चऱ्होली
प्रकार : नगरकोट /गढी
जिल्हा : पुणे
उंची : 0
पुणे शहराच्या आसपास भटकंती करताना आपल्याला असंख्य गढी-वाडे व त्यासोबत काही नगरकोट देखील पहायला मिळतात. तापकीर पाटलांचे चर्होली बुद्रुक हे त्यापैकीच एक गाव. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असलेल्या चर्होली बुद्रुक या गावी आपल्याला सरदार तापकीर पाटील यांचे दोन वाडे तसेच गावाभोवती असलेला नगरकोट देखील पहायला मिळतो. पिंपरी – चिंचवडमध्ये वाढत असलेले शहरीकरण या गावापर्यंत आले असुन शहरीकरणाने या सर्व वास्तुंचा घास घेतला आहे. चर्होली बुद्रुक हे गाव पिंपरी शहरापासुन १५ कि.मी. अंतरावर तर ज्ञानेश्वर माऊलींची समाधी असलेल्या आळंदी येथुन ५ कि.मी.अंतरावर आहे. इंद्रायणी नदीकाठी दोन बाजुला चर्होली बुद्रुक व चर्होली खुर्द अशी दोन गावे वसलेली असुन चर्होली बुद्रुक हे तापकीर पाटलांचे गाव म्हणुन प्रसिद्ध आहे. गावात प्रवेश करताना आपल्याला गावाच्या वेशीत असलेला नगरकोटाचा दरवाजा पहायला मिळतो. या दरवाजाची लाकडी दारे आजही सुस्थितीत असुन त्यावर कोणत्याही प्रकारची संरक्षक रचना दिसुन येत नाही. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन प्रशस्त अशा या दरवाजातुन चारचाकी वाहने सहजपणे ये-जा करतात. हा दरवाजा वगळता नगरकोटाचे इतर कोणतेही अवशेष आज शिल्लक नाहीत.
...
या दरवाजाने आत आल्यावर थोडे पुढे जाऊन डावीकडे वळल्यावर आपण भैरवनाथ मंदिराजवळ पोहोचतो. या मंदिराजवळच अगदी अलीकडील काळापर्यंत म्हणजे २०१० सालापर्यंत तापकीर यांचा वाडा होता. हा वाडा दुलबाजी तापकीर पाटील यांचा असुन तो गवळोबाचा वाडा म्हणुन ओळखला जात असे. वाडा आता पुर्णपणे नष्ट करण्यात आला असुन त्याजागी नवीन इमारती उभ्या राहील्या आहेत. या वाड्याचा आता शिल्लक असलेला एकमेव अवशेष म्हणजे येथे असलेले भैरवनाथाचे मंदिर. पुर्णपणे घडीव दगडात बांधलेल्या या मंदिराच्या दरवाजाच्या कमानीवर व्याघ्र व शरभ शिल्प कोरलेले आहे. मंदीराचा सभामंडप गोलाकार कमानीवर तोललेला असुन त्याचे छत देखील घुमटाप्रमाणे आहे. मंदिरा शिवाय इतर काही शिल्लक नसल्याने ते पाहुन झाल्यावर सरळ जाऊन उजवीकडे वळल्यावर तापकीर पाटलांचा दुसरा वाडा आहे. तटबंदीच्या आत असलेला हा वाडा आजही शिल्लक असुन पडीक झाल्याने त्यात कोणीही रहात नाही. त्यामुळे हा वाडा देखील काळी काळाचा सोबती आहे. वाड्या भोवती असलेली तटबंदीचा तळातील अर्धा भाग दगडांनी बांधलेला असुन वरील भाग विटांनी बांधलेला आहे. या तटबंदीमध्ये असलेल्या दरवाजाची कमान पुर्णपणे विटांनी बांधलेली आहे. या तटबंदीत कधी काळी तीन दरवाजे असल्याचे स्थानिक सांगतात पण त्यातील हा एकमेव दरवाजा आज शिल्लक आहे. तटबंदीच्या आत बरीच मोकळी जागा असुन मध्यभागी तापकीर पाटलांचा दुमजली वाडा आहे. वाड्याचा चौथरा घडीव दगडांनी बांधलेला असुन त्यावरील बांधकाम विटांनी करून त्यावर चुन्याचा व मातीचा गिलावा दिलेला आहे. वाड्याची एकंदरीत रचना पहाता हा वाडा पेशवेपुर्वकालीन असावा असे वाटते. वाड्याच्या दर्शनी भागात असलेल्या चौकाचे लाकडी कामावर थोड्याफार प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. वाडा पडीक असल्याने आत फिरणे धोकादायक आहे. हा वाडा बरवाजी तापकीर पाटील यांचा असुन मधला वाडा म्हणुन ओळखला जातो. या शिवाय इंद्रायणी नदीकाठी गणपती मंदिरासमोर अजून एक वाडा पहायला मिळतो पण तो कोणाचा असावा हे सांगता येत नाही. चर्होली गाव फिरण्यासाठी एक तास पुरेसा होतो. इ.स. १६१० पासून तापकीर पाटील या घराण्याकडे पाटीलकीचे वतन असल्याचा उल्लेख होनप देशपांडे यांच्या घराण्यातील एका कागदपत्रात आढळतो. इ.स. १६९५ मधील एका पत्रात चर्होली गावची पाटीलकी या घराण्यात असल्याची नोंद आहे. "छ. राजाराम महाराजांनी देशाधिकारी प्र।। पुणे यांस आज्ञा केली की चंदीचे मुक्कामी दुलबाजी व बवाजी (तापकीर) यांना बोलावण्यात यावे कारण त्यांना पाटीलकीबद्दल दोन चौकूर जमीन इनामी बक्षीस दिली आहे. ती जमीन वंशपरंपरेने दिली असून त्यासंबंधी प्रतिवर्षी नवीन पत्राची अपेक्षा न करणे अशी आज्ञा विदित केली आहे."इ.स. १७५० मध्ये नानासाहेब पेशवे चन्होलीला गेले होते. तेथून ते चिखलीस गेले त्या वेळी चन्होली गावचे पाटील देवजी तापकीर यांनी पेशव्यांची भेट घेतली (कार्तिक ।२ रोज मंगळवार शके १६७२). मराठ्यांच्या इतिहासातील पेशवाईच्या कालखंडात तापकीर पाटील या घराण्यातील देवजीराव हे अत्यंत कर्तृत्ववान पुरुष होऊन गेले. त्यांचे घोडदळाचे पथक हे विशेष असे होते. त्यासंबंधीचा एक उल्लेख राघोबादादांनी नानासाहेब पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात आढळतो. "पुढे मल्हार नाईक व नागोराम बापूजी व देवजी तापकीर व सवाजी बोरगे व मनाजी शिंदे इतकी पथके घेऊन रवाना केली.या पथकाबरोबर चार हजार फौज सडी आहे. जर मीर मोगल निराला सापडला तरी त्याचा पराभव करतील किंवा भोवताली फिरतील. (शके १६८५, माघ शु || १३ ).
© Suresh Nimbalkar