गांजीभोयरे
प्रकार : गढी
जिल्हा : नगर
उंची : 0
श्रेणी : सोपी
महाराष्ट्रात सर्वात जास्त गढी आपल्याला नगर जिल्ह्यात पहायला मिळतात. सरदार पांढरे घराण्याची गढी म्हणुन ओळखली जाणारी अशीच एका गढी आपल्याला पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे गावात पहायला मिळते. काही मोजकेच अवशेष आपल्या अंगाखांद्यावर बाळगणारी हि गढी आजही काळाशी झुंज देत ठामपणे उभी आहे. पुणे शहरापासुन ९० कि.मी.अंतरावर असणारे गांजीभोयरे गाव शिरूरपासून २२ कि.मी. अंतरावर तर पारनेर या तालुक्याच्या ठिकाणाहुन १० कि.मी अंतरावर आहे. कधीकाळी नगरकोटाच्या आत वसलेल्या या गावात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे होते पण आज मात्र या कोटाचे मोजकेच अवशेष शिल्लक आहेत. आपला गांजीभोयरे गावातील प्रवेश हा नव्याने बांधलेल्या दोन बुरुजामधील कमानीतून होत असला तरी कधीकाळी या ठिकाणी नगरदुर्गाचा मुख्य दरवाजा असल्याचे स्थानीक सांगतात. नगरदुर्गाचा दुसरा दरवाजा गावाबाहेर आजही शिल्लक असुन त्याची कमान मात्र नष्ट झाली आहे. प्रशस्त अशा या दरवाजाचे बांधकाम घडीव दगडात केलेले असुन वरील बांधकाम विटांनी केलेले आहे.
...
या दरवाजाजवळ चौकोनी आकाराची दगडी बांधणीतील बारव असुन या बारवेतील पाणी काढण्यासाठी चारही बाजुस रहाट आहेत. सरदार पांढरे यांची गढी गावाच्या एका टोकावर असुन कमानीतुन प्रवेश केल्यावर पाच मिनीटात आपण या गढीजवळ पोहोचतो. गढीची केवळ दर्शनी भागातील तटबंदी शिल्लक असुन उर्वरीत बाजुची तटबंदी नष्ट झाली आहे. हि तटबंदी रचीव दगडांची असुन या तटबंदीच्या उजवीकडील टोकावर एक बुरुज पहायला मिळतो. या बुरुजाचे बांधकाम देखील रचीव दगडांचे आहे. तटबंदीच्या मध्यावर घडीव दगडात चुन्यात बांधलेले दोन मोठे बुरुज असुन या दोन बुरुजात गढीचा मुख्य दरवाजा आहे. गढीचा दरवाजा आजही सुस्थितीत असुन त्याच्या दर्शनी भागात दोन कमळे व वरील बाजुस पानांची नक्षी कोरलेली आहे. दरवाजाच्या डावीकडील तटबंदीची पडझड झालेली असुन या टोकावर आपल्याला अर्धवट बुजलेली विहीर पहायला मिळते. गढीच्या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन या दाराला दिंडी दरवाजा आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन उजवीकडील देवडीतुन दरवाजाच्या वरील बाजुस व बुरुजावर जाण्यासाठी जिना आहे. यातील पायऱ्यांनी बुरुजावर आले असता संपुर्ण गढी तसेच गांजीभोयरे गाव व आसपासचा परीसर नजरेस पडतो. गढीच्या आतील सर्व वास्तु पुर्णपणे नष्ट झाल्या असुन त्यावर काटेरी झुडपे उगवली आहेत. गढीच्या समोरील बाजुस एक प्रशस्त दुमजली वाडा आहे. या वाड्याचा दर्शनी भाग आजही सुस्थितीत असुन याचा तळमजला घडीव दगडात तर वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. गढीभोवती फेरी मारली असता तीन-चार फुटापर्यंत शिल्लक असलेली तटबंदी व त्यातील दोन बुरुज पहायला मिळतात. गढी व नगरकोटाचे अवशेष पहाण्यासाठी पाउण तास पुरेसा होतो. गांजीभोयरे गावाचा इतिहास सुरु होतो तो निजामशाही काळापासुन. सातारा जिल्ह्यात असलेल्या माण तालुक्यातील वावरहिरे येथील पांढरे घराण्याला त्यांच्या पराक्रमासाठी गांजीभोयरे गावाची जहागीर मिळाली. त्याच काळात या गढीचे बांधकाम झाले असावे. विजापुर दरबारात असलेल्या सरदार मंडळीमध्ये पांढरे यांचे नाव येते. एका आदिलशाही पत्रात दख्खन मधील सरदार म्हणुन पांढरे यांचा उल्लेख नाईक निंबाळकर, जगदाळे, निकम,पिसाळ यांच्या सोबत येतो. गांजीभोयरे गावात असलेली बाजारआळी पहाता हे गाव आसपासच्या गावांची बाजारपेठ असावे असे वाटते.
© Suresh Nimbalkar