चनई
प्रकार : गढी
जिल्हा : चंद्रपूर
विदर्भाच्या काही भागावर गोंड राजसत्तेनंतर राज्य आले ते नागपूरच्या भोसले घराण्याचे. या काळात त्यांनी काही किल्ल्यंची पुनर्बांधणी केली तर काही किल्ले नव्याने बांधले. पण या व्यतिरिक्त त्यांच्या काळात प्रशासकीय गढी तर काही ठिकाणी गावाच्या, शहराच्या रक्षणासाठी एकांड्या बुरुजाची बांधणी देखील करण्यात आली. पण याविषयी फारसे काही आपल्या वाचनात किंवा ऐकण्यात येत नाही. या भागाची डोळस भटकंती किंवा शोध भटकंती केल्यास आपल्याला पुर्णपणे अपरिचित अशा काही गढी व वास्तु पहायला मिळतात. चंद्रपूर जिल्ह्यात चनई गावात असलेली गढी त्यापैकी एक. चनई हे गाव चंद्रपूर जिल्ह्यापासून ५० कि.मी.अंतरावर तर कोरपना या तालुक्याच्या ठिकाणाहुन ४ कि.मी.अंतरावर आहे. चनई गावाचे चनई खुर्द व चनई बुद्रुक असे दोन भाग पडलेले असुन कोरपना-अदिलाबाद महामार्गापासुन हे गाव फक्त १ कि.मी.आत आहे. गढी ज्या ठिकाणी वसली आहे तो गावचा भाग येथे लहान चनई म्हणुन ओळखला जातो. गढी किंवा किल्ला म्हणुन स्थानिकांना विचारणा केली असता आपण सहजपणे या गढीजवळ पोहोचतो.
...
आयताकृती आकाराची हि गढी साधारण अर्धा एकरवर पसरलेली असुन गढीचा दर्शनी भाग म्हणजे दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला आहे. गढीची आज मोठ्या प्रमाणात पडझड झाली असुन थोड्याफार प्रमाणात तटबंदी व दोन फुटके बुरुज शिल्लक आहेत. गढीच्या आत पुर्वी या भागातील शेतसारा जमा करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या मालगुजार कुटुंबाचे घर आहे. गढीच्या तटावर मोठ्या प्रमाणात झाडी असुन आत सध्या गुरे बांधली जातात. मालगुजार कुटुंबातील एका वयोवृद्ध व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार कधीकाळी पाण्याची सोय म्हणुन गढीच्या आत विहीर होती पण नंतर त्यात गुरे पडु लागल्याने ती बुजवण्यात आली. नागपुरच्या भोसले राजसत्तेची ओळख सांगणारी हि गढी काळाच्या ओघात फारच जीर्ण झाली असुन लवकरच नष्ट होण्याच्या वाटेवर आहे. गढीत राहणाऱ्या गढी मालकाच्या वंशजांना गढीचा इतिहास व त्यांच्या पुर्वजाबद्दल देखील काही माहित नाही. आत बाहेरून गढी पाहण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात व आपण आपल्या पुढच्या गढीकोटाकडे रवाना होतो. स्थानिकात इतिहासाची पुर्णपणे बोंब असल्याने गढीचा इतिहास अबोल आहे.
© Suresh Nimbalkar