घोडबंदर

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : ठाणे

उंची : 0

श्रेणी : सोपी

झपाटयाने वाढणाऱ्या मुंबई शहरात व त्याच्या आसपासच्या परीसरात आजही काही किल्ले त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत. यातील एक प्रमुख किल्ला म्हणजे घोडबंदर किल्ला. पश्चिम द्रुतगती मार्गावर असलेले घोडबंदर हे ठिकाण बहुतेकांना माहीत असले तरी येथे असलेला घोडबंदर किल्ला मात्र दुर्गप्रेमी वगळता इतर कुणाला फारसा परीचीत नाही. उल्हास खाडीच्या दक्षिण काठावर असलेल्या एका लहानशा टेकडीवर हा किल्ला बांधलेला आहे. मुंबईजवळ असल्याने घोडबंदर किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. पश्चिम द्रुतगती मार्गावर मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने जाताना दहिसर पथकर नाक्यापुढील उड्डाणपुल पार केल्यावर एक चौक लागतो. या चौकातील डावीकडील फाट्यावरुन अगदी टोकापर्यंत गेल्यास आपण थेट घोडबंदर किल्ल्यात पोहोचतो. बोरिवली तसेच मीरा रोड रेल्वे स्थानकापासून घोडबंदर गावात जाण्यासाठी बससेवा आहे. गावातुन किल्ल्यावर जायला ५ मिनिटे लागतात. ... या वाटेवर नाना शंकरशेठ यांनी बांधलेले शिवमंदीर पहायला मिळते. घोडबंदर किल्ल्याची जमीनीच्या दिशेने असलेली बहुतांशी तटबंदी आज पुर्णपणे नष्ट झाली आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडील भागात तटबंदीच्या पायाचे अवशेष दिसतात तर पश्चिम तटबंदी वगळता कोठेही तटबंदी दिसुन येत नाही. तटबंदीच्या या दुरावस्थेमुळे किल्ल्याचा मुख्य दरवाजा नेमका कुठे होता हे कळत नाही. घोडबंदर किल्ला आता आपल्याला दोन भागात पहावा लागतो. एक म्हणजे महाराष्ट्र पर्यटन मंडळाने बांधलेला पर्यटक निवासाकडचा भाग आणि दुसरा गावातील वस्तीतुन मार्ग काढत जावा लागणारा भाग. गडाच्या पहिल्या भागात साधारण ४० पायऱ्या चढुन गेल्यावर एमटीडीसीने पर्यटक निवासात रुपांतर केलेली जुनी वास्तु पहायला मिळते. या वास्तूचा एकूण आकार व बांधकाम पहाता हे गिरीजाघर(चर्च) असावे. या पायऱ्या चढण्यापुर्वी समोर खाडीच्या दिशेला एक बुरुज आणि थोडीशी तटबंदी आहे. हा भाग पाहुन झाल्यावर खाली उतरून काही घरामधून वाट काढत गडाच्या दुसऱ्या भागात यावे. दुसऱ्या भागात नव्याने बांधलेल्या काही पायऱ्या चढून आपण भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश करतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजुस पोर्तुगीज शैलीतील कमानींची रांग दिसते तर उजवीकडे जमिनीत खोदलेले २५x२० फुट लांबीरुंदीचे १० फुट खोल पाण्याचे टाके दिसते. या टाक्यावर सिमेंटचा गिलावा करून त्याला आधुनिकीकरण केलेले आहे. कमानींच्या पुढील भागात १५x१५ फुट आकाराची पाच कोठारे असुन सध्या यांना देखील सिमेंटचा गिलावा करण्यात आला आहे. या इमारतीच्या उजव्या बाजुस थोडे उंचावर तटबंदीपासुन वेगळा घडीव दगडात बांधलेला एक मोठा गोल बुरुज आहे. किल्ल्याच्या अंतर्भागात असलेला हा बुरुज पुर्णपणे वेगळा असुन त्याची उंची पहाता तो फक्त टेहेळणीसाठीच बांधला गेला असावा. या बुरुजात एक दरवाजा असुन वर जाण्यासाठी आतील बाजुस पायऱ्यांचा मार्ग व एक कोठार आहे. या बुरुजाच्या आतील बाजुस असलेल्या दरवाजाची रचना वैशिष्ट्यपुर्ण असुन बुरुजाच्या माथ्यापर्यंत असलेल्या खाचांमधून हा दरवाजा वर खाली सरकवून उघड बंद करता येत असे. अशी रचना वसईच्या बालेकिल्ल्याच्या दरवाजास देखील पहायला मिळते. बुरुजाच्या पायऱ्या असलेल्या वाटेवर उजव्या बाजुस एक दरवाजा असुन त्याच्या आत कोठार आहे. या कोठाराचे छत म्हणजे बुरुजाचा माथा असुन हे कोठार बंदुका-दारुगोळा वगैरे सामुग्री ठेवण्यासाठी किंवा टेहेळणी करणाऱ्या सैनिकांच्या विश्रांतीसाठी वापरण्यात येत असावे. बुरुजातील या पायऱ्यावरून आपला प्रवेश थेट बुरुजाच्या माथ्यावर होतो. ह्या बुरुजाच्या माथ्यावरुन उल्हासखाडी व आजूबाजूचा दूरवरचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याच्या उत्तरेकडील तटबंदी आजही शिल्लक असुन त्यावर झाडी वाढली आहे. तटबंदीवर जाण्यासाठी किल्याच्या आतील भागातुन पायऱ्यां बांधल्या आहेत. या शिवाय किल्ल्याच्या इतर अवशेषात उध्वस्त वेदीची जागा व काही ठिकाणी कोसळलेली तटबंदी दिसून येते. संपूर्ण किल्ला फिरण्यास एक तास पुरेसा होतो. प्राचीनकाळी कल्याण हे एक महत्वाचे बंदर म्हणून प्रसिध्द होते. अरबी समुद्रातून उल्हास खाडी मार्गे कल्याण बंदरात जहाजांची येजा चालत असे. या जलमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला, धारावी किल्ला, घोडबंदर किल्ला, गायमुख किल्ला, नागलाबंदर किल्ला, दुर्गाडी किल्ला अशी किल्ल्यांची माळच वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी बांधली होती. घोडबंदर या नावाच्या उत्पत्तीबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. काहींच्या मते उल्हास खाडीजवळ उतरणारी सह्याद्रीची सोंड घोड्यासारखी दिसते म्हणुन या बंदराला घोडबंदर नाव पडले. तर काहींच्या मते पोर्तुगीज काळात अरबस्थानातुन येणारे घोडे या ठिकाणी उतरत असल्याने या जागेला घोडबंदर हे नाव पडले असावे. पण पोर्तुगीज येथे येण्यापुर्वी १३ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या महीकावतीची बखर या ग्रंथात घोडबंदर या ठिकाणाचा उल्लेख येतो. इ.स.१५३० च्या कालखंडात पोतुगीजांनी जेव्हा वसईचा किल्ला उभारला त्यावेळी त्याचा संरक्षणासाठी व खाडीतील व्यापारीमार्ग सुरक्षित रहावा म्हणून गायमुख, नागला बंदर,ठाणे,पिंपळास अशा अनेक किल्ल्यांचं जाळं विणलं. इ.स.१५५० च्या आसपास खाडीजवळील डोंगराळ भागात त्यांनी या किल्ल्याच्या उभारणीला सुरुवात केली. पोर्तुगीज कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख ककाबे दी तन्ना या नावाने येतो तर काही परदेशी प्रवास वर्णनात याचा उल्लेख हिप्पाकुरा या नावाने येतो. शिवकाळात घोडबंदर किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात असताना इ.स १६७२ मध्ये मराठयांनी या किल्ल्यावर अयशस्वी हल्ला केला होता. पुढे संभाजी महाराजांनी पालघरचा भाग स्वराज्यात आणला पण हा किल्ला मात्र पोर्तुगीजांच्या ताब्यात राहीला. इ.स.१७३७ पर्यंत ह्या भागावर पोर्तुगीजांची सत्ता असताना त्यांनी इथे एक चर्च बांधले ज्याचे रुपांतर आज पर्यटक निवासात झाले आहे. वसई किल्ल्यावर एल्गार करण्यापुर्वी १७३६ ते १७३८ दरम्यान या भागात ब-याच लढाया झाल्या आणि त्यातून ठाणे, गायमुख, कामणदुर्ग या किल्ल्यांसोबत घोडबंदर किल्ला देखील मराठ्यांनी जिंकला. घोडबंदर किल्ला मराठ्यांनी जिंकला त्यावेळी पोर्तुगिजांची २५० माणसे मारल्याची व ७ गलबते ताब्यात घेतल्याची नोंद आहे. वसईच्या लढाईत वसई किल्ल्याची नाकाबंदी करण्यासाठी या किल्यानं महत्वाची भुमिका निभावली असावी. इ.स.१७३८ मध्ये खंडोजी मानकर यांनी किल्ल्यामध्ये काही बांधकाम केल्याचे उल्लेख येतात. इ.स.१७८० मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला पण सालबाईच्या तहानुसार हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. इ.स.१८१८ मध्ये महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी या किल्यात ईस्ट इंडिया कंपनीच्या ठाणे जिल्हा प्रशासनाचे मुख्यालय बनवले. त्यावेळीचा ठाणे जिल्हा म्हणजे आजचं पालघर, वसई, मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेसोबत काही रायगड जिल्ह्यांतील काही भाग. या संपूर्ण भागाचा कारभार याच किल्ल्यात बसून कलेक्टर करायचा. सध्या हा किल्ला भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात असुन किल्ल्याची अवस्था वाईट आहे पण त्याची डागडुजी करून किल्ल्याच्या नुतनीकरणाचे प्रयत्न चालु आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!