घारापुरी

प्रकार : जलदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : ४०० फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे बोधचिन्ह असणारी घारापुरीची शैवमुर्ती व घारापुरी बेट त्यावरील लेण्यांमुळे जगप्रसिद्ध आहे. सध्या एलिफंटा नावानी ओळखल्या जाणाऱ्या व मुंबईपासून फक्त दहा किमीवर समुद्रात असणाऱ्या ह्या बेटावर किल्लादेखील आहे हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. काही इतिहासकारांच्या मते इथे शिलाहार काळातील किल्ला होता. संभाजीराजांनीही सन १६८२ मधे इथे काही दुरुस्ती केल्याचा उल्लेख सापडतो. हा किल्ला आणि त्यावरील तोफ़ा ब्रिटीशकालिन असल्या तरी या बेटाचा इतिहास पाहाता याठिकाणी पूर्वीच्या काळीही किल्ला असावा पण दुर्दैवाने आज ह्या ठिकाणी गडाचे फार कमी अवशेष दिसतात. गेट वे ऑफ इंडिया येथुन सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत घारापुरीला जाण्यासाठी बोटी मिळतात. बोटीचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. घारापुरी बेटावर पूर्व पश्चिम पसरलेले दोन डोंगर असुन पूर्वेकडील डोंगर २७० फुट उंच तर पश्चिमेचा डोंगर ५०० फुट उंच आहे. यातील डाव्या बाजुच्या डोंगरावर लेण्या आहेत तर उजव्या बाजुच्या डोंगरावर किल्ल्याचे अवशेष आहेत. ... घारापुरी बंदरावरून पायऱ्यांची वाटेने लेण्यांपर्यंत जायला पंधरा मिनिटे लागतात. या पायऱ्याच्या शेवटी दोन वाटा फ़ुटतात. डावीकडची वाट लेण्यांकडे तर उजवीकडची वाट किल्ल्याकडे जाते. उजवीकडे जाणाऱ्या वाटेने १० मिनिटाची चढाई केल्यावर किल्ल्याचे अवशेष दिसायला सुरवात होते. वाटेच्या उजव्या बाजुला वरती टेकडावर कोठाराची भिंत नजरेस पडते. या वाटेच्या खाली सैनिकांना राहाण्यासाठी बॅरॅक्स बांधलेल्या असुन जमिनी खालील बॅरॅक्समधे हवा खेळण्यासाठी जमिनीच्यावर वर आलेल्या पाईपांची टोक आत वरील पावसाचे पाणी येऊ नये यासाठी L आकारात बांधुन काढलेली आहेत. यातुन आत शुध्द हवा बॅरॅक्समधे येत असे. या बॅरॅक्समध्ये जाण्यासाठी तोफेकडून एक भुयारी मार्ग आहे व दुसरा मार्ग या वाटेखालुन आहे. या वाटेने पुढे गेल्यावर ३५ फ़ुट लांबीची एक प्रचंड तोफ़ दिसते. या तोफ़ेची वर खाली हालचाल करण्यासाठी खाली तळघरात गियर्स बसवलेले आहेत. तोफ़ेचा मारा सर्व दिशांनी करण्यासाठी तोफेचा चौथरा फिरता ठेवलेला असुन तोफ़ ३६० अंशात वळवण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्यासाठीही गियर्स बसवण्यात आले आहेत. तोफ़ेच्या खाली तळघरात उतरून हे पाहाता येते व तसेच बॅरॅक्समध्ये जाता येते. या बॅरॅक्समध्ये एकूण पाच खोल्या असुन चार लहान खोल्या व एक मोठी खोली अशी याची रचना आहे. तोफ़ेच्या खालच्या बाजूला दारूगोळ्यासाठी खोल्या बांधल्या आहेत. पहिली तोफ़ पाहुन दुसऱ्या तोफ़ेकडे जातांना वाटेत अजुन तीन ठिकाणी वास्तूंचे अवशेष दिसतात. यातील पहिल्या वास्तुची भिंत आपल्याला खालुन वर येताना दिसत असते. हे एक कोठार असुन याला देखील तळघराची रचना आहे. याच्या पुढील वास्तुत आपल्याला केवळ एका इमारतीचा पाया दिसून येतो. तिसरी वास्तू बुरुजासमान असुन घडीव दगडांनी बांधलेली आहे. या वास्तूत साठवणीची जागा तसेच राहण्याची सोय देखील आहे पण हि वास्तू देखील मोठया प्रमाणात ढासळत चाललेली आहे. या तीनही वास्तू पाहुन आपण दुसऱ्या तोफेकडे येतो. दुसरी तोफ़ही ३५ फ़ुट लांब असुन या तोफ़ेची रचना व बांधकाम पहिल्या तोफेसारखेच आहे. येथील सैनिकांचे बॅरॅक्स आधीच्या बॅरॅक्सपेक्षा जास्त खोल आहेत. या बॅरॅक्समध्ये एकूण चार खोल्या असुन तीन लहान खोल्या व एक मोठी खोली आहे. आत हवा येण्यासाठी वरील बाजुस फक्त एका ठिकाणी मोठा झरोका ठेवण्यात आला आहे. तोफ़ेच्या खालच्या बाजूला दारूगोळ्यासाठी खोल्या बांधल्या आहेत. तोफ़ेच्या खाली असलेल्या दारुगोळ्याच्या कोठारातून तो वर आणण्यासाठी चेन पुलीची रचना केलेली आहे. जमिनी खालील सैनिकांच्या बॅरॅक्समध्ये दोन ठिकाणाहुन जाता येते. या दोन तोफ़ा आणि तळघरे पाहीली की आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्याच्या पूर्वेला द्रोणागिरी किल्ला आणि दक्षिणेला खांदेरी- उंदेरी किल्ले नजरेस पडतात. किल्ला नीट पाहाण्यासाठी अंदाजे दीड तास लागतो. घारापुरी लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३००च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली असुन ह्या कामी ४० वर्षचा काळ लागला असावा. लेण्यांच्या दाराजवळच हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते त्यावरून या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या जिजामाता बागेत आहे. सहाव्या शतकात चालुक्य घराण्यांतील कीर्तीवर्मा याने इ.स. ५६७-५९१ मध्ये उत्तर कोकणावर स्वारीकरून मौर्यचा पराभव केला. त्याचा दुसरा राजा पुलकेशी याने ६११ ते ६४० चं दरम्यान मौर्यचे राज्य नष्ट करून कोकण प्रांत आपल्या ताब्यात घेतला. पुलकेशी चालुक्याने कोकणच्या मौर्यांची पुरी ही राजधानी काबिज केल्याचा उल्लेख ऐहोळे (कर्नाटक) येथील शिलालेखात आहे. कोकणच्या मौर्यांची पुरी ही राजधानी होती. पुरी म्हणजे घारापुरी. या मौर्याचे राजधानी घारापुरी शेजारचे मोर बंदर असावे. मौर्यांनंतर, बदामीचे चालुक्य, शिलाहार, राष्ट्रकुट, कल्याणीचे चालुक्य, देवगिरीचे यादव, गुजरातचा सुलतान यांची सत्ता घारापुरीवर होती. त्यानंतरच्या काळात मराठ्यांची सत्ता घारापुरीवर होती. ब्रिटीश काळात मुंबईशी या बेटाच असलेल सानिध्य पाहुन मुंबईच्या संरक्षणासाठी घारापुरी बेटावर किल्ला बांधण्यात आला. याच काळातील टेकडीच्या माथ्यावरील पोर्तुगिज बनावटीच्या दोन भव्य तोफा आपल्याला दिसतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!