गाळणा

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशीक

उंची : २३१० फुट

श्रेणी : सोपी

इतिहासकाळात बागलाणचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा गाळणा किल्ला अनेक भव्य दरवाजे, बुलंद बुरुज, दिमाखदार तटबंदी, देखण्या चर्या, अनेक दुर्गद्वार शिल्पे, सुंदर महिरपी कमान, अनेक कातळ कोरीव गुंफा, शिलालेख, अंबरखाना, देखणे जलसंकुल अशा नानाविध दुर्गअवशेषांनी ऐश्वर्यसंपन्न बनला आहे. त्यामुळे हा गड खानदेशातील सर्वोत्तम डोंगरीदुर्ग म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील देवगिरी किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यास एकच मार्ग असून परकोट दरवाजा, लोखंडी दरवाजा, कोतवाल पीर दरवाजा व लाखा दरवाजा अशी अजस्त्र दरवाज्यांची मालिकाच या मार्गावर उभारण्यात आली आहे. या प्रवेशद्वारांच्या एका पाठोपाठ एक मालिकेमुळे एका दरवाज्यातून दुसऱ्या दरवाज्यापर्यंत येणारा मार्ग पूर्णपणे तोफेच्या माऱ्याच्या टप्प्यात येतो. त्यामुळे हा गड त्याकाळी अभेद्य मानला जात असे. गाळणा किल्ल्यावर जाण्यासाठी मालेगाव आणि धुळे या दोंन्ही बाजूंनी रस्ते आहेत. ... आपल्याला मालेगाव - डोंगराळे मार्गे गाळणा गावात पोहचता येते. मालेगावाहून डोंगराळे पर्यंत येण्यास एसटी बसेस आहेत. मालेगाव - डोंगराळे अंतर साधारणत: ३० किमी आहे. धुळ्याहूनही डोंगराळ्याला बसेस आहेत. हे अंतर साधारणपणे ३५ कि.मी आहे. डोंगराळेहून ४ किमी अंतरावर असलेल्या गाळणा गावात पोहचता येते. गाळणा हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पुर्वी संपुर्ण गाळणा गावाला तटबंदी असावी कारण आपला प्रवेश तटबंदीतील एका उध्वस्त दरवाजातुन गाळणा गावात होतो. किल्ल्याचा परिसर हा या दरवाज्यापासूनच सुरु होतो. या दरवाज्याच्या आजुबाजुला पडक्या तटबंदीचे अवशेष दिसतात. गांवाच्या वेशीवर येताचं डावीकडे दुरवर ठळक तटबंदी व मोठे बुरुज आपलं लक्ष वेधुन घेतात. गावांत किल्याच्या पायथ्याशी नाथपंथीय गोरखनाथ शिवपंचायतन मंदिर आहे. इथे आपली जेवणाची व रहाण्याची व्यवस्था होऊ शकते. समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची २३१६ फूट असून पायथ्यापासून अंदाजे ६०० फुट उंच हा किल्ला चढायला अर्धा-पाऊण तास पुरतो. मठाच्या बाजूने किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. या वाटेने आपण अवघ्या १० मिनीटांतच किल्ल्याच्या पहिल्या पुर्वाभिमुख परकोट दरवाज्यात पोहोचतो. हा जिबिचा दरवाजा म्हणजे चौकशी दरवाजा. दरवाजाच्या दोनही बाजुंना देवड्या अनं कोरीवकाम असुन कमानीच्या दोनही बाजूंवर माथ्याकडे कमळपुष्पे कोरली आहेत. गडाकडे जातांना प्रचंड लांबीचा कातळ व त्यावर गाळणा किल्ल्याची आकर्षक आणि भव्य तटबंदी लक्ष वेधून घेते. पुढे डाव्या बाजुला कातळात कोरलेल्या टाक्या आहेत तर थोडयाच चढाईनंतर दोन बुरुजांच्या आधाराने भरभक्कम व सुस्थितीत असणारा पश्चिमाभिमुख लोखंडी दरवाज़ा आहे. दरवाजा पाहूनच आपल्याला त्याच्या मजबूतीची कल्पना येते. दरवाजातून मागे पाहता लांबच्या लांब पसरलेली तटबंदी दिसते. दरवाजावरील पर्शियन भाषेतला शिलालेख,एैसपैस देवड्या, वरच्या भागातील महिरीपी व दरवाजाची बांधणी हे सर्व आवर्जुन पहाण्यासारखे आहे. पुढे डाव्या बाजुला आतील दरवाजा दिसतो. आत दोन्ही बाजुने प्रवेशद्वाराच्या माथ्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. डाव्या बाजुला पुर्वेकडुन येण्यास चोर दरवाजा आहे. या भागांत सलग सुरेख तटबंदी दिसते. गडाच्या तटबंदीवरील चर्या दिमाखदार असुन तटावरील एका दगडावर सुरेख व्याघ्रशिल्प आहे तर दरवाज्याच्या माथ्यावर शिलालेख कोरलेला आहे. या दरवाज्यातून थोडे पूढे गेल्यावर दोन वाटा फुटतात, एक वाट उजवीकडे तिसऱ्या दरवाजाकडे वळते, तर समोरची वाट दिंडी दरवाज्याकडे जाते. इथे डाव्या हाताच्या पायवाटेवर एक भग्न शिलालेख दिसतो. दिंडी दरवाज्यातून एक वाट खाली गावात उतरते पण ही वाट बरीच गैरसोयीची आहे. मागे येऊन पुन्हा २५ पाय-या चढून आपण तिस-या कोतवाल पीर दरवाजापाशी येतो. तिसऱ्या दरवाज्यातून आत शिरल्यावर पुढची वाट काटकोनात वळते. या ठिकाणी एका बाजूला कातळभिंत तर दुसऱ्या बाजुला किल्ल्याची तटबंदी यामधील चिंचोळ्या भागातून आपण पुढे जातो. नंतर २० पाय-या चढून गेल्यानंतर काही अंतरावरचा चौथा लाखा दरवाज़ा आहे. या दरवाज्याच्या उजव्या हाताला असणाऱ्या तटातील महिरपी कमान आपल्याला राजस्थानातील किल्ल्यांची आठवण करून देते. हा नक्षीदार दरवाजा आज पुर्णपणे ढासळत्या अवस्थेत आहे. कमानीच्या माथ्यावर दोन सुंदर दगडी कमळे कोरलेली असून पहारेकऱ्यांच्या देवडय़ा मात्र ढासळलेल्या आहेत. या चौथ्या दरवाज्यापासुन वर तटाकडे बघितले की एक नक्षीदार कोरीव खिडकी उभी आहे. संपुर्ण दगडातली कोरलेली तिची दर्शनी चौकट तेवढी शिल्लक आहे. या भागांत वाटेवर ब-यांच ठिकाणी आजुबाजूला अनेक कोरीव शिळा विखुरलेल्या आढळतात. दरवाज्यातून आत शिरल्यावर तीन वाटा लागतात. समोर जाणारी वाट ही किल्ल्याच्या माथ्यावर जाते. आपण आधी डावीकडची वाट पकडायची. तटबंदीवरुन चालत असतांना गाळण्याची तटबंदी किती मजबूत आहे याची कल्पना येते. बुरुजांवर तोफा फिरवण्यासाठी असणाऱ्या खांबाची व्यवस्था केलेली आहे. बुरुजाखाली तटात बांधलेले एक शौचालय तसेच एक चोर दरवाजा आढळतो. या भागाच्या सर्वात शेवटी एक गुप्त दरवाजा आहे पण तिथपर्यंत जाण्याची वाट ढासळलेली आहे. तटबंदी आणि किल्ल्याची कातळभिंत यामध्ये बरीच पाण्याची टाकी आहेत. हे सर्व पाहून परत दरवाजापाशी यायचे व उजवीकडची वाट धरायची.उजव्या बाजुला तटबंदीवर दोन सुरेख नक्षीदार सज्जे लक्ष वेधतात. सज्जाला चार नक्षीदार खांब असुन त्यातले दोन ढासळलेले आहेत.थोडे पुढे गेल्यावर आपण सज्जापाशी येऊन पोहचतो. हाच तो सज्जा जो खालून आपले लक्ष वेधून घेत असतो. सज्जातुन किल्याची भव्यता सहज लक्षात येते. इथून किल्ल्याचे चारही दरवाजे व्यवस्थित दिसतात. इथून पुढे गेल्यावर डावीकडच्या कातळात एकामागोमाग एक खोदलेल्या पाच गुहा आपणास दिसतात. यापैकी कातळ कोरून केलेले एक गुहामंदिर आहे त्या गुहेत महादेवाची पिंड आहे. या पिंडीशेजारी मारुती कोरलाय तर पिंडीमागे गणपतींची मुर्ती आहे. यातील काही खोलगट गुहा पाण्याने भरलेल्या तर काही कोरडय़ाच आहेत. आपण येथून उजव्या बाजूच्या तटावरील सुंदर चर्या पाहात पुढे गेल्यावर तटबंदी अचानक खाली काटकोनात वळते. सलग पाषाणाच्या तटात दोन ठिकाणी शरभशिल्पे दिसतात तर मधोमध इ. स.१५६९चा एक फारशी शिलालेख आहे. उजवीकडे तटाच्या बांधकामातचं पुर्वाभिमुख गुप्त दरवाज़ा आहे तो थेट ख़ाली पहिल्या दरवाज्यापर्यंत नेतो पण सध्या तो मार्ग बंद आहे. खाली उतरल्यावर समोरच एक पाण्याचे टाके दिसते. इथून थोडे अंतर पुढे गेल्यास एक वाट कातळातून खाली उतरत जाऊन किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्याला येऊन मिळते. पण ही वाट बरीच कठीण आहे. हे सर्व पाहून दरवाज्यातून वर यायचे. किल्ल्याची तटबंदी बरीच लांब पर्यंत पसरलेली दिसते. वेळ असल्यास या तटबंदीवरुन चालत जाऊन संपूर्ण किल्ल्याला वळसा सुध्दा मारता येतो. अन्यथा माघारी फिरुन चौथ्या दरवाज्यापाशी यायचे आणि माथ्याकडची वाट धरायची. येथून पायऱ्यांच्या वाटेने वर गेल्यावर आपणास उजव्या हाताला एक सुंदर महिरपी कमान पाहायला मिळते. माथ्यावर पोहचल्यावर आपण एका मशिदीसमोर येऊन पोहोचतो. या मशिदीच्या जागी १५ व्या शतकात गाळणेश्वर महादेवाचे मंदिर होते. या नावावरूनच हा गड गाळणा नावाने ओळखला जातो. पण इ.स. १५२६ मध्ये अहमदनगरचा बादशाहा बुरहान निजामशहाने या किल्ल्यावर आक्रमण करून हे मंदिर जमीनदोस्त केले व या ठिकाणी सध्याची मशीद उभी केली. हा महत्त्वपूर्ण उल्लेख ‘बुरहाने मासीन’ या ग्रंथात आपणास वाचावयास मिळतो. या मशिदीच्या खांबावर कुराणातील आयते कोरलेले असून मशिदीच्या माथ्यावर सुंदर मिनार आहेत. त्यातले खांब व आतील कोरीव काम मात्र मंदिराची आठवण करून देते. मशिदीच्या डाव्या हाताला आपणास २० फूट खोलीचा एक बांधीव हौद पाहायला मिळतो. येथून गडाच्या डाव्या बाजूला एक वाट जाते तर मशिदीच्या मागून एक वाट उजव्या बाजूला जाते. यातील डाव्या बाजूच्या वाटेने पुढे गेल्यावर आपण अंबरखान्याच्या भग्न वास्तूजवळ येऊन पोहोचतो. या वास्तूपलीकडेच गडाची सदर आपणास दिसते. इतिहास काळात नानाप्रकारची खलबते अनुभवलेली ही सदरेची वास्तू सध्या मात्र कशीबशी उभी असून तिच्या भग्न भिंतीतील देवळ्या मात्र आजही शाबूत आहेत. याच्या पुढे आपल्याला ढासळत असलेली हमामखान्याची इमारत दिसून येते. ही वास्तू आपण डोळसपणे पहावी म्हणून तिचे वर्णन देत नाही.पण येथील पाणी गरम करण्याचा चुल्हाणा,खापरी नळ,आंघोळीचे टाके,गरम वाफ बाहेर जाऊ नये यासाठी केलेली रचना सारे काही पहाण्यासारखे आहे. येथून गडाच्या डाव्या टोकावरील बुरुजावर जायचे. या बुरुजाच्या भिंतीत एक पर्शियन शिलालेख व त्याच्या डाव्या-उजव्या बाजूस दोन व्यालांची शिल्पे आहेत. या बुरुजाच्या माथ्यावरून खाली पाहिल्यावर गडाचा पूर्व बाजूचा तिहेरी कोट व त्याच्यामध्ये एकाखाली एक या पद्धतीने खोदलेली पाण्याची टाकी आपणास पाहायला मिळतात. या बाजूच्या तटाची उंची तब्बल ३५ ते ४० फूट आहे. मशीदीच्या मागच्या बाजूस एक बांधीव तळे आहे. हेच काय ते किल्ल्यावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचे तळे. इथे पाण्याची टाकी आणी डावीकडे एक इमारत दिसते. हा महाल असावा. या ठिकाणी तीन कमानींनी तोललेली दगडी वास्तू असून तिच्या आतमध्ये बाराही महिने थंडगार पाणी वाहणारा झरा आहे. या झऱ्याचे पाणी साठविण्यासाठी आतमध्ये दगडी कुंड असून या झऱ्याचे पाणी जिवंत राहण्यासाठी या वास्तूच्या माथ्यावर छप्पर बांधलेले नाही. इथे दोन हौद आहेत. लहान हौदातून मोठ्या हौदात पाणी जायची केलेली रचना वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. महालाच्या भिंतीवर पर्शियन भाषेतील शिलालेख असुन त्यावर काही करंट्यांनी नावे कोरली आहेत. मशिदी समोरुन एक वाट किल्ल्याच्या पूर्व टोकाला जाते. येथे काही वाड्यांचे अवशेष आहेत. गडाच्या उत्तरेकडील एका बुरूजांवर शके १५८०चा देवनागरी शिलालेख असून त्याखाली इ.स.१५८३ चा दुसरा शिलालेख तो बुरूज बांधणारा महंमद अलीखान याच्या नांवाचा आहे. तिस-या एका बुरूजावर १५८७ चा पर्शियन शिलालेख आहे. किल्याच्या मध्यभागी बालेकिल्यासारखी टेकडी असुन त्यावर ब-यापैकि झाडी आहे. मशिदी जवळून एक वाट किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाते. या वाटेने सर्वोच्च माथा गाठायचा. या माथ्यावर काही कबरी आहेत. येथील थडग्यांवरील बारीक नक्षीकामाची कलाकुसर पाहता ही थडगी राजपरिवारातील सदस्यांची असावी. गडाच्या पुर्व भागात सुस्थितीतली तटबंदी व इंग्रज अधिका-याचे थडगे दृष्टिस पड़ते. किल्याची फेरी पुर्ण करतांना अनेक उध्वस्त बांधकामाच्या खुणा व भक्कम स्थितीतली तटबंदी नजरेस पडते. गडाच्या दक्षिणेला पांजरा नदी खोरे आहे तर उत्तरेला दूरवर तापी खोरे व पलीकडे सातपुडा पर्वतरांगा दिसतात. पुर्वेला खानदेश मुलूख व लळिंग किल्याचं टोक दिसतं तर पश्चिमेला सातमाळा रांगेतला धोडप, कंकराळा व इतर शिलेदार नजरेस पडतात. येथून किल्ल्याचा पूर्ण घेरा नजरेस पडतो. गाळणा किल्ल्याची भटकंती करायला ४ तास पुरे पण गड नीट पहायचा तर एक संपुर्ण दिवस हवा. गाळणा किल्ल्यावरील गुहा आणि पाण्याची टाकी पहाता हा किल्ला प्राचीन काळापासून अस्तित्वात असावा परंतु याचा लिखित इतिहास १३ व्या शतकापासून सापडतो. इतिहासकारांच्या मते बागलाणचे राठोडवंशीय बागुल यांनी १३ व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती केली असावी. बहामनी व निजामशाही यांनादेखील बागलाणवर वर्चस्व मिळविणे जमले नाही. पंधराव्या शतकाच्या शेवटी या किल्ल्यास महत्व प्राप्त होउ लागले. सन १४८७ मध्ये दौलताबादच्या मलिक वूजी आणि अश्रफ या बंधुनी गाळणा किल्ला मराठ्यांकडून जिंकला. पुढे निजामाशी दोन हात करण्यांत मलिक वूजीचा खुन झाला. किल्ला निजामांनी स्थानिक मराठा सरदारांकडे दिला व त्या बदल्यांत निजाम खंडणी घेऊ लागला. बहामनी सत्तेच्या अस्तानंतर गाळणा किल्ला निजामशाहीचा एक भाग म्हणुन ओळखला जाऊ लागला. इ.स.१५१० ते १५२६ दरम्यान गाळणा किल्ला निजामशहाने जिंकला पण बागलाणचा राजा बहिर्जी याने इ.स.१५२६ मध्ये हा गड परत घेतला. इ.स.१५५५ मध्ये हुसैन निजामशहा याने हल्ला करून हा गड आपल्या ताब्यात घेतला. पुढे मोगलांनी निजामशाही गिळंकृत केल्यावर गाळणा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. सन १६६४ मध्यें गाळणाचा मुसुलमान किल्लेदार महमदखान ह्याचा शहाजीस हा किल्ला देण्याचा विचार होता पण शहाजहानकडून मोठे इनाम मिळाल्यामुळें त्यानें तो बादशहास दिला. सन १६७९ मध्यें शिवाजीराजांनी हा किल्ला घेतला. १७०४ मध्ये स्वत: औरंगझेबाने गाळण्याला वेढा घातला तरी हा किल्ला जिंकण्यास त्याला वर्ष लागले. इ.स.१७५२ मध्ये मल्हारराव होळकर व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. १८०४ साली हा किल्ला इंग्रज कर्नल वॅलस याने होळकरांकडुन जिंकुन घेतला. त्यानंतर किल्ले गाळणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. १८१८ नंतर काही वर्षे ह्या गांवी मामलेदार कचेरी होती. इंग्रजांनी खानदेश घेतल्यावर कांही दिवस गाळणा हें खानदेशांतील एक उत्तम हवेंचे ठिकाण म्हणून उपयोगांत येत होतें. हिंदू राजवट, निजामशहा, बागलाण राजवट, शिवाजीराजे, औरंगझेब, इंग्रज असे कित्येक शासक या दुर्गाने अनुभवले आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!