गांधली

प्रकार : नगरकोट

जिल्हा : जळगाव

उंची : 0

श्रेणी : सोपी

महाराष्ट्राला गडकिल्ल्याचा समृध्द वारसा इतक्या मोठया प्रमाणात लाभला आहे कि आजही कित्येक किल्ल्याची नोंद सरकारी दफ्तरात किंवा दुर्गप्रेमींच्या यादीत दिसत नाही. कागदोपत्री कोट अथवा किल्ला अशी कोणतीही नोंद नसलेला गांधली गावातील कोट यांपैकीच एक. माझे एक दुर्गारोही मित्र श्री. जगदीश धानमेहेर यांनी या कोटाबाबत सांगितले व आमची पावले तिथे वळली. गांधली गावाभोवती असणारा हा कोट आजही त्याच्या अंगावर तटाबुरुजांचे व इतर अवशेष बाळगत इतिहासाबाबत मौन बाळगुन आहे. गांधली-पिळोदा या जोडनावाने ओळखले जाणारे गांधली गाव या कोटातच वसलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमंळनेर तालुक्यातील हे गाव अमंळनेर शहरापासुन केवळ ९ कि.मी. अंतरावर आहे. साधारण २५ एकरचा दक्षिणोत्तर परीसर लाभलेल्या या गावाभोवती आयताकृती आकाराचा कोट असुन या कोटाला पुर्वाभिमुख व पश्चिमाभिमुख अशी दोन बुरुजामध्ये बांधलेली दोन प्रवेशद्वारे आहेत. ... वेगवेगळ्या भागात विखुरलेले कोटाचे अवशेष पहाण्यासाठी स्थानिकांची मदत घ्यावी लागते. स्थानिकांचे या किल्ल्याबाबत असलेले अज्ञान या किल्ल्याच्या ऱ्हासाला कारणीभुत होत आहे.गावकऱ्याना बुरुज व किल्ला या शब्दातील फरक माहित नसल्याने ते गावात एकुण सात ठिकाणी असलेल्या बुरुज, दरवाजे, तटबंदी या अवशेषांना सात किल्ले म्हणुन संबोधतात. पण प्रत्यक्षात दोन दरवाजा शेजारी प्रत्येकी दोन असे चार व इतरत्र ६ असे एकुण दहा बुरुज आपल्याला या कोटाच्या तटबंदीत पहायला मिळतात. गावातील बसस्थानकासमोर एक तीन कमानी असलेली पायऱ्यांची बारव आहे. या विहीरीच्या काही पायऱ्या उध्वस्त झाल्या असुन गावकरी हि विहीर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे सांगतात. विहीर पाहुन झाल्यावर एखादा स्थानिक माणुस सोबत घेऊन कोट पहायला सुरवात करावी. वाटेच्या सुरवातीला आपल्याला किल्ल्याचा आग्नेय दिशेला असलेला बुरुज व त्याच्या पायाशी काही प्रमाणात शिल्लक असलेली तटबंदी पहायला मिळते. वाटेच्या पुढील भागात उजवीकडील उंचवट्यावर बावस्कर पाटील यांचा डागडूजी केलेला वाडा असुन या वाडयाची पश्चिमेकडील भिंत साधारण २५ फुट उंच आहे. या वाटेने पुढे डावीकडे वळुन सरळ गेल्यावर किल्ल्याचा नैऋत्य दिशेचा टोकाचा बुरुज दिसतो. येथे कोणतीही तटबंदी शिल्लक नाही. हा बुरुज पाहील्यावर कोटाच्या पुर्वाभिमुख दरवाजाकडे निघावे. वाटेत आपल्याला दोन बुरुज असलेला लहान वाडा पहायला मिळतो. वाडा ओलांडुन आपण कोटाच्या दरवाजात पोहोचतो. दोन बुरुजामध्ये बांधलेल्या या दरवाजाची कमान व आतील भाग आजही शिल्लक असुन कमानीचा केवळ वरील भाग कोसळला आहे. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या असुन बुरुजावर जाण्यासाठी जिना आहे. दरवाजापासून कोटाच्या ईशान्येकडील बुरुजा पर्यंतची तटबंदी आजही शिल्लक आहे. या तटबंदीला बाहेरील बाजुने वळसा घालत आपण ईशान्य बुरुजाकडे पोहोचतो. हा बुरुज आज केवळ ६ फुट उंच शिल्लक आहे. या वाटेने पुढे आपण तटबंदीतील पुर्णपणे उध्वस्त झालेल्या दरवाजात पोहोचतो. हा दरवाजा पाहुन झाल्यावर उजव्या बाजूस ४ बुरुज व तटबंदी असलेली जैन मंदिराची वास्तु दिसुन येते. या मंदिराच्या बाहेरील भागात एका मोठया इमारतीचे व भिंतीचे अवशेष आजही शिल्लक आहेत पण गावकऱ्याना या वास्तूबाबत काहीही माहित नाही. तटबंदीतील दरवाजाने जैन मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच एका चौथऱ्यावर उध्वस्त जैन मंदिराचे अवशेष पहायला मिळतात. या चौथऱ्याखाली एक कोठार व एक तळघर आहे. तळघराला बाहेरील बाजुने आत जाण्यासाठी जिना असुन या तळघराचे वरील बाजु या मंदिरात उघडते. तटबंदीच्या आत मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्ग असुन या मार्गावर दोन विहिरी आहेत. जैन मंदिर पाहुन झाल्यावर कोटाच्या पश्चिम दरवाजाकडे निघावे. कोटाचा पश्चिम दरवाजा पुर्णपणे उध्वस्त झाला असुन त्याशेजारील केवळ दोन बुरुज शिल्लक आहेत. या दरवाजा समोर मारुतीचे लहान मंदिर आहे. हा दरवाजा पाहुन झाल्यावर गावातील दत्तमंदिराकडे जावे. या मंदिराच्या आवारात दोन समाध्या पहायला मिळतात. मंदिराच्या उजव्या बाजुने पुढे आल्यावर कोटाच्या पश्चिमेकडील काही प्रमाणात शिल्लक असलेली तटबंदी व एक बुरुज पहायला मिळतो. या बुरुजाच्या समोरील बाजुस एक खोल विहीर व चुन्यात बांधलेला पाण्याचा हौद पहायला मिळतो. येथील वाटेने गावाबाहेर बसस्थानकाकडे जाताना एक शिवमंदीर पहायला मिळते. किल्ल्याच्या तटबंदीचे दगड गावकऱ्यांनी आपली घरे बांधण्यासाठी केला असुन काही ठिकाणी या तटबंदीचा वापर घराची भिंत म्हणुन केला आहे. संपुर्ण गडफेरी करण्यास दिड तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!