घोसाळगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : ८४३ फुट

श्रेणी : मध्यम

मुंबई - पणजी महामार्गाच्या पश्चिमेकडे असलेल्या रोहा शहराजवळ, अवचितगड व घोसाळगड हे किल्ले आहेत. रोहा शहरात जाण्यासाठी महामार्गावरील नागोठेणे तसेच कोलाड येथून फाटे आहेत. तसेच रोहे हे कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे रेल्वे स्थानकही आहे. रोहे एस.टी. स्थानकावरून घोसाळगडाला जाण्यासाठी एस.टी. बसेसची सोय आहे. घोसाळगड उर्फ विरगड हा किल्ला एका छोट्याशा टेकडीवर रेवदंडा व साळवे ह्या दोन खाड्यांच्यामधे चारही बाजुंना लहान मोठय़ा डोंगरांनी वेढलेला असुन मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. समुद्र सपाटीपासून २६० मीटर व पायथ्यापासून साधारण २०० मीटर उंच असलेल्या घोसाळगडाचा आकार दूरुन शिवलिंगासारखा भासतो. पायथ्याशी घोसाळे नावाचे गाव आहे ज्यावरून ह्याला घोसाळगड हे नाव पडले. उत्तर दक्षिण पसरलेला हा गड घोसाळे गावाच्या पश्चिमेकडे आहे. गावातूनच गडावर जाणारा रस्ता आहे. रस्ता संपल्यावर पायऱ्यांचा मार्ग केलेला आहे. ... पायऱ्यांच्या मार्गावर भवानी मातेचे मंदिर असून त्यात भवानी मातेची पुरातन मुर्ती आहे.त्यापुढे गणपतीची स्वयंभु गणेशमुर्ती असणारे प्रशस्त मंदिर आहे. येथुन पंधरावीस मिनिटांमधे आपण गडाच्या तटबंदीजवळ येवून पोहोचतो. समोरच कातळात कोरलेल्या दहाबारा पायऱ्या दिसतात. यातील काही पायऱ्या उध्वस्त झालेल्या आहेत. या पायऱ्यांवरुन वर जाताना मधे काही चांगल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या आपल्याला गडाच्या उध्वस्त दरवाजात घेऊन जातात. या भागात मोठया प्रमाणात बांधकामाचे चिरे विखुरलेले असुन या दगडात शरभ कोरलेले दोन घडीव दगड दिसतात. तटातून आत शिरल्यावर आपला गडात प्रवेश होतो. आत आल्यावर डावीकडे कड्याखाली एक पाण्याचे टाकं दिसते. तिथेच अलीकडे तटाच्या खालील बाजूस तटातून बाहेर उतरण्यासाठी लहान दरवाजा आहे. मुख्य दरवाजासमोरच बाहेर पडण्यासाठी दुसरा लहान दरवाजा बांधण्याचे प्रयोजन लक्षात येत नाही. येथे गडाचे दोन भाग पडतात. उजवीकडे किल्ल्याची माचीवजा सोंड तर डावीकडे बालेकिल्ल्याची टेकडी. अरुंद डोंगर सोंडेवर तटबंदी बांधून ही माची तयार केलेली असुन तटावर चढण्यासाठी काही ठिकाणी पायऱ्या बांधल्या आहेत. या तटबंदीत काही ठिकाणी शौचकूप पहायला मिळतात. माचीच्या टोकाला गोलाकार बुरुज बांधलेला आहे. इथून घोसाळगडचा बालेकिल्ला व्यवस्थित पहाता येतो. माची पाहून पुन्हा दरवाजाकडे परतायचे आणि डावीकडून बालेकिल्ल्याची वाट धरायची. थोडासा उंचवटा पार केला की आपण बालेकिल्ल्याच्या कड्याजवळ पोहचतो. येथे कडयाच्या वरील बाजुस दारूगोळ्याचे कोठार म्हणून जागा आहे पण वर जाणारी मुख्य वाट मात्र कड्याच्या मागील बाजूने आहे. या वाटेकडे जाताना डाव्या बाजुस जमिनीत खोदलेली पाण्याची टाकी दिसतात. या बाजूने बालेकिल्ल्याच्या डोंगराला वळसा देखील घालता येतो. उजवीकडच्या वाटेवर देखिल खालील बाजूस पाण्याचे एक टाके आहे. आपण मात्र थोडे वर चढुन कडा डाव्या बाजूला ठेवत पुढे निघायचे. या वाटेवर कड्यात काही गुहा खोदलेल्या आहेत. या गुहांसमोर एका दगडावर शिवलिंग कोरलेले आहे. पुढे एके ठिकाणी दरीमध्ये एक खांबटाके खोदलेले आहे. यासाठी थोडे खाली उतरुन जावे लागते पण पावसाळ्यात खाली उतरणे धोक्याचे आहे. टाके पाहून पुन्हा मुख्य वाटेला लागायचे. थोड्याच वेळात आपण बालेकिल्ल्याच्या मागील बाजूस पोहोचतो. येथे साधारण ८ फुट लांबीची एक तोफ पडलेली आहे. या तोफे समोरुन वर चढणारी वाट बालेकिल्ल्यावर जाते. या वाटेवर काहीशी घसरण असल्याने जरा जपूनच चढावे लागते. बालेकिल्ल्याच्या उंचवटय़ावर एक मोठा चौथरा व काही लहान चौथरे वगळता इतर कोणतेही अवशेष दिसून येत नाही. गडाच्या माथ्यावरून दुरवरचा परिसर नजरेस पडतो. गडाच्या माथ्यावरून तळागडाचे दर्शन होते. कुडे मांदाडच्या खाडीचे द्रश्य आपल्याला खिळवून ठेवते. बालेकिल्ल्याला घोसाळगड माचीवरुन प्रदक्षिणा देखील मारता येते. संपुर्ण गड फिरण्यास तीन तास पुरेसे होतात. घोसाळगड नक्की कधी बांधला गेला ते पुराव्याअभावी सांगता येत नसले तरी शिवपुर्व काळापासून अस्तित्वात असलेला हा किल्ला ताम्हण घाटमार्गे होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा. ताम्हण घाटमार्गे कोकणातील बंदरावर उतरणारा माल घाटमाथ्यावर नेला जात असे. १६व्या शतकात हा किल्ला निजामशाहच्या ताब्यात होता. इ.स. १६४८ मध्ये आदिलशाहीच्या ताब्यातील हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. ‘‘रघुनाथ बल्लाळ (कोरडे) सबनीस सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर चालिले त्यांनी जाऊन राजापुरी पावेतो तळे, घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला’’ असा उल्लेख सभासद बखरीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतल्यावर त्याचे नाव बदलून ‘वीरगड’ असे ठेवले. मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहानंतर जे १२ किल्ले स्वराज्यात राहीले त्यात घोसाळगड किल्ला होता. इ.स १६५९ मध्ये शिवाजी महाराज प्रतापगडाच्या समर प्रसंगात अडकलेले पाहून जंजिर्या्च्या सिद्धीने घोसाळगडाला वेढा दिला होता पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्दी वेढा उठवून निघून गेला. जंजिऱ्याजवळ असलेले घोसाळगडचे स्थान लक्षात घेता जंजी-याच्या सिद्दीने हा गड त्याच्या ताब्यात घेण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केलेला दिसतो. अखेरीस शिवाजीराजाच्या मृत्यूनंतर हा किल्ला सिद्दीकडे गेला. त्यानंतर सन १७३५ मधे बाजीरावाने हा जिंकून पुन्हा मराठ्यांकडे आणला. सन १८१८ मधे शेवटच्या इंग्रज-मराठा युद्धात कर्नल प्रॉथरने रायगड घेण्याआधी हा किल्ला काबीज केला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!