चाचडी

प्रकार : गढी

जिल्हा : बेळगाव

उंची : 0

श्रेणी : सोपी

बेळगाव जिल्ह्यातील सर्व गढीत हि गढी सर्वात जुनी असुन १२ व्या शतकात बांधलेल्या या गढीला ८०० वर्षाचा इतिहास आहे. बेळगाव शहरापासुन चाचडी गाव ४५ कि.मी.अंतरावर असुन पारसगड या तालुक्याच्या ठिकाणाहुन ५२ कि.मी.अंतरावर आहे. चाचडी गावात आल्यावर देसाई वाडा विचारले कि आपण बरोबर या गढीसमोर पोहोचतो. देसाईची २४ व्या वी पिढी आजही या गढीत वास्तव्यास आहे. गढी मालक नागराज देसाई मोठ्या आस्थेने आपल्याला गढी दाखवितात व गढीची माहिती देतात. आयताकृती आकाराची हि गढी पुर्वपश्चिम बांधलेली असुन गढीच्या तटबंदीत चार टोकाला चार बुरुज आहे. गढीचा परिसर एकुण दोन एकराचा आहे. गढीच्या एका बुरुजात मोठे शिवमंदिर बांधलेले असुन मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग व दोन्ही बाजुस दोन मोठया मुर्ती आहेत. गढीत प्रवेश करण्यापुर्वी प्रथम हे मंदीर पाहुन घ्यावे व नंतर गढीत प्रवेश करावा. ... गढीची रचना लढवय्या भुईकोटाप्रमाणे असुन तटबंदी व बुरुज यात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजुस डावीकडे नागशिल्प बसविले आले. या दरवाजाच्या आतील दुसरा दरवाजा काटकोनात बांधलेला असुन त्यावर नगारखाना बांधलेला आहे. त्या दरवाजा शेजारी आत जाण्यासाठी लहान दिंडी दरवाजा बांधलेला आहे. दोन्ही दरवाजामधील पटांगण भिंत बांधुन बंदीस्त करण्यात आले आहे. सध्या या चौकात गावात सापडलेले शिलालेख व प्राचीन अवशेष ठेवण्यात आले आहेत. येथे भिंतीवर एका जैन साधुचे शिल्प असुन हि गढी जैन स्थापत्य काराने बांधल्याचे सांगीतले जाते. या दरवाजातून आत आल्यावर दोन्ही बाजुस मोठ्या देवड्या असुन येथे या भागाचा प्रशासकीय कारभार चालत असे. सामान्य माणसाला येथुन पुढे प्रवेश बंद असे. सध्या येथे जुन्या काळातील मेणा ठेवण्यात आला आहे. येथुन आत आल्यावर मोकळे अंगण असुन डावीकडे जुन्या वास्तुत उभारलेले संग्रहालय आहे तर डावीकडील बाजुस भिंत असुन त्यात दरवाजा आहे. या दरवाजात काही कोरीव खांब असुन आतील बाजुस असलेली वास्तु भुईसपाट झाली आहे. संग्रहालयात आपल्याला १२ व्या शतकापासुन ते आजवर दैनदीन वापरातील असलेली व त्या काळी लढाईत वापरली जाणारी शस्त्रे पहायला मिळतात. संग्रहालय पाहुन झाल्यावर समोरील तिसऱ्या दरवाजाने देसाईंच्या वाडयाकडे जाता येते. तिसऱ्या दरवाजाबाहेर नागशिल्प आहे. संपुर्णपणे लाकडी कोरीवकामाने मढवलेला हा दुमजली वाडा गढीचे मुख्य आकर्षण आहे. या वाड्यात अनेक जुने ग्रंथ व छायाचित्रे पहायला मिळतात. गढी पहाण्यास १ तास पुरेसा होतो. आदिलशाही काळात गिजगनहळ्ळी, संपगाव, बिडी, परसगड ही गावे हिरमल्लप्पा व चिक्कमल्लप्पा या लिंगायत बंधुच्या देशमुखी वतनात सामील होती. या घराण्याला सर्जा अशी पदवी होती. आदिलशाही ते मराठा राज्याच्या अस्तापर्यंत साधारण २३९ वर्षे या घराण्यात बारा देसाई झाले. बेलवडी मधील छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प उभारणारे हेच देसाई घराणे. सुबापुर गिरिदुर्ग बांधताना मराठयांना याच चाचडी कोटातुन मदत केली जात होती. या भागावर सावनुरची सत्ता असताना तेथील नबाबाने येथील देसाईंना शक्ती प्रदर्शनासाठी बोलावले असता त्या देसाईंनी केवळ हाताने त्या काळ्या वाघाला ( चित्ता) ठार मारल्याने त्यांना “कारेहुली भालेराया’ (काळ्या वाघाला मारणारा) अशी पदवी मिळाली. हि माहिती या गढीची माहिती सांगताना नागराज देसाईनी सांगितलेली आहे. इ.स.१७५६ मध्ये सावनूरच्या नबाबाचा हा प्रांत मराठ्यांनी ताब्यात घेतला पण त्यांनी कित्तूर व गोकाक ही गावे मात्र येथील मुळ देसायांच्याच ताब्यात ठेवली. १७८५ मध्ये टिपूने कित्तूर जिंकले पण इ.स. १७९२ मध्ये मराठयांकडून पराभव झाल्याने श्रीरंगपट्टणच्या तहानुसार हा भाग पुन्हा मराठ्यांकडे आला. इ.स.१८०० च्या सुमारास काही दिवस हा भाग कोल्हापुरच्या धोंड्या वाघाच्या ताब्यात होता. कित्तुरच्या मल्लरजा देसाई यांच्या काळात चाचडी येथील देसाईनी स्वतंत्र राज्य केले. वीरप्पा नायक हे या संस्थानाचे आरंभिक शासक होते. देसाई घराण्याचे पंधरावे जहागीरदार सरदार वीरभद्रप्पा गुणप्पा यांनी बदललेल्या परिस्थितीत या संस्थानाला संजीवनी दिली. ब्रिटीश सरकारच्या अंमलात चाचडी संस्थानाअंतगर्त ३३ गावांचा समावेश होता. वीरभद्रप्पा गुणप्पा नायक देसाई यांचे शिक्षण, साहित्य, इतिहास, संस्कृती आणि शेती या क्षेत्रांमध्ये मोठे योगदान आहे. ब्रिटीश सरकारने त्यांना राव बहाद्दूर सरदार ही पदवी दिली होती.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!