गोपाळगड

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : रत्नागिरी

उंची : २६० फुट

श्रेणी : सोपी

प्राचिनकाळी दाभोळ हे पश्चिम किनाऱ्यावरील एक प्रसिद्ध बंदर होते. दाभोळच्या खाडीतून होणारी व्यापारी जलवाहतुक थेट चिपळुण पर्यंत होत असे. या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाडीच्या मुखावर अंजनवेल उर्फ गोपाळगड तर खाडीच्या अंतर्भागात बंदराच्या रक्षणासाठी दाभोळचा किल्ला उभारला गेला. दाभोळच्या खाडीकिनारी एका टेकडीवर असलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला गुहागर तालुक्यातील अंजनवेल गाठावे लागते. मुंबई ते गुहागर हे अंतर २७० कि.मी. असुन गुहागरहून १४ कि.मी. वर अंजनवेल गावात गोपाळगड किल्ला आहे. गुहागरहून बसने आल्यास अंजनवेल गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो पण खाजगी वाहनाने थेट पठारावरील दरवाजापर्यंत जाता येते. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे असुन एक दरवाजा या बालेकिल्ल्याच्या तटबंदीत तर दुसरा दरवाजा समुद्राकडे आहे. सध्या येथील तटबंदी फोडुन व तो भराव खंदकात घालुन आत जाण्यासाठी रस्ता करण्यात आला आहे. ... तटबंदी फोडलेल्या ठिकाणी लोखंडाचे फाटक बांधलेले आहे. पण गडाच्या मुख्य दरवाजाने गडात प्रवेश करायचा असल्यास या तटबंदीला उजव्या बाजुने वळसा घालून पश्चिमेकडच्या तटबंदीतील मुख्य दरवाजाकडे जाता येते. दोन बुरुजातील वळणदार मार्गावर (गोमुखी) बांधलेल्या या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी देवड्या बांधलेल्या आहेत. किल्ल्याच्या आतील भागात आंब्याची बाग असुन संपुर्ण किल्ला या झाडांनी व्यापला आहे. या दरवाजाने आत आल्यावर डाव्या बाजुस काही अंतरावर कोरडी पडलेली खोल विहीर पहायला मिळते. या विहिरीपुढे तटबंदीजवळ एक मोठा हौद असुन त्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. या हौदाजवळ आयताकृती आकाराचे भिंती शिल्लक असलेले बांधकामाचे अवशेष पहायला मिळतात.या वास्तुच्या मागे असलेली तटबंदी फोडुन आत येण्यासाठी रस्ता बांधलेला आहे. येथे समोरच तटाच्या फांजीवर चढण्यासाठी पायऱ्या बांधल्या असुन फांजीवरून संपुर्ण किल्ल्याला फेरी मारता येते. गोपाळगड किल्ला ३०० फुट उंचीच्या टेकडीवर बांधला असुन टेकडीवरुन दोन बाजूंनी भक्कम तटबंदी खाली समुद्रापर्यंत नेलेली आहे. साधारण ७ एकरवर पसरलेल्या या किल्ल्याची बहुतांशी तटबंदी आजही सुस्थितीत आहे. या तटावर इ.स १७०७ मध्ये पर्शियन भाषेत कोरलेला एक शिलालेख होता जो आता जागेवर नाही. या शिलालेखाचे वाचन झाले असुन त्याचा मराठी अर्थ असा- जर कोणी एखादे बांधकाम हातात घेतले व ते चालू असताना त्याचा मृत्यू झाला तर त्याची मालकी दुसऱ्याकडे जात नाही का ? केवळ देव कालातीत आहे. त्याव्यतिरिक्त सगळे नश्वर आहे. जगाचा प्रकाश असणाऱ्या आमच्या राजाने ह्या किल्ल्याचे निर्माण योजले होते पण ते पाहण्यापूर्वी तो मरण पावला. दिनांक १० हिजरी सन १११९ म्हणजे इसवीसन १७०७. किल्ल्याला तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले असुन पठाराच्या दिशेने असलेल्या तटबंदीबाहेर संरक्षणासाठी खोल खंदक खोदलेला आहे. या भागात असलेली तटबंदी साधारण २० फुट उंच तर ८ फुट रुंद असुन या तटबंदीत १५ बुरुज आहेत. या बुरुजांवर तोफांसाठी जांभ्या दगडाचे गोलाकार चौथरे बांधलेले आहेत. तटावरून फेरी मारताना या तटाखाली निवासासाठी तसेच साठवणीसाठी बांधलेली कोठारे पहायला मिळतात. तटबंदीवरून फेरी मारताना वासिष्ठी नदीची खाडी, दाभोळ प्रकल्प, वेलदूर, टाळ्केश्वर दीपगृह व दुरवर पसरलेला समुद्र नजरेस पडतो. किल्याच्या मध्यवर्ती भागात कोरडया पडलेल्या दोन विहिरी व काही घरांचे चौथरे आपल्याला दिसतात. बालेकिल्ल्याचा खालील भाग पडकोट म्हणुन ओळखला जातो. या पडकोटाच्या टोकाला समुद्राकडील बाजूस कमानी आहेत. या कमानी शेजारी संकटकाळी बाहेर पडण्यासाठी चोर दरवाजा असुन त्याच्या समोरच शेवाळलेल्या पाण्याने भरलेले टाके आहे. परकोटाला समुद्राच्या बाजूने आत येण्यासाठी दुसरा दरवाजा आहे. या दरवाजाबाहेर कातळात खोदलेली पायऱ्याची विहीर असुन त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथुन बालेकिल्ल्यापर्यंत जाणाऱ्या तटबंदीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. गोपाळगड उर्फ अंजनवेल किल्ल्याची व परिसरातील घडामोडींची माहिती `अंजनवेलची वहिवाट` या मोडी कागदपत्रांत मिळते. सोळाव्या शतकात आदिलशाही काळात अंजनवेल गावात वाशिष्ठी नदीच्या मुखावर अंजनवेलचा किल्ला बांधण्यात आला. मोक्याच्या ठिकाणावर असल्याने त्याचे महत्व ओळखुन येथील सत्ताधाऱ्यानी मुळ किल्ल्यात वेळोवेळी बदल करत त्याला अधीक मजबुती आणली. इ.स. १६६०च्या दाभोळ स्वारीवेळी शिवाजी महाराजांनी अंजनवेलचा किल्ला अदिलशहाकडून जिंकून घेतला त्यावेळी त्याची काही प्रमाणात पुनर्बांधणी केली असावी. या काळात येथे नौदलासाठी गोदी बांधण्यात आली व किल्ल्याचे गोपाळगड नामकरण झाले असावे. इ.स १६९९ मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी खर्यातखान याने किल्ला जिंकला व पुढील ४६ वर्षे तो सिद्दीच्या ताब्यात होता. याच काळात किल्ल्याचा पडकोट बांधण्यात आला व वर उल्लेख केलेला शिलालेख कोरण्यात आला. या शिलालेखावर सिद्दीसातचे नाव कोरलेले आहे. काही इतिहासकार इ.स.१७४५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी याकूतखानाकडून अंजनवेल किल्ला जिंकल्यावर त्याचे गोपाळगड नामकरण केल्याचे मानतात. पेशव्यांचे सरदार रामजी महादेव बिवलकर ह्यांनी १७५६ मध्ये गोपाळगड जिंकला. पानिपतच्या युध्दानंतर ६ महीने गोपाळगड सदाशिवभाऊ यांच्या तोतयाच्या ताब्यात होता. त्यानंतर मात्र १८१८ पर्यंत गोपाळगड मराठ्यांच्याच ताब्यात राहीला. १७ मे १८१८ मधे इंग्रज कर्नल केनेडीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. इ.स. १८२९ पर्यंत किल्ल्यावर इंग्रजांचा सैनिकी तळ होता. सन १८६२ मधील एका साधनात ह्या किल्ल्यात ८८ तोफा असल्याचा उल्लेख येतो पण आज किल्ल्यात एकही तोफ दिसत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!