गोरक्षगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : २७६२ फुट
श्रेणी : मध्यम
अजंठा-सातमाळ डोंगररांगेतील अंकाई-टंकाई हा एक महत्वाचा किल्ला. सुरत-औरंगाबाद या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली व युध्दशास्त्राच्या दृष्टीने त्याला बळकट करण्यासाठी चोहोबाजूंनी कात्रा मेसणा,गोरक्षगड,माणिकपुंज यासारख्या उपदुर्गांची साखळी तयार केली गेली. या उपदुर्गांचा वापर प्रामुख्याने मुख्य किल्ल्याचे रक्षण व टेहळणीसाठी करण्यात आल्याने त्यांचा वेगळा असा इतिहास दिसुन येत नाही. किल्ल्यांच्या या साखळीमुळे अंकाई-टंकाईवर सहज हल्ला करणे कठीण झाले होते. यातील गोरक्षगडचा गॅझेटीयर अथवा इतर कोणत्याही कागदपत्रात किल्ला म्हणुन उल्लेख येत नसला तरी स्थानिक याचा गड म्हणुन करत असलेला उल्लेख व डोंगरावर असलेल्या गुहा व पाण्याची टाकी पहाता याचा किल्ला म्हणुन उल्लेख करावा का? यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकते. गोरक्षगड डोंगरावर तटाबुरुजाचे कोणतेही अवशेष आढळत नसल्याने हा प्रश्न अनुत्तरीतच रहातो पण अंकाई किल्ल्याच्या थेट समोरच असलेल्या या गडाकडे दुर्गभटक्यांची पाऊले वळल्याशिवाय रहात नाही.
...
अजंठा-सातमाळ डोंगररांगेतील अंकाई-टंकाई किल्ल्यापासुन काहीशी अलिप्त झालेल्या डोंगररांगेच्या सुरवातीला गोरक्षगड त्यामागे शंभुमहादेव डोंगर तर टोकाला कात्रा किल्ला आहे. गोरक्षगड नाशिककहुन निफाड –लासलगावमार्गे ८५ कि.मी. अंतरावर तर मनमाडहुन १० कि.मी. अंतरावर आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील विसापुर हे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. मनमाड-येवला मार्गावर अंकाई लोहमार्ग स्थानकाकडून विसापुर गावात जाणारा फाटा आहे. या फ़ाट्यावर श्री क्षेत्र गोरखनाथ (विसापूर गाव) अशी कमान लावलेली आहे. या फाटय़ावरून १ कि.मी. आत आल्यावर एक कच्चा रस्ता उजवीकडे किल्ल्याच्या पायथ्याशी जाताना दिसतो. ओळखण्याची खुण म्हणजे या रस्त्याच्या टोकाला डोंगराच्या पायथ्याशी एक मोठे वडाचे झाड दिसते. सोबत वाहन असल्यास वाहनाने त्या वडापर्यंत जाता येते. या वडाखाली नाथपंथीयांच्या काही समाध्या आहेत. येथुनच गडावर जाण्यासाठी बांधीव पायऱ्या आहेत. साधारण १५-२० पायऱ्या चढुन गेल्यावर उजवीकडे दगडी बांधकामातील तीन नक्षीदार समाध्या आहेत. साधारण १५ मिनिटे पायऱ्या चढुन गेल्यावर पायऱ्या संपुन पायवाटेला सुरवात होते. या वाटेने अर्धा तास चढल्यावर सरळ वर जाणाऱ्या या वाटेला उजवीकडे जाणारी दुसरी पायवाट दिसते. या दुसऱ्या पायवाटेने आपण गोरखनाथांच्या गुहेपाशी जाते. ही गुहा नैसर्गिक असुन त्यात काही प्रमाणात खोदकाम केले आहे. या गुहेत नवनाथांपैकी पाच नाथांच्या मुर्ती आहेत. गुहेच्या पुढील मार्ग बंद असल्याने गुहा पाहुन मुळ पायवाटेवर परत येउन कातळात कोरलेल्या ८-१० पायऱ्या चढत आपण डोंगराच्या कातळकड्याखाली पोहोचतो. या ठिकाणी कड्याखाली असलेल्या कपारीत दगडी बांधकाम करून दोन गुहा बनविल्या आहेत. या दोन्ही गुहा अलीकडील काळातील असुन त्यातील एका गुहेत कानिफनाथांची मुर्ती स्थापन केली आहे. या गुहेसमोर असलेल्या उंचवट्यावर चढुन उजव्या बाजूने कड्याला वळसा घालताना या वळणावर कड्यात असलेली अजून एक गुहा पहायला मिळते. हि गुहा अंकाई किल्ल्याच्या बरोबर समोर आहे. कड्याला वळसा घालुन आपण गुहेच्या मागील बाजुस येतो. या ठिकाणी काही प्रमाणात सपाटी आहे पण पुढे जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे मागे फिरून परत कानिफनाथांच्या गुहेकडे यावे. आता कड्याखालुन डाव्या बाजुने पुढे निघाल्यावर चौकोनी आकाराचे गुहेतील कातळात कोरलेल हिरव्यागार पाण्याच टाक पाहायला मिळत. या टाक्याच्या पुढे एक मोठी गुहा असुन या गुहेत देखील पाण्याचे टाके कोरले आहे. या टाक्याच्या काठावर चौरंगीनाथांची मुर्ती स्थापन केली आहे. इथुन पुढे जाणारी वाट काहीशी अवघड असुन डोंगराच्या पुढील भागात कोणतेही अवशेष नाहीत. गडाचा डोंगर पुर्वपश्चिम पसरलेला असुन समुद्रसपाटीपासुन २७३० फुट उंचावर आहे. गडावरील सर्व वास्तु कड्यात कोरलेल्या असुन कोठेही फारशी सपाटी नाही. पावसाळ्यात गुहेच्या पुढील भागात जाणे धोकादायक आहे. पायथ्यापासुन किल्ला चढुन फिरून परत येण्यासाठी दोन तास पुरेसे होतात.
© Suresh Nimbalkar