गोवळकोट
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : रत्नागीरी
उंची : २७० फुट
श्रेणी : सोपी
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहर कोकण रेल्वेने आणि मुंबई - गोवा महामार्गाने महाराष्ट्रातील सर्व शहरांशी जोडलेले आहे. वाहाते. प्राचिनकाळी चिपळूण शहरातून वहाणाऱ्या वाशिष्टी नदीतून व्यापारी वाहतुक होत असे. या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाडीच्या मुखावर अंजनवेल उर्फ गोपाळगड तर खाडीच्या अंतर्भागात गोविंदगड उर्फ गोवळकोट किल्ला उभारला गेला. चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीच्या काठावरील १६० फुट उंचीच्या एका टेकडीवर आजही गोवळकोट किल्ला दिमाखाने उभा आहे. या किल्ल्याच्या चारही बाजूंनी वाशिष्ठी नदी वहात असल्याने तिचे नैसर्गिक संरक्षण किल्ल्याला मिळाले आहे. चिपळूण शहरापासुन ४ कि.मी.अंतरावर असलेल्या या गडाच्या पायथ्याशी करंजेश्वर देवीचे सुंदर मंदिर आहे. गडावर मुक्काम करायचा असल्यास या मंदीरात रहाण्याची उत्तम व्यवस्था आहे. या मंदिराजवळुन गडावर जाण्यासाठी बांधीव वाट असुन या वाटेने १५ मिनिटात आपण दोन बुरुजामध्ये बांधलेल्या गडाच्या पुर्वाभिमुख उध्वस्त दरवाजात पोहोचतो.
...
किल्ल्याचा पुर्वपश्चिम पसरलेला डोंगर माची व बालेकिल्ला असा दोन भागात विभागलेला असुन माचीच्या भागात चिपळूण शहराला पाणीपुरवठा करणारे जलशुध्दीकरण केंद्र बांधलेले आहे. आपण किल्ल्यात प्रवेश करतो हा दरवाजा माचीतुन बालेकिल्ल्यात प्रवेश करताना बांधलेला आहे. या दरवाजाने किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजवीकडील बुरुजावर दोन व डावीकडील बुरुजावर दोन अशा चार तोफा पहायला मिळतात. बालेकिल्ल्याच्या तट साधारण ८ फूट रुंद असून आजही बऱ्यापैकी शिल्लक आहे. या तटबंदीत एकूण १२ बुरूज असुन त्यातील ६ बुरूज आजही चांगल्या स्थितीत आहेत. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या बांधल्या आहेत. डावीकडील तटावरून गडफेरीस सुरवात केल्यावर आपण तटाजवळ असलेल्या व अलीकडेच जीर्णोद्धार केलेल्या रेडजाई देवीच्या मंदीराजवळ पोहोचतो. मंदीराच्या अलीकडे असलेल्या बुरुजावर अजुन एक तोफ पहायला मिळते. मंदिराच्या आवारात साचपाण्याचा तलाव असुन या मंदीरात असलेली मुर्ती प्राचीन असल्याचे स्थानिक सांगतात. गडावर रहायचे असल्यास या मंदीरात रहाता येईल पण येथे पाण्याची सोय नाही. तटावरुन चालत किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीवर जाताना किल्ल्याच्या आतील भागात अनेक घरांचे चौथरे दिसतात. किल्ल्याच्या पश्चिम तटबंदीवरून वाशिष्ठी नदीचे पात्र, त्यातील होड्या, हिरवीगार शेते व त्यातून जाणारी कोकण रेल्वे तसेच मागे पसरलेला परशुराम डोंगर असे सुरेख दृश्य दिसते. किल्ल्याच्या पश्चिम तटबंदीत गडाचा उध्वस्त झालेला दुसरा उत्तराभिमुख दरवाजा आहे. खाडीच्या दिशेला असलेला हा गडाचा मुख्य दरवाजा असुन त्याची कमान पडली असली तरी शेजारील दोन बुरुज आणी दगडाचे खांब तेथे दरवाजा असल्याचे दर्शवितात. या दरवाजातुन खाली उतरुन गोवळकोट जेटीवर जाता येते. दरवाजा पाहुन झाल्यावर तटावरून खाली उतरून मधील वाटेने मागे वळावे. या वाटेने जाताना उजवीकडे ५०x४५ फुट लांबीरुंदीचा पाण्याचा प्रशस्त बांधिव हौद दिसतो. या संपुर्ण हौदाला चुन्याचा गिलावा केलेला असुन आत उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. हा हौद पावसाळा वगळता कायम कोरडा असतो. हौदाच्या मागील बाजूस मातीचा १०-१२ फुट उंच मातीचा ढिगारा असुन या ठिकाणी एखादा मोठा वाडा असावा. या उंचवट्यावरुन पुर्ण किल्ल्याचा आतील भाग नजरेस पडतो. बालेकिल्ल्याचा हा परीसर ३ एकरपेक्षा जास्त आहे. हौदाच्या उजवीकडे एका चौथऱ्यावर ओळीने मांडुन ठेवलेल्या सहा तोफा नजरेस पडतात. या तोफा गडाच्या पायथ्याशी गोवळकोट बंदरावर गेली २०० वर्षे अर्धवट गाडलेल्या अवस्थेत होत्या. इ.स. २०१६ साली श्री देवी करंजेश्वरी देवस्थान ट्रस्ट व राजे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने या तोफा गडावर आणल्या गेल्या. हौदाच्या डाव्या बाजुस चुन्याचा घाणा असुन त्याचे चाक मात्र जागेवर नाही. या घाण्याच्या पुढील भागात सदरेचा अथवा वाड्याचा भलामोठा चौथरा आहेहा चौथरा पाहुन सरळ आल्यावर आपण किल्ल्यात प्रवेश केलेल्या ठिकाणी येतो. येथुन बाहेर पडल्यावर आलेल्या वाटेने पायऱ्यानी खाली न उतरता समोर दिसणाऱ्या चिपळूण जलशुध्दीकरण केंद्राकडे जावे. या वाटेवर डाव्या बाजुला किल्ल्याची तटबंदी पहायला मिळते. जलशुध्दीकरण केंद्र पार करून पुढे आल्यावर टोकावर किल्ल्याचा आजही चांगल्या अवस्थेत असलेला बुरुज दिसतो. या बुरुजावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पाहण्यास एक तास पुरेसा होतो. गोविंदगड किंवा गोवळकोट नक्की कोणी बांधला याविषयी ठोस माहिती मिळत नाही पण हा किल्ला आदिलशाही काळात सिद्दीने बांधल्याचे मानले जाते. इ.स १६६० च्या सुमारास शिवाजी महाराजांनी अंजनवेलचा किल्ला व गोवळकोट हे किल्ले जिंकले व त्यांची नावे गोपाळगड व गोविंदगड अशी ठेवली.काही इतिहासकारांच्या मते आंग्रे घराणे कृष्णभक्त असल्याने हि नावे त्यांनी ठेवली असावीत. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर इ.स.१६८९ मध्ये गोवळकोट सिद्दीच्या ताब्यात गेला. इ.स.१७३३ मध्ये पंतप्रतिनिधी यांनी हा किल्ला सिद्दीकडून घेण्यासाठी प्रयत्न केले पण त्यात यश आले नाही. २० मार्च १७३६ रोजी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली सरदार पिलाजी जाधव व तुळाजी आंग्रे यांचे सरदार बाकाजी महाडिक यांनी गोवळकोटवर हल्ला केला. गोवळकोटच्या पश्चिमेला असलेल्या कालुस्त्याच्या टेकडीवरून मराठ्यानी तोफांचा मारा केला पण तोफगोळे गडावर पोहचत नव्हते यासाठी बाणकोट येथून लांब पल्ल्याच्या तोफा मागविल्या गेल्या. या लढाईत सिद्दी सात मारला गेला व त्याचे १३०० सैनिक ठार झाले तर मराठ्यांचे ८०० लोक पडले. यावेळी झालेल्या तहात गोवळकोट सिद्दीने आपल्याच ताब्यात ठेवला. १७४५ नंतर तुळाजी आंग्रे यांनी सिद्दीचा पराभव करून गडाचा ताबा घेतला. अखेर १८१८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने हा किल्ला पेशव्यांकडून जिंकून घेतला. इ.स.१८६२ साली किल्ल्यावर २१ तोफा असल्याचा उल्लेख इंग्रजी कागदपत्रात येतो.
© Suresh Nimbalkar