गोवा- हर्णे किल्ला
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : रत्नागिरी
उंची : 0
श्रेणी : सोपी
हर्णे बंदराजवळ समुद्रात असलेल्या सुवर्णगडाची अभेद्यता वाढवण्यासाठी जमीनीच्या दिशेने गोवा(हर्णे), कनकदूर्ग व फत्तेगड हि दुर्गत्रयी उभारली गेली. यातील कनकदूर्ग व फत्तेगड यांच्यापेक्षा गोवा किल्ला विस्ताराने बराच मोठा व समुद्राकडील ढासळलेली तटबंदी वगळता आजही चांगल्या अवस्थेत उभा आहे. मुंबईहून दापोली मार्गे मुरुड हर्णे हे अंतर २३० कि.मी. आहे. हर्णे गावातुन साधारण एक कि.मी. अंतरावर हा किल्ला असुन गावातुन हर्णे बंदराकडे जाताना रस्त्याला लागूनच किल्ल्याचा पुर्वाभिमुख कमानीदार दरवाजा आहे. साधारण ५ एकरवर असलेला हा किल्ला समुद्राने तीन बाजूंनी वेढलेला असुन याच्या तटबंदीत लहानमोठे एकूण १४ बुरुज आहेत. किल्ल्याला जमिनीच्या दिशेने एक व समुद्राच्या दिशेने एक असे दोन दरवाजे आहेत. किल्ल्याचा मुख्य दरवाजा समुद्राकडील बाजूस असून तो आतील बाजुने दगडांनी बंद केला असल्याने सर्वप्रथम उजवीकडील बाजुने समुद्राकडे उतरून हा दरवाजा पाहुन घ्यावा.
...
दोन बुरुजात बांधलेल्या या दरवाजाबाहेर उजव्या बाजुस मारुतीची मूर्ती असुन दरवाजा खाली शरभशिल्प आहे. दरवाजाच्या डाव्या बाजुस गंडभेरुड व त्याने पायात पकडलेले चार हत्ती असे शिल्प आहे तर उजव्या बाजूस असलेल्या दुर्मिळ शिल्पात ३ कुत्र्यांनी एकमेकांचे गळे आपापल्या जबड्यात पकडले आहेत व पायात प्रत्येकी दोन हत्ती पकडले आहेत. या हत्तींनी आपापल्या सोंडांनी दुसर्या् हत्तींच्या शेपट्या पकडल्या आहेत. किल्ल्याचा हा समुद्राकडील दरवाजा बाहेरील बाजुने पाहुन झाल्यावर जमिनीच्या दिशेने असलेल्या दरवाजातुन किल्ल्यात प्रवेश करावा. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डावीकडील लहानशा उंचवट्यावर बांधलेला गडाचा बालेकिल्ला दिसतो तर उजवीकडे आपण पाहिलेल्या बंद दरवाजाची आतील बाजु दिसते. किल्ल्याचा हा उत्तराभिमुख दरवाजा मुख्य दरवाजा म्हणून वापरात होता. या दरवाजाच्या आतील बाजूस मोठया देवड्या असून दरवाजाच्या आतील चौकावर घुमटाकार बांधकाम आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजुस तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन या पायऱ्यांनी तटावर चढुन संपुर्ण किल्ल्यात फेरी मारता येते. तटावरून चालत गडाच्या पश्चिमेकडील तटबंदीवर जाताना काही ठिकाणी तटावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. या भागातूनच गडाच्या बालेकिल्ल्यावरील टेकडीवर पोहोचता येते. किल्ल्याच्या दक्षिण भाग इतर भागापासुन साधारण ३०-४० फुट उंचावर असल्याने हा भाग एका तटाने वेगळा करून त्याला बालेकिल्ला बनविले आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन या पायऱ्यांच्या वरील वरील बाजुस बालेकिल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एक दरवाजा होता. या दरवाजाचे दोन्ही बाजूंचे खांब आजही शिल्लक असुन कमान मात्र काळाच्या ओघात नष्ट झाली आहे. बालेकिल्ल्याच्या खालील बाजुस असलेल्या सपाटीवर गोलाकार आकाराचा एक मोठा खोल तलाव असुन त्यात बारमाही पाणी असते. पण वापर नसल्याने यात झाडी वाढली असुन हे पाणी पुर्णपणे शेवाळलेले आहे. या तलावाशेजारी छप्पर नसलेल्या दोन इमारतीचे अवशेष असुन यातील एक इमारत मोठी तर दुसरी लहान आकाराची आही. यातील एक इमारत म्हणजे कलेक्टर निवास तर दुसरी एक इमारत सर्वसामान्य इंग्रजांसाठी असल्याचा संदर्भ काही साधनांमधे येतो पण ते नेमके ओळखता येत नाहीत. तटाला असलेल्या पायर्यांजनी तटावर चढून फेरी मारताना सुवर्णदुर्गाचे संरक्षण करण्यासाठी हा किल्ला किती महत्त्वाचा होता याची जाणीव होते. हर्णे किल्ल्याची बांधणी नक्की केव्हा झाली हे माहीत नसले तरी किल्ल्याचा समुद्राकडील मुख्य दरवाजा व त्यावरील शिल्पे पहाता याची निर्मीती शिवकाळापुर्वीच झाली असावी. किल्ल्याच्या उत्तर बाजुस असलेला हा दरवाजा बहुदा आदिलशाहीच्या काळात बांधला असावा. किल्ल्याचे सामरीक महत्व संपल्यावर आत ये-जा करणे सोपे व्हावे यासाठी जमीनीकडील दरवाजा हा अगदी अलीकडील काळात बांधला गेला असल्याचे स्पष्ट दिसून येते. शिवाजी महाराजांच्या काळात सुवर्णदुर्ग सोबत हा किल्ला ताब्यात आल्यावर त्याची दुरुस्ती करण्यात आली. इ.स.१७५४ मध्ये आंग्रेच्या आरमाराने गोवा किल्ल्याजवळ डच कंपनीच्या तीन जहाजांवर हल्ला केला. यात डचांची दोन जहाजे जळाली व तिसरे मोडकळीस आले तर आंग्रे यांची काही जहाजे जळाली. १६ एप्रिल १७५५ च्या सुमारास रामाजी महादेव यांनी घेतलेल्या आंग्रे यांच्या चार किल्ल्यापैकी एक गोवा किल्ला होता. इ. स. १७५५ मध्ये पेशवे व इंग्रज यांच्यात झालेल्या तहानुसार सुवर्णदुर्ग किल्ल्याबरोबरच हा किल्लादेखील पेशव्यांकडे आला. इ.स. १८१८ मध्ये इंग्रज अधिकारी कर्नल केनेडी याने हा किल्ला पेशव्यांकडून जिंकून घेतला. इंग्रजांच्या ताब्यात किल्ला आल्यावर त्यांनी गडावर काही इमारती बांधल्या. इ.स.१८६२ मधल्या एका साधनात हा किल्ला चांगल्या अवस्थेत असुन त्यात ६९ तोफा व १९ सैनिक तैनात असल्याचे म्हटले आहे पण सध्या इथे एकही तोफ दिसत नाही.
© Suresh Nimbalkar