८४ दरम्यान छत्रपती संभाजी महाराज गोव्याच्या मोहिमेवर असताना हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. पण काही काळाने इ.स.१७१७ दरम्यान पुन्हा हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. यावेळी त्यांनी किल्ल्याची नव्याने बांधणी केली. पुढे १७३९ ते १७४१ दरम्यान हा किल्ला सावंतवाडी संस्थानाच्या ताब्यात असल्याचे कागदोपत्री दिसून येते. त्यानंतर गोवा स्वतंत्र होईपर्यत हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. पोर्तुगीजानी २५०हुन अधिक वर्षे या किल्ल्यावर राज्य केले. आज या किल्ल्याने आपले पूर्वी असलेले वैभव गमावले असले तरी येथून निसर्गाचे अप्रतीम दर्शन होते. काही काळासाठी का होईना पण मराठ्यांच्या ताब्यात असलेला हा किल्ला पाहण्यासाठी एकदा तरी या किल्ल्याला भेट दयायलाच हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!