चांभारगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : ६८० फुट

श्रेणी : मध्यम

महाड शहराला सातव्या शतकापासूनचा वैभवसंपन्न इतिहास आहे. सावित्री, गांधारी आणि काळ नदीच्या तीरावर असलेल्या महाड तालुक्यात गांधारी नदीकाठी सातव्या शतकातील गांधारपाले या बौद्धकालीन लेणी आहेत. महाहट्ट म्हणजेच मोठी पेठ या पाली शब्दाचा अपभ्रंश होत पुढे महाड हे नाव झाले अशी महाडची ओळख आहे. महाड ही या परिसरातील मोठी बाजारपेठ होती. सावित्री नदीच्या मार्गाने याठिकाणी गलबतातुन मोठया प्रमाणात व्यापार चालत असे. सावित्री नदीचा हा मार्ग गाळाने भरून गेल्याने महिकावंती बंदर आणि दासगाव बंदर या बंदरांचे केवळ अवशेष शिल्लक राहिले आहेत. बंदरावरील या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी दौलतगड,सोनगड,महेंद्रगड उर्फ चांभारगड या किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली. उत्तरेकडील रायगडापासून सुरु होणारी डोंगररांग चांभारगड व सोनगड ह्या गडांपाशी येऊन थांबत असल्याने स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड झाल्यावर रायगडाच्या प्रभावळीत समुद्राच्या दिशेने असलेल्या या किल्ल्यांना राजधानीच्या संरक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्व प्राप्त झाले. ... या किल्ल्यांच्या साखळीमुळे शत्रुला राजधानीवर सहज हल्ला करणे कठीण होते. यातील चांभारगडची निर्मिती नेमकी कोणत्या काळात झाली हे सांगणे जरी कठीण असले तरी गडावरची खांबटाकी पहाता गड शिवपुर्व काळापासूनच अस्तीत्वात असावा. रायगडचा उपदुर्ग असलेला हा किल्ला खाडीमार्गावरील टेहळणीचा एक महत्वाचा किल्ला होता. महाड शहरात महामार्गाला लागुन असलेल्या चांभारखिंड गावाच्या मागील बाजुस असलेल्या डोंगरावर या किल्ल्याचे अवशेष पहायला मिळतात. साधारण लंबगोलाकार माथा असलेला हा गड दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडाची समुद्रसपाटीपासून उंची ५५० फुट आहे. गडावर जाण्यासाठी गावातुनच वाट आहे. गावाच्या टोकाशी असलेल्या शाळेकडून एक वाट डोंगराच्या दिशेने जाताना दिसते. या वाटेने ५ मिनिटे पुढे आल्यावर एक लहान धरण दिसते. या धरणाच्या डावीकडील टेकाडावर चढल्यावर गडाकडे जाणारी वाट सुरु होते. गडावर फारसा वावर नसल्याने वाट मळलेली नाही त्यामुळे गडाच्या उजव्या बाजुस असलेल्या खिंडीचा अंदाज घेतच त्या दिशेने चढाई करायची. अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण या खिंडीत पोहोचतो. खिंडीत आल्यावर कातळकडा डावीकडे ठेवून थोडे पुढे जावे. येथुन वर जाणारी वाट पकडुन १५ मिनिटात भग्न झालेल्या पायऱ्यांनी आपण गडमाथ्यावर पोहोचतो. गडावर प्रवेश केल्यावर ४-५ भल्या मोठ्या शिळा इकडेतिकडे पडलेल्या दिसतात. गडमाथा म्हणजे एक छोटेसे पठार असुन गडमाथ्यावर भगवा झेंडा फडकताना दिसतो. पठारावर थोडे फार वास्तुंचे अवशेष असुन पठारावरून सरळ उत्तरेला गेल्यावर खालच्या भागात पाण्याची ३ टाकी दिसतात. एका ढासळलेल्या बुरूजाशेजारून पायवाट खाली या पाण्याच्या टाक्याकडे उतरते. टाक्याजवळ खांब रोवण्यासाठी काही खळगे कोरलेले दिसतात. खाली उतरल्यावर या टाक्याशेजारी अजुन एक पाण्याचे टाके पहायला मिळते. खडकात खोदलेली हि खांबटाकी पहाता गड पुरातन असल्याचा अंदाज करता येतो. याशिवाय गडाच्या पुर्वेला व त्याच्या विरुध्द बाजूस म्हणजे पश्चिमेला प्रत्येकी एक अशी दोन टाकी पहायला मिळतात. पठारावर आपण वर चढलो त्या खिंडीच्या दिशेला एका वास्तुचा चौथरा पहायला मिळतो. गडमाथ्यावरून दौलतगड,सोनगड,मंगळगड,रायगड हे किल्ले तसेच पोटला, गुहिरी व कळकाई डोंगर इतका दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. माथ्यावरून संपुर्ण महाड शहर नजरेस पडते. चाभारखिंड गावातुन गडावर येण्यास एक तास तर गड फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. चांभारगडबद्दल इतिहासात फारशा नोंदी उपलब्ध नाहीत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!